कबुतर जाऽ जाऽ जाऽ

कविता क्षीरसागर
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

बाल्कनीच्या जाळीवर कबुतरे क्षणभरासाठी टेकतात आणि माझ्याकडे आपल्या लालसर डोळ्यांनी मला खिजवल्यासारखे टकमक पाहतात. ती मला आताशी गोंडस वाटत नाहीत.

बाल्कनीच्या जाळीवर कबुतरे क्षणभरासाठी टेकतात आणि माझ्याकडे आपल्या लालसर डोळ्यांनी मला खिजवल्यासारखे टकमक पाहतात. ती मला आताशी गोंडस वाटत नाहीत.

अहो उगीच गैरसमज करून घेऊ नका . मी काही कबुतराबरोबर कुणाला चिट्ठी पाठवत नाही की कसला "संदेसा'. अन्‌ संदेसा असलाच तर तो या कबुतरालाच आहे की, "बाबा जा, माझ्या आयुष्यातून, माझ्या नजरेसमोरून दूर कुठेतरी निघून जा.' आता तुम्ही म्हणाल की, "का गं बाई, या छान, गोंडस पक्षाबद्दल तुला एवढा राग का ? किती निरुपद्रवी अन गोजिरवाणा दिसतो तो.' पण हेच तुम्ही आमच्या सोसायटीमध्ये वा आजूबाजूच्या मंडळींना विचाराल तर ते सांगतील की, हा निरुपद्रवी वाटणारा पक्षीही किती ना ना प्रकारे उपद्रव देऊ शकतो ते.

पूर्वी मलाही कबुतर आवडायचें. त्याचें ते माना वेळावून इकडे तिकडे पाहणें, त्याच्या मानेवरच्या, गळ्यावरच्या निळसर जांभळट छटा हे सारें कसें लक्ष वेधून घ्यायचें. तसें फार जवळून कबुतर पाहण्याचा योग काही आला नव्हता.

पण इथे राहायला आल्यापासून कबुतरांनी आमच्याशी जास्तच जवळीक साधलेली आहे. भर वस्तीत दुसऱ्या मजल्यावर आम्ही राहतो. हे घर घेताना आजूबाजूची माणसे, चांगले शेजारी, शाळा , ऑफिस, बाजार सारे काही जवळ या गोष्टी आम्ही पाहिल्या आणि मनासारखें मिळालें म्हणून हरखून गेलो. पण ज्या दिवशी आम्ही इथे आलो तेव्हा या मोकळ्या घरात आमचे पहिले स्वागत केले ते या कबुतर महाशयांनीच. बहुधा घराची खिडकी उघडीच राहिली होती. त्यातून हे महाशय सरळ आत आले, पण बाहेर जायचा रस्ता काही त्यांना सापडेना. मग घरभर नुसती फडफड फडफड. त्यातून मी झुरळ, उंदीर, पाल अशा प्राण्यांनाही घाबरून किंचाळणाऱ्या जातीतली असल्याने माझा तर घसाच कोरडा पडला. तरीही शुक शुक करून त्याला हाकलण्याचा बराच निष्फळ प्रयत्न मी केला. त्याला बाल्कनीचे दार उघडून दिले, सगळ्या खिडक्‍या उघडून दिल्या. म्हटले, बाबा जा आता, तुला सगळी दारे मोकळी करून दिलीत.

आमचे "शिफ्टिंग'चे काम राहिले बाजूला आणि सगळे लागलो त्याच्या पाठीमागे, तसे ते जास्तच गोंधळून गेले. कधी माळ्यावर तर कधी धुणे वाळत घालायच्या दांडीवर, कधी ओट्यावर तर कधी बाहेरच्या खोलीत असा त्याचा मुक्त संचार सुरु झाला. शेवटी माझ्या "शूर' भावाने झडप घालून त्याला टॉवेलमध्ये पकडले आणि उचलून बाल्कनीत नेले तेव्हा कुठे आमची या "समर' प्रसंगातून सुटका झाली आणि आम्ही शिफ्टिंगचे काम करू शकलो.

त्या नंतर आमच्या बाल्कनीच्या माळ्याचा तर त्यांनी मस्तपैकी कबुतरखानाच करून टाकला. बघावे तेव्हा कबुतरांच्या जोड्या बसल्यात आपल्या गुटर्गु ss गुटर्गु ss करत . असला वैताग येतो या त्यांच्या सततच्या आवाजाने की काही विचारू नका. जे लोक आवडीने कबुतरे किंवा तत्सम पक्षी पाळतात ना, त्यांच्याबद्दल मला अतिशय नवल वाटते. त्याचे सगळे काही हे लोक कसे काय करत असतील आणि ते ही आवडीने, त्याचे तेच जाणोत. त्यातच भर म्हणून आमच्या बाल्कनीत सगळीकडे त्यांनी घाण केलेली. सगळीकडे त्यांच्या पांढऱ्या शुभ्र रांगोळ्यांच्या ठिपक्‍या पुसता पुसता माझा जीव जायचा. शिवाय काड्या, कापूस, पीसे, पाने असें त्यांच्या घरट्याचें "बांधकाम साहित्य" इथे रोज येऊन पडलेले असायचे, ते वेगळेंच. नंतर नंतर आमच्या बाल्कनीच्या माळ्याचा त्यांना इतका लळा लागला की सहकुटुंब सहपरिवार तर ते यायचेच, शिवाय चिमण्या, कावळे अशा आपल्या पक्षी मित्रांसकट कलकलाट करण्यात त्यांना धन्य वाटू लागले.

पहाटे कुठे आपण साखरझोपेत छान स्वप्न पहात असावे तेव्हा त्यांच्या फडफडाटाने झोपेचे चांगले खोबरे व्हायचे. तेही एकवेळ ठीक होते, पण मी एवढ्या आवडीनें लावलेली तुळशीची रोपें भुईसपाट होऊ लागली. पालक, कोथिम्बिरीने मातीतून डोकें वर काढले रे काढले की त्यांच्यावर हल्ला होऊ लागला. एकदा तर माझी तुळशीची कुंडी कठड्यावरून सरळ खाली पाडून टाकली. मग मात्र माझे डोकेंच सणकले. म्हटले, आता बस झालें. यांचा कायमचाच बंदोबस्त केला पाहिजे.

त्याचदिवशी मग मी जाळी बसवणाऱ्या माणसाला बोलावले आणि मग काही दिवसातच आमची बाल्कनी जाळी लावून पूर्णपणे बंद करून घेतली. वरती पत्रा पण बसवून एक छोटी खोलीच केली . आता बाल्कनीच्या कठड्यावर बिनदिक्कतपणे कुंड्या ठेवता येतात. गुलाब, जुई, जास्वंद , तुळस, मोगरा अशी मस्त झाडे लावली. पण तरीही कबुतरे आमच्या बाल्कनीच्या पत्र्यावर सारखी नाचत राहतात, पत्रा तडतडू लागतो, जणू ताशे वाजवल्यासारखा आवाज होतो. कधी कधी त्या जाळीवर कबुतरे क्षणभरासाठी टेकतात आणि माझ्याकडे आपल्या लालसर डोळ्यांनी मला खिजवल्यासारखे टकमक पाहतात आणि मी पुन्हा पुन्हा त्यांना म्हणत राहते -
कबुतर जाऽ जाऽ जाऽ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kavita kshirsagar write article in muktapeeth