आठवण गणेशोत्सवाची

मधुरा धायगुडे
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

उत्सवातील उत्साह अजून तोच आहे; पण पूर्वीचा उत्सवातील सक्रिय सहभाग कमी होत चालला आहे.

उत्सवातील उत्साह अजून तोच आहे; पण पूर्वीचा उत्सवातील सक्रिय सहभाग कमी होत चालला आहे.

लहानपणापासून बरेच गणेशोत्सव बघितले, उत्सवाचे स्वरूप बदलले; पण बालपणीचा ब्राह्मण आळीतील गणेशोत्सव विशेष आठवतो. गणेशोत्सव आला, की देखाव्यांची तयारी होत असे. वरच्या आळीत मांडव पडायचा. आधीच दहा दिवस देखाव्याची जमवाजमव सुरू व्हायची. "मित्र मंडळाच्या' त्या गणेशोत्सवाची तयारी करण्यासाठी सारे कार्यकर्ते तिथे राहणारे व पुण्यात राहणारे आपापले योगदान आवर्जून देत असत. देखाव्याची जबाबदारी मांडके कंपनी अगदी आवर्जून पुण्याहून येऊन निभावत असे. तेव्हा "अभिनव'मध्ये शिकवणारा मामा दहा दिवस रजा घेऊन येत असे. त्याचा मुक्काम आमच्याकडेच असे. हा मामा व प्रकाश योजनेची जबाबदारी सांभाळणारे मास्तरकाका यांची आठवण आवर्जून होते. त्यांचे येणेजाणे आमच्या घरी कायम असे. माझे बाबा मित्र मंडळाचे सेक्रेटरी होते. गणपतीपुढे रांगोळी घालण्याचे काम शाळेत असलेल्या आम्ही मुली करत असू. सकाळ-संध्याकाळची आरती ही विशेष बाब असे. मांडवाला बांधलेली घंटा आरती म्हणताना कोणी वाजवायची हा आम्हा मुलांचा वादाचा विषय असायचा. त्या दहा दिवसांतल्या एका रविवारी गणपती अथर्वशीर्षाचा कार्यक्रम असतो. रविवार आवर्जून ठरविला जातो. मित्रमंडळातील महिला वर्गाचा सहभागही काही कमी नसतो. मोदक तेही सोवळ्याने करायचे काम महिला मंडळ करत असे. त्यांच्यातील एकोपा वाखाणण्याजोगा. नकळत या छोट्या कृतीतून काय घेत गेलो हे आता कळते. छोट्या कलाकारांच्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात माझा सहभाग मी नोंदवित असे.

लग्नानंतर संपर्क कमी होत गेला; पण बालपणी त्या गणेशोत्सवात सातत्याने दिलेले योगदान आज आवर्जून आठवले. वरच्या आळीतील त्या गणेशोत्सवाच्या मांडवात केलेली मस्ती वयाच्या या टप्प्यावरही डोळ्यांत आनंदाश्रू आणते. हेच यश त्या आठवणीतल्या माझ्या मित्रमंडळाचे आहे का? लोकमान्यांनी एकोपा संघटनसूत्र हा उद्देश ठेवून चालू केलेला हा मनामनाला जोडणारा गणेशोत्सव मी खऱ्या अर्थाने लहानपणीच अनुभवला. नंतर मात्र ते दिवस अनुभवता आले नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: madhura dhaygude write article in muktapeeth