वही तो! (मुक्‍तपीठ)

मनाली ओक
सोमवार, 18 मार्च 2019

आयुष्याचा जोडीदार वहीसारखा मिळावा. निमूट ऐकणारा, माहीत असूनही कुणाविषयीच काहीही मत न बनवणारा.

आयुष्यात खूप काही घडत नव्हतं, बिघडतही नव्हतं. सरळ सोपं चाललं होतं आयुष्य. तसं छानंच चाललं होतं म्हणायचं. एके दिवशी दुरून दिसलं दुःखं. लांबून पाहतानाही भीती वाटली त्याची. वाटलं, किती अवघड आहे त्याचा सामना करणं, किती कठीण आहे त्याला स्वीकारणं! आयुष्याच्या सोपेपणाची भीती वाटली. हरणं, कोलमडणं असं काही पाहिलंच नव्हतं कधी. स्वत:चं जिंकणं उपभोगण्याच्या धुंदीत दुसऱ्याचं हरणं कधी जवळून नव्हतं पाहिलं. मध्ये का कोणास ठाऊक, पण जिंकल्यावरही उगाच वाटत राहिलं, एकदा हरूनही पाहायला हवं होतं. परवा मिळाला एक नकार. हलकं वाटलं काहीसं. आणि एक वेगळीच जाणीव झाली, स्वत:च स्वत:ला नव्याने स्वीकार केल्याची. वाईटाची ओळख नव्हती फारशी. जग चांगलंच वाटायचं. मध्ये कोणीतरी म्हणालं, ‘खूप दुष्ट आहे हे जग. कल्पनेच्या जगात वावरातीयस तू, वास्तवाकडे डोळसपणे बघ जरा.’ वाटलं, आपण काय डोळे मिटून जगतोय? सत्य स्वप्नवत नाही, म्हणून सत्याकडे पाठ करून बसलोय आपण? वाटायचं प्रेम करावं सगळ्यांवर, जगण्यावर. आपल्या वाटणीचं प्रेम आपल्याला मिळतंच. पण तिरस्कार स्वीकारावा लागला एकदा. वाईट वाटलं. मग वाटलं, आपल्यावर विनाकारण प्रेम करणारी, आपुलकीने आपली चौकशी करणारी माणसं भेटतातंच ना? मग तिरस्कार तरी कारणास्तवच का असावा नेहमी?

वाटलं, हे सगळं का लिहितो आपण? स्वत:चं म्हणणं स्वत:पाशी मांडण्यासाठी? की, ते जगाला कळावं म्हणून? आपल्या मनातील भावनांना कथा-कवितांमध्ये बंदिस्त करावं? की विखरू द्यावं त्यांना भाष्यामधून? शेवटी आपल्या जीवनाचे पडसादच उमटणार लिखाणातून. मग आपलं जगणं मांडावं असं जगापुढे? की, आपल्यापाशीच ठेवावं सगळं? की दुर्बोध, अवघड असं काही लिहावं? कोणाला ते कळूच नये असं? मग लिहावंच का? आपल्याला आपल्याच शब्दातून नव्याने जाणण्यासाठी. लिहिता लिहिता आपल्याच प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी. वाटलं, हरवून टाकावं स्वत:ला. इतकं की, आपणच आपल्याला सापडू नये. व्हावं इतकं वेगळं की, आपण कोण होतो हे आपल्यालाच आठवू नये.

...असं बरंच काही वहीत लिहून काढलं. विनातक्रार सारं काही ऐकणाऱ्या, सगळं माहीत असूनही कोणाविषयी कोणतंच मत न बनवणाऱ्या या वहीसारखं कोणीतरी हवं होतं तिला आयुष्याचा जोडीदार म्हणून. त्याने फक्त ऐकत जावं, बोललेलं सारं काही त्याच्याकडे सुरक्षित राहावं, आणि वहीत लिहून जे समाधान मिळतं ते त्याच्याशी बोलून मिळावं. ...वही तो!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manali oak write article in muktapeeth

टॅग्स