स्वामी तिन्ही जगाचा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वामी तिन्ही जगाचा...

स्वामी तिन्ही जगाचा...

आयुष्यात अनेक मित्रमैत्रिणी मिळत जातात. पण आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावरच्या मित्रमैत्रिणींमधील नातं अधिकच घट्ट असतं. खूप न भेटताही, सगळे अगदी आत्मीय असतात.

खळ्ळ- खट्याक .. हा आवाज होता आम्ही लहानपणी विट्टीदांडू खेळताना फोडलेल्या खिडक्‍यांच्या काचांचा. "1205, शिवाजीनगर' ही आमची गल्ली. माझे वडील, डॉ. ह. ना. फडणीस यांच्या "श्री क्‍लिनिक'च्या वरच आम्ही राहात होतो. गल्लीतल्या मुलामुलींचा आमचा चमू. सुमा, लता पनारकर, चकोर गांधी, त्याची बहीण नूतन, संजीव गांधी, अरुण नहार, राजू रुणवाल आणि मी असा आमचा मुख्य ग्रुप. एक-दोन वर्षे पुण्याला शिकायला राहिलेली माझी चुलत भावंडे मीना व अविनाश, हे ऍड ऑन मेम्बर्स, आम्ही साधारण एकाच वयाचे आणि माझे धाकटे भाऊ अभय, नंदू, सुमा- लताचा धाकटा भाऊ मीलन हे लिंबू टिंबू. साधारण सातवी-आठवीत असताना म्हणजे 1971-72 च्या सुमारास आमची मैत्री जुळली. शाळेतून आले, की भराभर काहीतरी खाऊन आधी खेळायला जायचे. विट्टीदांडू हा आमचा लाडका खेळ. मग कधी काचा फुटायच्या. बोलणी खायला लागायची. आई-वडील रागवायचे, पण तेवढ्यापुरते. काचा भरून द्यायचे, पण खेळ थांबला नाही. आमचा आरडाओरडा ऐकून बाबा कधीतरी त्यांच्या कन्सल्टिंग रूमच्या खिडकीतून डोकावून दटावायचे. अगदी दिवेलागणी होईपर्यंत खेळायचे, मग नाइलाजाने घरात येऊन शुभंकरोति, गृहपाठ वगैरे करायचा.
मे महिन्याच्या सुटीमध्ये तर विचारायलाच नको. पहाटे उठून हनुमान टेकडीवर जायचे. दुपारचे जेवण होईपर्यंत कसाबसा धीर धरून दुपारी एकत्र जमून पत्ते, व्यापार वगैरे खेळायचे. मग घरी जाऊन दूध पिऊन, थोडे खाऊन पुन्हा एकत्र. विट्टीदांडू नाहीतर क्रिकेट. माझी आई मला घरात परकर पोलकें घालायला लावायची. ते बघून सुमा, लता, नूतनच्या आयांनी पण तोच कित्ता गिरवला. त्याचा फायदा म्हणजे क्रिकेटचा बॉल परकरामुळे आपोआप अडवला जायचा.

रंगपंचमीला मनसोक्त रंग खेळायचो, होळीला आमच्या खेळण्यावर खार खाणाऱ्यांच्या नावाने जोरजोरात बोंब मारायचो. कोणाच्याच घरून मुलाना एकत्र खेळण्याला हरकत घेतली गेली नाही. उलट मी राजू, अरुणला स्वेटर विणून दिले की त्याचें कौतुकच व्हायचे. आता जाणवते, बंगले, फ्लॅट्‌समध्ये राहूनसुद्धा आम्ही वाडा संस्कृती अनुभवली. राजू, संजूला सख्खी बहीण नाही, म्हणून आम्ही मुली त्यांना आणि इतरांना पण राखी बांधायला लागलो. तो प्रघात आजपर्यंत चालू आहे. दुर्दैवाने नूतन लवकर गेली. सुमा, लता अमेरिकेत, त्यामुळे मीच एकटी असते.

सुमा- लताचे पप्पा खूप कडक होते. आम्ही सगळेच त्यांना टरकून असायचो. पण रंगपंचमीला मात्र ते रंगाच्या कारखान्यातून रंग आणून मोठ्या घमेल्यात रंग कालवून आम्हाला सगळ्यांना अंघोळी घालायचे. तशीच चकोरच्या आजीची भीती वाटायची. त्याला हाक मारायला गेलो आणि त्या बाहेरच्या दगडी बाकावर बसलेल्या असल्या तर मागल्या पावली परत फिरायचो. आमची एकमेकांना बोलवायची खुणेची शिट्टी होती. मग लांब जाऊन ती शिट्टी वाजवली, की भिडूला बरोबर कळायचे. मला आता वाटते, की घरच्यांना पण ती माहिती होती. आम्हाला आपले वाटायचे, की ते आपले सिक्रेट आहे.

खरेच, इतकी निकोप मैत्री किती जणांच्या वाट्याला आली असेल? या जुन्या मैत्रीबद्दल आता लिहिण्याचे प्रयोजन काय, तर लता अमेरिकेहून आली होती त्या निमित्ताने आम्ही सगळे नुकतेच दोन दिवस महाबळेश्वरला गेलो होतो. खरे तर आतापर्यंत आम्ही एकत्र असे कुठे बाहेर गेलो नव्हतो. आता राखीपौर्णिमा सोडून फारसे भेटणेही होत नाही. म्हणून एकदा मनात येऊन गेले की तेव्हाचे ठीक होते, आता प्रत्येकाचे, विषय, व्यवसाय, व्यवधाने वेगळी, प्रत्येकाचे नवीन मित्रमंडळ. पुन्हा "ती' निरपेक्ष मैत्री अनुभवता येईल का? गप्पांना विषय मिळतील का? पण तुम्हाला सांगते, ते दोन दिवस अक्षरशः पंख लावून गेले. अखंड गप्पा गप्पा आणि गप्पा. गंमत म्हणजे पहिला दिवस फक्त हसण्यात गेला. आम्ही एकमेकांना काहीही म्हणू शकत असल्यामुळे फिरक्‍या घेत इतके हसलो, की सगळ्यांचे घसे बसले. दुसऱ्या दिवशी मात्र थोडे मनातले, मग नंतर चक्क आयुष्य- बियुष्याबद्दल बोलायला लागलो, खूप गोष्टी शेअर केल्या. एकमेकांकडून खूप काही शिकलो.

इथे मला आमच्या जोडीदारांचे शतशः आभार मानायचे आहेत. काही वर्षांपूर्वी सुमा इथे आलेली असताना आम्ही एक गेट टुगेदर ठरवले. मीना, अविनाश सगळेच होते, फक्त लताला जमणार नव्हते. प्रत्यक्षात मात्र त्या दिवशी लता तिथे हजर झाली. राज म्हणाला, सगळे जमणार आहेत. तू जायलाच हवेस, म्हणून मुद्दाम अमेरिकेहून तिला आठ दिवसांसाठी पाठवले.

लवकरच आमच्या मैत्रीचा सुवर्णमहोत्सव साजरा होईल. मैत्रीच्या बाबतीत कुबेरानेही हेवा करावा इतकी मी श्रीमंत आहे. म्हणूनच पूर्वापार चालत आलेली उक्ती थोडी बदलून म्हणावेसे वाटते, की स्वामी तिन्ही जगाचा मैत्रीविना भिकारी..