चोऽऽर चोऽऽर

कविता क्षीरसागर
गुरुवार, 3 जानेवारी 2019

वृत्तपत्रात घरफोडीच्या बातम्या वाचणे वेगळे आणि तीच गोष्ट आपल्या दारापर्यंत पोचणे वेगळे.

वृत्तपत्रात घरफोडीच्या बातम्या वाचणे वेगळे आणि तीच गोष्ट आपल्या दारापर्यंत पोचणे वेगळे.

पहाटे कसल्याशा आवाजाने जाग आली. आमच्या दाराची कडीही वाजल्यासारखी वाटली. मी अर्धवट झोपेतच दार उघडून पाहते, तर दारासमोर तीन अनोळखी माणसे मुंडासे बांधलेली. त्यापैकी एक शेजारच्या काकूंच्या दाराशी काहीतरी करतोय. त्या तर गावाला गेल्यात. मी त्यांना विचारले, ""कोण आहे? काय पाहिजे?'' तसे ते घाबरले. काय चाललेय ते माझ्या लक्षात आले. त्यांच्यातील एक जण काकूंचे दार लोखंडी हत्याराने तोडू पाहतोय. ते पाहताच मी खवळले. त्यांच्यावर जोराने ओरडले ""ए, काय चाललेय? कोण आहात तुम्ही? चला निघा इथून?'' मी जोरजोरात ओरडत होते. घाबरून ते तिघे आमच्या दाराला रागाने लाथा हाणून पळून गेले. त्यांना पळताना पाहिले. मी आमचे सेफ्टी दार उघडू लागले. पण चोरांनी आमचे दार बाहेरून बंद केलेले. मग मी खूपच जोराने ओरडू लागले, ""चोऽऽर चोऽऽर.''

माझ्या आवाजाने वरच्या मजल्यावरचे एक जोडपे खाली आले. त्यांनी आमच्या दाराची कडी काढली आणि आमच्याच इमारतीत राहणाऱ्या वकिलांना बोलावून आणले. वकिलांनी पोलिसांना फोन केला. पोलिस आले. त्यांनी स्थळाची तपासणी केली. दाराला लावलेली दोनही कुलपे तोडलेली. बाहेरच्या लोखंडी दाराचा कडीकोयंडा चोरांनी गॅसकटरने कापला होता. आता पहारीने लाकडी दारही तोडणार इतक्‍यात मी बाहेर आले आणि त्यांना पळवून लावले होते. त्यामुळे चोरांना चोरी काही करता आली नव्हती. नंतर सोसायटीमध्ये सर्वांनाच कळले, चर्चांना उधाण आले. वृत्तपत्रामध्ये इतके दिवस चोरी, घरफोडी आपण वाचत आलोय. पण तीच गोष्ट आता शब्दशः दारापर्यंत येऊन पोचल्याचे पाहून मनात धडकी भरली. मुलगी दुपारी घरी एकटीच असते, त्यामुळे जास्तच काळजी वाटू लागली. त्या क्षणी मला खरेच अजिबात भीती वाटली नव्हती. शेजारच्या काकूंचे घर वाचवणे एवढेच डोक्‍यात होते. नशीब बलवत्तर म्हणून त्या चोरांनी आम्हाला काही न करता तिथून पळ काढला, नाहीतर... नंतर कळले की आमच्या समोरच्या दोन इमारतींमध्ये, आमच्या परिसरात आणखीही काही चोऱ्या झाल्या होत्या. रात्री घरी आल्या आल्या काकूंनी मला कृतज्ञतेने मिठीत घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kavita kshirsagar write article in muktapeeth