बालवयाची सय

मधुरा धायगुडे
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

बालवयाची सय मनाला भारून टाकत येते. व्यावहारिक जगाचे भान विसरायला लावते क्षणभर. मनाला तुलना करायला लावते. वर्तमानाच्या चिंतेचे चिंतनात रूपांतर करते.

बालवयाची सय मनाला भारून टाकत येते. व्यावहारिक जगाचे भान विसरायला लावते क्षणभर. मनाला तुलना करायला लावते. वर्तमानाच्या चिंतेचे चिंतनात रूपांतर करते.

काहीतरी कारणाने कपाट उघडले. कपाट कसले, बालपणीच्या आठवणींचे फडताळच उघडले गेले. शेवटच्या दोन कप्प्यांत साठविलेली ती चित्रे, पेन, पेन्सिली, रंगपेट्या. पुस्तके, अन्‌ बरेच काही. नकळत लहानपणाच्या प्रत्येक क्षणाची, जागेची आठवण, ओसरीच्या चार खणी जागेत बालपण ते पौगंडावस्थेपर्यंतचे ते दिवस डोळ्यांसमोरून तरळून गेले. भेट मिळालेले "श्‍यामची आई' हे पुस्तक मी अजून जपून ठेवले आहे. मराठी कवितांची प्रथम ओळख झाली ती "बालभारती'तून. पुस्तक अलगद उघडताना शाळेच्या त्या रम्य आठवणीकडे मन झेपावले, शब्दांची जादू, त्यातून विहरणाऱ्या त्या संवेदना मनाची दारे खऱ्या अर्थाने उघडणाऱ्या होत्या. त्या वेळी एकमेकांशी संवाद हेच माध्यम होते. मनाचा ठाव घेणारे शब्दच मानवी मनाची ओळख देत. आज ते अशा अनुभूती देत नाहीत असे नाही, पण काळ बदलला हेच खरे.

बालपणाचा तो काळ आठवला. पुन्हा भूतकाळातून फिरून वर्तमानात आले. पिढी बदलली, समाजमनही बदलले. विचारांची दिशा बदलली. जुन्याच्या कोंदणात नवी बीजे रुजू लागली. ओसरीची जागा दिवाणखान्याने घेतली. तशी आठवणींची जागाही संकुचित होऊ लागली. असे बरेच विचार तो बालपणीचा खजिना न्याहळताना येत होते. खरेच खूप रम्य दिवस होते ते. बराचसा वेळ ओसरीवर जायचा. ती ओसरी त्या बालपणीची साक्ष होती.

तिन्ही सांजेला जोत्यावर बसून "शुभं करोती', रामरक्षा, परवचा म्हणवून घेणारे पांढऱ्या शुभ्र तक्‍क्‍याला टेकून बसणारे आजोबांचेही स्मरण झाले. या छोट्या छोट्या गोष्टीतून कसे अन्‌ काय मिळवले हे आता कळते. मग दिवसभराच्या गप्पा-टप्पा व्हायच्या, संध्याकाळही खूप समृद्ध असायची त्या वेळी.

रविवार सुटीचा दिवस. त्या वेळी "आकाशवाणी"वरून "बालोद्यान' कार्यक्रम सादर होत असे. न चुकता तो ऐकण्याचा रिवाजही घरी असायचा. त्यातून मिळालेल्या शिदोरीने जडणघडणीत आमूलाग्र बदल घडवले. विचारांची एक दिशा ठरली ती बालपणीच. त्या वेळी एक गोष्ट सतत डोक्‍यात रुजवली जायची, की माणसाने स्वतःला स्वतःच घडवायला हवे. हे कुठेतरी मनात रोवण्याचे काम त्या ओसरीवरच्या बालपणाच्या क्षणाने केले. फार मोठे होणे जमले नसले तरी स्वतःच्या विचारांवर ठाम राहण्याचे, दुसऱ्यांशी बरोबरी न करता सामंजस्याने राहण्याचे ते बाळकडू मनात रुजले ते कायमचेच.

दिवाळीची, मे महिन्याची सुटी कशी घालवायची, हा मुलांपुढचा प्रश्‍नच असायचा. माझ्यासाठी तो नसायचा. वाचनालयात नाव नोंदवायचे अन्‌ भरपूर पुस्तके वाचून काढायची. वृत्तपत्रे वाचायची. घरी परतल्यावर आज काय वाचले याचे "समीक्षण' असायचे. त्यातूनच नकळत चांगले-वाईट ओळखण्याची सवय लागली. विचारांना दिशा मिळत गेली. दुपारच्या त्या फावल्या वेळात बालपणीचा तो काळ तरळून गेला, तेवढ्यात मोबाईल वाजला अन्‌ मी भानावर आले. मोबाईल घेतला अन्‌ पुन्हा विचार आला, आज-कालच्या पिढीला, मुलांना देऊ शकतो का हे रम्य बालपण? मन वर्तमानात आले अन्‌ भविष्यांचा विचार करू लागले. कृत्रिम आठवणींनी भारलेले डिजिटल, संकुचित आठवणीचे बालपण आज आपण देतोय का?

दोन वर्षांचे मूल झाले, की लगेच त्याला शाळेत घालून दप्तराचे ओझे आपण देतो. स्पर्धा या शब्दांचा खरा अर्थ न सांगता आपणच आपल्या मुलाची दुसऱ्याबरोबर स्पर्धा करत जातो. अन्‌ त्याला चक्रव्यूहात अडकवत जातो. त्यातून बाहेर पडण्यासाठी तयार केलेल्या संकुचित कोषातून बाहेर पडणे अवघड होते. नकळत अनेक समस्यांना जन्म देतो आपणच. पण समस्येपेक्षा मोठे होण्याची ताकद आपणच निर्माण करायला हवी हे विसरतो. बरेच मंथन मनात झाले. संध्याकाळ ट्युशन, हॉबी क्‍लास, मिळाला तर टीव्ही यातच निघून जाते. मग मनातील अव्यक्त भावना कशा व्यक्त होणार? कारण संवादच नाही. असते ती फक्त स्पर्धा. न्यूनगंड निर्माण होण्याची पहिली पायरी हीच. यात मुलांची चूक नसते, तर आजूबाजूच्या बदलत्या वाऱ्यांची, जी कधी मनात काहूर माजवतील सांगता येत नाही. यामुळे बालपणीची निरागसता कुठेतरी हरवत चालली. मनाचे आवेग संयमाच्या भिंतीना पार करून फक्त एकमेकांना भिडण्याचे संकेत नकळत रुजवत चाललेत का? काही अपवादही आहेतच की, असे मनाला समजावण्याचा प्रयत्न करत असतानाच पुन्हा कपाटाकडे लक्ष गेले.

तिन्ही सांज व्हायला आली होती, उन्हे उतरत चालली होती, पुन्हा एकदा त्या खजिनाकडे पाहिले अन्‌ मनातच त्या कपाटाचे व ओसरीचेही आभार मानले. केवढी समृद्ध आठवण देऊन गेली ते कपाट, ती ओसरी. वर्तमानातल्या चिंतेचे चिंतनात रूपांतर करणार तो बालपणीचा सुखाचा काळ पुन्हा-पुन्हा आठवावा. कल्पनेच्या दुनियेत जगणारे मन समजूतदारांच्या जगात बालपणीचे सुंदर दिवस शोधत राहते.
कपाट लावून मी पुन्हा माझ्या पुढच्या कामाला लागले.

Web Title: madhura dhaigude write article in muktapeeth