मैत्रीचं गणित

कविता सहस्रबुद्धे
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

आमच्या मुरलेल्या मैत्रीत आमच्या मुलांची मैत्री एकदम ताज्या लोणच्यासारखी करकरीत होती. मैत्रीचा हवा असलेला कोपरा प्रत्येकाला याच मैत्रीत गवसला होता.

आमच्या मुरलेल्या मैत्रीत आमच्या मुलांची मैत्री एकदम ताज्या लोणच्यासारखी करकरीत होती. मैत्रीचा हवा असलेला कोपरा प्रत्येकाला याच मैत्रीत गवसला होता.

आम्ही डझनभर मैत्रिणींनी एक खास बेत आखला होता. खरे तर "आमची मुले' हा एक धागा होता आम्हाला एकत्र आणणारा. आजवरच्या आयुष्यात मैत्रीची समजलेली व्याख्या, मैत्रीची गरज, मैत्रीचे महत्त्व, मैत्रीतील अनुभव प्रत्येकीच्याच बरोबर होते. आमच्या मुरलेल्या मैत्रीत आमच्या मुलांची मैत्री एकदम ताज्या लोणच्यासारखी करकरीत होती. आंबट, गोड, तिखट अशा सगळ्या चवींनी परिपूर्ण. त्यांच्या निरागस, अवखळ, धांदरट वागण्यात अजूनही लहान असल्याची झाक होती. मोठे होणे त्यांना जमलेच नव्हते जणू. अजूनही आपल्याच विश्वात रमलेली, आयुष्यातील वेगवेगळ्या स्तरांवरील स्पर्धेपासून कोसो दूर होती ती. बाहेरील जगात काय चालू आहे याचा पुसटसाही स्पर्श अजून त्यांना शिवला नव्हता. त्यांच्या याच निरागसपणाला आम्ही आमची "थीम' बनवली. त्यांच्या मनातील सप्तरंग आम्ही आमच्या कपड्यांवर उतरवले आणि त्यांच्या बालपणातील अनेक अविस्मरणीय आठवणी आम्ही नव्याने त्यांच्यासमोर उलगडल्या.

शाळेत पहिल्यांदा ओळख झाल्यापासून आजवर त्यांनी अनुभवलेल्या अनेक क्षणांना एका खास "फोटो फिल्म'मध्ये बांधणे हा एक अनोखा अनुभव होता. तो त्यांना खूपच भावला. येऽ दोस्तीऽऽ हम नहीं छोडेंगे, तेरे जैसा यार कहॉंपासून ते आजच्या दिल दोस्ती दुनियादारीऽऽऽ या गाण्यांनी एकदम झक्कास माहोल निर्माण केला. त्यांना त्या आठवणींची मजा लुटताना पाहून आमच्या मात्र डोळ्यांच्या कडा, नकळत ओलावल्या.
आपण लहान मुलांना अनेकदा त्यांना समजेल अशा सोप्या शब्दांत अर्थ सांगत असतो. पण अशा गोष्टी लक्षात ठेवून ते या गोष्टी कोठे वापरतील याचा नेम नसता. त्यांच्या लहानपणीची आठवण त्यांनाच सांगून "ओळखा पाहू कोण हा', हा खेळ खेळताना याची प्रचिती आली. एका मुलाने लिहिलेल्या गणेशोत्सवाच्या निबंधातील काही ओळी मी वाचून दाखवल्या, "आम्ही कोकणातले म्हणून आमचा गणपती दीड दिवसाचा असतो. गणपती येतात त्या दिवशी आई उकडीचे मोदक करते. भरपूर तूप घालून मोदक खायचे आणि तंगड्या पसरून झोपायचे असा बेत असतो. दुसऱ्या दिवशी विसर्जनाला गेले की, खूप घारी गोरी माणसे भेटतात. गणपती विसर्जन करून आल्यावर मला अजिबात वाईट वाटत नाही, कारण मग दुसऱ्यांच्या घरी खिरापतीला जाता येते आणि देखावेही पाहता येतात.'

इतक्‍या निरागसतेने असा खरा खरा निबंध आपण तरी लिहू का? असे वाटून प्रत्येक जण खळखळून हसत होता आणि जेव्हा मी विचारले, "ओळखा पाहू या निबंधाचा लेखक कोण?' तेव्हा "हा मानस'च असा जल्लोष झाला, कारण वर्गात बाईंनी हा निबंध त्या वेळी आवर्जून वाचून दाखवला होता सर्वांना. पुढची आठवण अजून थोडी वेगळी. खरे तर कोणालाच ही आठवण माहीत नव्हती. पाचव्या वर्षी आईशी खेळताना, बाजूला बाबा लॅपटॉपवर काम करत असताना "आई, बाबा देवाघरी गेले की त्यांचा फोटो कुठे लावायचा?' हा प्रश्न आईला विचारणारा तो कोण? हे मात्र मुलांना ओळखता आलेच नाही. जेव्हा हा प्रश्न पडणारा सौमिल आहे असे समजल्यावर मात्र; "अरे सौमिल, तुला तेव्हापण असेच प्रश्न पडायचे का?' असा एकच गलका मुलांनी केला. दुसरीत असताना वर्गात "मोरा'वरती निबंध शिकवला होता. परीक्षेत मात्र "बैल' या विषयावर निबंध आला. तरीही अजिबात न डगमगता, "बैलाला पाऊस आवडतो. पिसारा नसला म्हणून काय झाले, पाऊस आला की बैल शेपटी वर करून थुई थुई नाचतो,' हे लिहिणारा कांतेय आता स्वतःही पोट धरून हसत होता.

सोसायटीत "ती' एकच मुलगी होती, म्हणून रामायणांत नेहमी तीच सीता व्हायची. एकदा ती बाहेर जात असताना "सीता शॉपिंगला चालली म्हणून आज रामायण होणार नाही' असे पळत पळत सर्वांना ओरडून सांगणारा हनुमान तसा दुर्मिळच. ही आठवण सांगितल्यावर अनुष्का एकदम सीता म्हणून "फेमस' झाली. "माणसाला घर बांधायला आर्किटेक्‍ट, मजूर आणि बिल्डर लागतो; पण पक्षी हात नाहीत तरी फक्त आपल्या चोचीने आपल्यासाठी घरटे बांधतो,' इतकी मोठी गोष्ट सहजपणे हीच मुले लिहून जातात.

मुले जशी त्यांच्या बालपणात रमली तशी प्रत्येक आई बाबांची जोडीही परत भूतकाळात गेली, आठवणींच्या जगात थोडे फिरून आली. आज अगदी मनापासून वाटले, मुलांनी मोठे होऊच नये. त्यांच्या निरागस आयुष्यात त्यांनी आणि आपण असेच रमावे. हे एक निमित्त होते, एकत्र येण्याचे. उद्या शाळा होती, ऑफिस होते तरी प्रत्येक जण वेळेत हजर होतां. कदाचित मैत्रीचा हवा असलेला कोपरा प्रत्येकाला याच मैत्रीत गवसला होता.

अभ्यासात माहीत नाही; पण इथे मात्र मैत्रीचे हे गणित खूपच पक्के झाले होते...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kavita sahasrabudhe write article in muktapeeth