मरणाच्या दारातला काळ थोपवून धरायला कुणीतरी हवं असतं

loneliness-
loneliness-

एखादं झाड जेव्हा आपण आपल्या दृष्टीने न्याहाळतो; तेव्हा त्या केवळ झाडाची प्रतिमा राहत नाही, तर विश्‍वाचा पसारा स्वतःच्या कवेत घेतलेलं एक कुटुंबच असते. पक्ष्यांनी घरटी बांधावी, जनावरांनी कोवळा पाला खावा, अशी अपेक्षा बाळगून; तृप्ततेने झाड एकांतात हसत असते. झाडाचं एकांतात बहरणं आम्हाला कधी दिसलं नाही. मात्र, त्याच्या ममत्वाची ओल आम्ही सतत अनुभवत असतो. झाडावर बसलेल्या थव्यातून एखादा मनवेडा पक्षी दूर उडून गेल्यावर झाडाला प्रचंड दुःख होत असावं. पक्ष्याला जसं एकांताचं दुःख सलत असावं तसं झाडालाही पक्ष्याचं अकाली निघून जाणं आकांतून येत असावं. घरातील माणसं पक्ष्यांसारखी अकाली निघून गेली की, संवेदनेच्या गर्भात घरं आतल्या-आत खचत जात असतात.

एकांतवास अनेकांना प्रिय असतो. प्रतिभावंताला स्वतःची अंगभूत प्रतिभा विकसित करायला एकांताचा काळ सुगीचा असतो. पण, दुखरी जखम असलेल्या माणसाला हा काळ मृत्यूच्या समीप नेणारा असतो. अनेकांच्या जीवनयात्रेचा अंत्यबिंदू ठरतो. उपेक्षा, अपयश, आजारपण, विरह मनाला अंधाऱ्या खाईत ढकलत असतात. मग आपसूकच पावलं वळतात आत्महत्येच्या मार्गाकडं.

समाज उगाच कांगावा करतो. तो असं करणाऱ्यांपैकी नव्हता. जिंदगी रडण्यासाठी नाही, तर लढण्यासाठी असते. हे खरेही आहे. पण, आमच्यापैकी काहींनीच तर त्याच्या काळजावर घाव केलेले असतात. आयुष्यातलं सर्वस्व गमावल्याची खंत निर्माण होऊन यापुढे अंधारच आहे, अशी भावना दृढावत गेली की, अंताशिवाय दुसरा मार्ग नाही, असा विचार डोकं वर काढतो. मरणाच्या दारातला तो काळ थोपवून धरायला कुणीतरी हवं असतं. एकांताची कोंडी फोडायला कुणाचा तरी सहवास लागतो. एखादा फोन कॉल आयुष्य बदलवू शकतो. मनातील मळभ दूर सारण्यासाठी संवाद हे एक प्रभावी माध्यम आहे.

संवादाची साधने वाढली आणि माणसामाणसांतील प्रत्यक्ष संवाद लुप्त झाला. एक काळ असाही होता जिथे चेहऱ्यांचे वाचन केले जायचे. माणसाची अवस्था संवादविना कळायची. आज बहुतांशी चेहरे मोबाईलच्या स्क्रीनशी इतके संवादू झालेत की, मायावी जगात आपलाच चेहरा हरवून बसले. मला आठवते आमच्या बालपणी रात्री जेवण आटोपले की, माणसं काही वेळ
पारावर बसायची. शेजाऱ्याला "जेवण झाले का?' असा निरर्थक वाटणारा; पण गांभीर्य असणारा प्रश्‍न विचारायची. माणसाला आपण एकमेकांच्या निरीक्षणात सुरक्षित आहोत, याची जाणीव उत्पन्न व्हायची. आपल्या शेजारी कुणी उपाशी झोपले, तर नाही ना! याची काळजी घेतली जायची. एकटेपणाची भावना संपुष्टात यायची.

हल्ली वर्तमानपत्रे उघडले की, रोज कुठेना कुठे आत्महत्येची बातमी वाचायला मिळते. शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर महिला आणि युवावर्गाच्या आत्महत्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. शेतकऱ्यांचे जगणे अजूनही पांढरपेशी सरकारी बगळ्यांना आणि कुंभकर्णी वंशांच्या राजकीय पुढाऱ्यांना समजले नाही. शासनाचे कृषिधोरण, प्रत्यक्ष अंमलबजावणी, उत्पादनमूल्य आणि
बाजारभाव इत्यादी घटकांवर होणारी त्याची पिळवणूक अप्रत्यक्षरीत्या मृत्यूचा पाश तयार करण्याचे काम करते. कौटुंबिक हिंसाचारात महिलांचे होणारे शोषण आणि वाढत चाललेल्या आत्महत्या अत्यंत चिंतेचा विषय आहे. देशाचा किंबहुना जगाचा आधारस्तंभ असणारा युवावर्ग आत्महत्येच्या विळख्यातून प्रवास करताना दिसतो. ही बाब फारच चिंतनीय आहे. कौटुंबिक कलह, जागतिक स्पर्धा, अपेक्षांचे ओझे, न्यूनगंड, लव्ह ब्रेकअप, जात-वंशवाद, आपण जागतिक प्रवाहाच्या बाहेर फेकल्या जाण्याची भीती आत्महत्येमागील प्रमुख कारणं आहेत. खरं तर काळ निघून गेला की, आपण जेते होतो हे सांगणारे कुणी नसल्याने त्यावेळेपुरता गुंता निर्माण होत असावा.

