पारिजात दरवळे

माधुरी साठे
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

रात्रीच्या काळोखात गुपचूप फुलणाऱ्या पारिजातकाच्या फुलातून श्रावणाचे हास्य उमलते जणू!

रात्रीच्या काळोखात गुपचूप फुलणाऱ्या पारिजातकाच्या फुलातून श्रावणाचे हास्य उमलते जणू!

नेरळला घर बांधताना आधी प्राजक्ताचे झाड लावले अंगणात. केशरी देठाचे लेणे लाभलेल्या पांढऱ्या शुभ्र पाकळ्यांच्या, नाजूक फुलांची चादर, हिरव्यागार श्रावणाच्या हिरवळीवर पसरणाऱ्या पारिजातकाचे माझ्या मनात जिव्हाळ्याचे स्थान आहे. जणू काही पारिजातकाच्या फुलातून श्रावणाचे हास्य उमलते. सकाळी प्राजक्ताच्या कळ्या छोट्या असतात, त्या संध्याकाळी टपोऱ्या होतात आणि अंधारात गुपचूप फुलतात. रात्री वाऱ्याच्या मंद झुळकीबरोबर प्राजक्ताचा मंद सुगंध अनुभवायला मिळतो. रात्रही प्रसन्न होते आणि सकाळी या फुलांचा अंगणात पडलेला पांढराशुभ्र सडा पाहून मनही प्रसन्न होते. या फुलांचा रंग, रूप, गंध सारेच विलक्षण. पहाटेच्या सुखद वातावरणात ही स्वर्गीय फुले वेचण्याचा मला एकच छंदच आहे. अंगणात फुलांचा सडा पडलेला असताना या फुलांच्या सुगंधात रममाण होऊन ती वेचण्यात एक आगळाच आनंद असतो. ही फुले हलकेच टिपून परडीत ठेवायची असतात. पारिजातकाचे झाड हलवून फुलांचा पाऊस अंगावर घ्यायलाही मला खूप आवडते. कधी दवाने, तर कधी पावसाने भिजलेल्या फुलांचा मऊ, गार स्पर्श अंगाला मस्त वाटतो. आपल्या अंगणातली फुलांची ओंजळ आपल्या प्रिय व्यक्तीला देण्यात अतोनात प्रेम दिसून येते.

श्रीकृष्णाने पृथ्वीवर आणलेल्या पारिजातकाची फुले शेजारी का पडायची ही गोष्ट आपण ऐकलेली आहे. गदिमांनी "बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी' ही छान संगीतिका लिहिली आहे. आम्ही लावलेल्या पारिजातकाची फुले शेजारच्यांच्या अंगणात पडतात, तर दुसऱ्या शेजारच्यांनी लावलेल्या पारिजातकाची फुले आमच्या अंगणात पडतात. ही फुले लवकर कोमेजतात. सौंदर्य फार काळ टिकत नाही, हे त्याचेच लक्षण. आम्ही लहानपणी या फुलांचे हार करायचो. उरलेल्या फुलांनी दारात रांगोळी काढायचो. पारिजात अनुभवतो ती फक्त बहरण्यातील परिपूर्णता आणि देण्यातले समाधान. मातीकडून घेतलेला जीवनरस तो सुगंधाच्या रुपात निसर्गाला परत करतो. माझ्या अंगणातला पारिजात आपल्या सुगंधाने माझ्या चेहऱ्यावर हास्य उमलवतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: madhuri sathe write article in muktapeeth