आजपासून खंडोबाच्या उत्सवाला प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध पंचमी दरम्यान खंडोबाचा उत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी हा उत्सव 30 नोव्हेंबर पासून 4 डिसेंबरदरम्यान साजरा करण्यात येत आहे. आजपासून (दि. 30) मार्तंडभैरव षडरात्रोत्सव (सहा दिवसांचा उत्सव) प्रारंभ होत आहे. या उत्सवाची सांगता चंपाषष्ठीने होते. चंपाषष्ठी हा श्रीखंडोबाच्या उपासनेतील महत्वाचा उत्सव समजला जातो.

दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात खंडोबाचा उत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी हा उत्सव 30 नोव्हेंबर पासून 4 डिसेंबरदरम्यान साजरा करण्यात येत आहे. आजपासून (दि. 30) सुरु होणा-या मार्तंडभैरव षडरात्रोत्सव (सहा दिवसांचा उत्सव) उत्सवाची सांगता चंपाषष्ठीने होते. चंपाषष्ठी हा श्रीखंडोबाच्या उपासनेतील महत्वाचा उत्सव समजला जातो. यंदा हा उत्सव येत्या सोमवारी (दि. 5 डिसेंबर) साजरा करण्यात येणार आहे. बोली भाषेत या उत्सवाला खंडोबाचे नवरात्र असेही म्हटले जाते.

या सहा दिवसांच्या उत्सवाच्या दरम्यान आणि वर्षभरात अन्य वेळीही खंडोबाची आरती केली जाते. त्यापैकी काही आरत्या -

खंडोबाची आरती - 1

पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा।
खंडामंडित दंडित दानव अवलीळा।।
मणिमल्लां मर्दुनियां जो धूसुर पिवळा।
हिरे कंकण बासिंगे सुमनांच्या माळा।।1।।

जय देव जय देव जय शिव मल्हारी।
वारी दुर्जन असुरां भवदुस्तर तारी।।धृ।।

सुरवर संवर वर दे मजलागी देवा।
नाना नामे गाईन ही तुमची सेवा।।
अघटित गुण गावया वाटतसे हेवा।
फणिवर शिणला किती नर पामर देवा।।2।।

रघुवीरस्मरणी शंकर हृदयी निवाला।
तो हा मल्लंतक अवतार झाला।
यालागी आवडे भाव वर्णिला।
रामी रामदासा जिवलग भेडला।।3।।

----------------------------------------------

श्रीखंडोबाची आरती - 2

जयदेव जयदेव जय खंडेराया ।
भवतम संहारुनिया दाखवि निजमाया ।। धृ ।।

शिवशंकर गौरीवर हर करुणाकर ।
निजभक्ताच्या साठीं घेउनि अवतार
भूलोकाच्या ठायीं येवुनि सत्वर ।
मणि - मल्हादिक दैत्या केला संहार ।। 1 ।।

सर्वांगातें लावुनि भंडार पिवळा ।
कंठीं भूषण शोभे रुद्राक्षमाळा ।
सह्याद्रीचे वरुते बैसुनि अवलीळा ।
हरहर वदनीं बोलतसे वेळोवेळां ।। 2।।

वसवोनिया बहुसुंदर सुस्थळ जेजोरी ।
महाळसा शोभतसे वामांकावरी ।
रघुविर - प्रिय अवतार तो हा मल्हारी ।
ह्मणवुनि निरंजन गुण गातो बहुपरी ।। 3।।

----------------------------------------------

श्रीखंडोबाची आरती - 3

जय देवा खंडेराया । निजशिवरुप सखया।
आरती ओवाळीतो । भावभंडारसुप्रीया ।। धृ. ।।

देहत्रय गड थोर । हेचि दुर्घट जेजूर ।
तेथे तूं नांदतोसी । आत्मसाक्षित्वे निर्धार ।
उन्मनी म्हाळसा हे । शांतिबाणाई सकुमार ।
भुक्ति मुक्ति दया क्षमा । मुरळ्या नाचती सुंदर ।। 1 ।।

स्वानंद अश्व थोर त्यावरि बैसोनि सत्वर ।
अद्वैतबोध तीव्र । हाती घेउनि तरवार ।।
अहंकार मल्लासूर । त्यातें मारिसी साचार ।
निवटुनी दैत्यगार । विजयी होसी तूं मल्हार ।। 2 ।।

निरसोनी द्वैत भाव । करिसी तूं ठाणे अपूर्व ।
अद्वैतची भक्तदेव ।भेदबुद्धी मिथ्या वाव ।
तुजवीण न दिसे कोणी । जगिं या एकचि तू धणी ।
मौनी म्हणे तुची सर्व । अससी व्यापक खंडेराव ।। 3 ।।

----------------------------------------------

श्रीखंडोबाची आरती - 4

जेजुरगडपर्वत शिवलिंगाकार ।
मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ।
नानापरिची रचना रचिली अपार ।
तये स्थळी नांदे स्वामी शंकर ।। 1 ।।

जय देव जय देव शिवमार्तंडा ।
अरिमर्दन मल्लारी तूंची प्रचंडा । ।। धृ. ।।

मणिमल्ल दैत्य प्रबळ तो झाला ।
त्रिभुवनी त्याने प्रळय मांडिला ।।
नाटोपे कोणास वरे मातला ।
देवगण गंधर्व कांपती त्याला ।। 2 ।।

चंपाषष्ठी दिवशी अवतार धरिसी ।
मणिमल्ल दैत्यांचा संहार करिसी ।
चरणी पृष्ठी खंङ्‌गें वर्मी स्थापीसी ।
अंती वर देउनि त्या मुक्तीते देशी ।। 3 ।।

मणिमल्ल दैत्य मर्दुनी मल्लारी ।
देवा संकट पडतां राहे जेजुरी ।
अर्धांगी म्हाळसा शोभे सुंदरी ।
देवा ठाय मागे दास नरहरि ।। 4 ।।

----------------------------------------------
श्रीखंडोबाची आरती - 5

जय देवा मार्तंडा । हाती घेउनिया खंडा ।
मारिले दुष्ट दैत्य । उडे त्रैलोकी झेंडा ।। धृ. ।।

मातले पृथ्वीवरि । आणि मल्ल दैत्य दोनी ।
टाकिले ऋषीयाग । यज्ञकुंड विध्वंसुनी ।
म्हणुनीया अवतरले । गौरीहर शूळपाणी ।। 1 ।

साठ कोटी गण सवें । घेउनियां दैत्यावरी ।
जाऊनियां युद्ध केलें । रण तुंबल भारी ।
शिवचक्र दैत्यचक्र । युद्ध होय बरोबरी ।। 2 ।।

त्रिशुळपाणी तप्त । थोर झाले क्रोधामुळें ।
मारिले खङ्‌ग जेव्हां । दैत्याचे कंठनाळीं ।
वरदान मागताती । प्राण अंताचे वेळी ।। 3 ।।

मल्ल म्हणे कर्पूरगौरा ।
हर हर महादेवा मल्हारी जनमुखिं ।
ऐसा उच्चार व्हावा । उद्धरिले असुरातें ।
म्हणुनीं मल्लारी नांवा ।। 4 ।।

चंपाषष्ठीचे दिवशी । ऐसा अवतार झाला ।
आनंदले सुरवर । म्हणुनी येळकोट बोला ।
चरणी तुझे लीन नामा देवा सांभाळी त्याला ।। 5 ।।


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khadoba Arti