वैचारिक परिपक्‍वता असणारी माणसंही आत्मक्‍लेशाला बळी पडल्याची उदाहरणे अनेक आहेत. आमची एक मैत्रीण होती. तिचे वडील गांधी विचारांचे अनुयायी असल्याने तिचीही जडणघडण गांधी विचारधारेत झाली. तिने विधीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. अंगात खादीचा सलवार असायचा. साधी, प्रेमळ, नम्र आणि विचारांनी प्रगल्भ जाणिवेची मुलगी. आम्हाला धीर देणारी, बेकारीच्या काळात आशावाद जिवंत ठेवणारी पत्रे अजूनही माझ्या संग्रही आहेत. पण, मध्यंतरी तिने घरच्या मंडळींच्या अनुमतीने आंतरजातीय विवाह केला. नवराही सुज्ञ मिळाला. सर्व सुरळीत सुरू होते. एकदिवस अचानक तिच्या बाबांचा फोन आला. ज्या विहिरीच्या काठावर बसून मोठी झाली. काही कवितांनाही तिने विहिरीच्या काठावर जन्म दिला होता. त्या माहेरच्या अंगणातील विहिरीत तिने उडी घेतली. एक प्रगल्भ समाजशील मुलगी असं काही करेल, असा विचारसुद्धा केला नव्हता. तिचे दुःख विहिरीसारखे खोल असावे. ज्याचा तळ कुणालाही गवसला नव्हता. जीवन सुंदर असतं म्हणणारी, विचारांनी परिपक्‍व असणारी, आत्महत्येचा मार्गाने निघून गेली. अनंतकाळाची हुरहूर ठेवून...

आईच्या गर्भात आपण नऊ महिने अंधारात असतो. तेव्हा जाणीव नसते. आज कल्पना जरी केली तरी अंगावर काटे उभे होतात. गर्भात असतो तेव्हा सुरक्षित असतो. बाहेर आलो की, संघर्ष सुरू होतो. अंधाराची शरीराला सवय झालेली असते. केवळ मनाला त्याची जाणीव करून द्यायची असते. संकटसमयी दिसणारा अंधार नक्‍कीच मिटणार आहे. कारण, प्रत्येक सूर्यास्तानंतर येणारा सूर्योदय आपले स्वागत करत असतो. याची भावना उरात घट्ट पाय रोवून बसली पाहिजे.

ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या आयुष्याचा खडतर प्रवास एका मुलाखतीत प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला. त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार मनात आणला आणि रेल्वेस्टेशनवरून आयुष्य संपवायला निघाल्या, तेव्हा त्यांना "पाणी पाणी' म्हणून विव्हळत असणारा म्हातारा दिसला. आपण मरण्याआधी कुणाचे तरी प्राण वाचवून जावे म्हणून त्यांनी त्या म्हाताऱ्याला पाणी पाजले. तो तापाने फणफणत होता. अंगातील ताप बघून त्या तिथेच थांबल्या. म्हाताऱ्याची जगण्यासाठी चाललेली धडपड पाहून त्यांच्या मनात आलेला आत्महत्येचा विचार गळून पडला. खरं तर असे प्रसंग माणसाला मनातील किल्मिशांना दूर सारतात. जगण्याचा निकोप दृष्टिकोन विकसित करतात.

मनाच्या खोल डोहात जराशी राहू दे ओल
कुणाच्या काय ओठात जरासे जाणू दे मोल
कुणाची हाक घायाळ, घराच्या आत अंधार
कळाया आतला पाश तळाच्या राहू दे खोल

प्रत्येकाच्या आयुष्यात अपयश येतं. प्रत्येकालाच हवं असणारं जग प्राप्त होत नाही. आपण विचार करतो त्याच्या भिन्न घडल्याने चिंताग्रस्त होण्याचे कारण नाही. एकांताचे कंगोरे कितीही विळखा घालून बसले तरी त्यातून बाहेर पडण्याचे धाडस केले की, प्रश्‍नांची उत्तरं आपोआप सापडतात. येणाऱ्या प्रत्येक संकटांना हसत स्वीकारण्याचे कसब निर्माण करणे गरजेचे आहे. आम्हाला इतरांच्या मनातील हाक ओळखून, घरातील पाषाण अंधार मिटवता आला पाहिजे. आपल्या मार्गात काटे पेरणाऱ्यांना घाबरून न जाता, संवैधानिक मार्गाने उत्तर देणे गरजेचे. संकटाच्या काळात थोरांची चरित्रे डोळ्यांखालून घातली पाहिजे. मंत्र, जप करून प्रश्‍नांची मालिका संपणार नाही. मन, मनगट, मेंदू सक्षम ठेवून लढू. कधी राम, तर कधी कृष्ण, तर कधी बुद्ध होऊ. आजूबाजूला कुणी एकट्यात खितपत पडले, तर नाही ना! म्हणून हक्‍काची हाक देऊ, दारावर थाप मारू. असेही होईल, एखाद्याच्या मनातील आत्महत्येची भावना, तुमच्या आमच्या संवादाने कायम नष्ट होईल. फासाच्या दोरीला तिलांजली प्राप्त होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com