
शुद्धमती
परमेश्वराने जसे जन्माला घातले, त्या शुद्ध स्वरूपातच ती आहेत. ती मंदमती नाहीत, तर शुद्धमती आहेत.
"कामायनी'च्या वार्षिक स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणी म्हणून गेले होते. सिंधूताई जोशींनी दिव्यांग मुलांसाठी सुरू केलेल्या या शाळेच्या निगडी शाखेचे स्नेहसंमेलन होते. सर्व कार्यक्रमांचे सूत्र होते -नाती. दिव्यांग मुलांचे कार्यक्रम म्हणजे कौतुकाचाच भाग असणार अशी धारणा होती. कार्यक्रम सुरू झाला आणि त्या त्या मुलांची त्यांच्या जागेवर उभे राहण्यातली अचूकता, शिकवलेल्या हालचाली तंतोतंत करण्याची धडपड, समरसता आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे सर्व करताना त्यांच्या चेहऱ्यावर फुललेले निर्व्याज हसू, हे बघताना माझ्या डोळ्यांना धारा केव्हा लागल्या माझे मलाही कळले नाही. विशेष म्हणजे कार्यक्रम चालू असताना एकही शिक्षक-शिक्षिका मंचावर नाहीच, पण विंगमध्येही उभे नव्हते. कोणाचे चुकले तर मुलेच त्याला कसे करायचे ते हसत हसत दाखवत होती. देशाचे नाते दाखवताना तर मुले हातात 26 /11 च्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हुतात्म्यांची छायाचित्रे असलेला फलक घेऊन आली. सगळ्या हॉलने उभे राहून मानवंदना दिली.
कामायनीच्या वर्कशॉपमधील मुला-मुलींनी फिल्मी गाण्यांवर नृत्य सादर केले. त्यांची तालाची, लयीची समज बघून थक्क व्हायला झाले. सलग पाच तास गाऊन "रेकॉर्ड' केलेला पृथ्वीराज इंगळेचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. त्याची आई सांगत होती, की लिहिता-वाचता येत नसूनही त्याला शेकडो गाणी पाठ आहेत. कुठूनही मधून संगीत लावले तरी बरोबर तो ते गाणे सुरू करतो. फक्त त्याला युगुलगीत म्हणता येत नव्हते. कारण आपण थांबायचें आणि गायिकेला गाऊ द्यायचे हे त्याला समजत नव्हते. मग त्याची आई त्याला एखाद्या युगुलगीताची चित्रफीत दाखवायची, हिरोसारखे कपडे त्याला घालायची, नायिकेचे कपडे स्वतः घालायची आणि मग तिचा भाग आला, की त्याला थांबवून स्वतः गायची. त्यामुळे आता तो युगुलगीतेही उत्तम प्रकारे म्हणू शकतो. खरोखरच धन्य आहे पालकांची अन् शिक्षकांची!
मला सारखे जाणवत होते, की परमेश्वराने त्यांना जसे जन्माला घातले त्या शुद्ध स्वरूपातच ती आहेत. म्हणूनच त्यांना "शुद्धमती' म्हटले पाहिजे.