बोरं झाली कडू

मंजिरी पाटील
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

बाजारात बोरं दिसू लागली की लहानपणी बोरांसाठी केलेल्या गोष्टी आठवू लागतात. बांधावरच्या बोरीची बोरं गोळा करण्यातली मजा आठवते. बोरीचे काटे टोचणे आठवते. झाडावरून पडणे आठवते.

बाजारात बोरं दिसू लागली की लहानपणी बोरांसाठी केलेल्या गोष्टी आठवू लागतात. बांधावरच्या बोरीची बोरं गोळा करण्यातली मजा आठवते. बोरीचे काटे टोचणे आठवते. झाडावरून पडणे आठवते.

सहावी-सातवीच्या दिवाळीच्या सुटीतला हा प्रसंग. दिवाळीची सुटी आम्ही आमच्या मूळ गावी कामती येथे घालवत असू. सुटीत रोज पहाटे लवकर उठून मळ्यात पांदीपांदीने मोराची पिसे शोधत हिंडणे हा आवडता छंद होता. त्यानंतर बोरं पाडण्याचा जंगी कार्यक्रम असायचा. त्यावेळच्या दिवाळीत भरपूर थंडी असायची. बोरांचा हंगाम होता. सगळ्या पांदीत बोरांची झाडेच झाडे होती. गोड, आंबट, आंबटचिट्ट, चिट्टी बोरं, शेंबडी, म्हातारी, तुरट बोरं. खायला कोणतेही बोर वर्ज्य नसायचे. बोरांनी झाडे लगडून गेलेली असायची. थोडेसे झाडले तरी बोरांचा सडा पडत असे.

आमच्या काकाच्या आणि आमच्या सामाईक बांधावरची एक बोर खूप गोड आणि चविष्ट होती. ती बोरे खाण्यासाठी आमची वानरसेना टपलेली असायची. सगळ्यांचे मिळून ठरले की, आज या बोरीची बोरं खायची. झाड वाटेवर होते. येणारे-जाणारे वाटसरू बोरासाठी झाड झोडपत असत. त्यामुळे उंचच उंच शेंड्याकडेच बोरे शिल्लक राहिली होती. बोरं हाताला येत नव्हती, म्हणून एका-दोघांनी झाडावर चढायचे ठरले. आम्ही सगळे सात ते तेरा वर्षे वयोगटातले होतो. काकाची मुले मळ्यात राहात असल्याने धीट, चपळ होती. काकाच्या गुंड्याने आम्हाला शूरपणाने सांगितले, की "मी झाडावर चढतो आणि बोरं काठीने झाडतो. मला सवय आहे झाडावर चढण्याची.'' आम्ही बाकीच्या सर्वांनी त्याला होकार दिला. कधी एकदा बोरं खायला मिळतात असे झाले होते.

गुंड्या झाडावरती चढला. झाड बरेच उंच, आजूबाजूस भरपूर फांद्या असलेले. भरपूर काटेरीसुद्धा. गुंड्या बारीकसा असल्याने सरसर वरती गेला. परंतु, बोरं असलेल्या फांद्या जवळ नव्हत्या; म्हणून त्याच्या हातात आम्ही काठी दिली. तो एका जराशा रुंद फांदीवरून सरपटत सरपटत पुढे जाऊ लागला. एक हात त्याने आधारासाठी जवळच्याच दुसऱ्या एका फांदीला धरला होता. फांदीवर पालथे पडून तो एका हाताने काठी जोरजोरात बोरांनी लगडलेल्या फांदीवर मारत होता. बोरं टपाटपा खाली पडू लागल्याने त्याला चेव आला. तो अजून जोरात फांदी झाडू लागला. तेवढ्यात एका हाताने जोराने फांदीवर मारता मारता त्याचा फांदीला धरलेला दुसरा हात निसटला. तोल जाऊन तो जोरात खाली येऊ लागला. तिथे फांद्यांची जाळी झाली होती. त्या जाळीत गुंड्याचा शर्ट पाठीमागून अडकला. तो हवेत आडवा तरंगू लागला. दृष्य इतके भयानक होते, की काय करावे आम्हाला कोणालाच सुचत नव्हते. गुंड्या अडकलेला होता, ती फांदीसुद्धा मजबूत नव्हती. त्याच्या स्वतःच्या वजनाने तो अंदाजे पंधरा फुटांवरून खाली जमिनीवर पडू शकला असता. आम्हा बारा-पंधरा मुलांचा श्‍वास वरचा वर, खालचा खाली झाला होता. सगळे जणभर थंडीत घामाने डबडबलो होतो.

सगळ्यांच्या छातीचे ठोके इतके वाढले होते, की एकमेकांना ऐकू यायला लागले होते. जवळ कोणीही मोठ्या वयाचे माणूस नव्हते. मग मी व गुंड्याच्या मोठ्या भावाने असे ठरवले की, बाकीच्या सर्वांनी जमिनीवर गादीसारखे झोपून राहायचे. म्हणजे गुंड्या जिथे पडला असता, त्याच जागी बरोबर सगळ्यांनी अंथरूण केल्यासारखे पडून राहायचे. म्हणजे तो वरून पडला तरी किमान त्याचे डोके तरी फुटणार नाही. फार तर त्याचा किंवा आमच्यापैकी कुणाचा तरी हात-पायच मोडेल. थोडेफार खरचटेल इतकेच. मग आम्ही सर्वांनी तसेच केले. सगळेजण जमिनीवर झोपलो व गुंड्या वरून खाली पडण्याची वाट पाहू लागलो. हवेत आडवा तरंगत असलेला गुंड्या भीतीने पांढराफटक झाला होता. आमचीही अवस्था वेगळी नव्हतीच. थोड्याच वेळात त्याच्या वजनाने फांदी काडकन तुटली. गुंड्या आमच्या अंगावर बक्कन पडला. खूप वाईट अवस्था झाली होती सगळ्यांची. खाली पडल्यावर गुंड्या उठून बसला. त्याच्या जीवावरचे संकट टळले होते. पण आम्हा सगळ्यांनाच मुका मार बसला होता. कोणीच काहीच बोलत नव्हते. सगळ्यांच्या जिभा जणू टाळ्याला चिकटल्या होत्या. "दातखिळी बसणे' या म्हणीचा मला त्यादिवशी चांगलाच अर्थ कळला.

लगेचच सगळ्यांनी आपापल्या घरी सुंबाल्या केला. घरी गेलो तरी वातावरणात सन्नाटा पसरल्यागत वाटत होते. आज्जी, आई सारख्या म्हणत होत्या की, काहीतरी विचित्र घडलेय नक्कीच. नाहीतर ही माकडे अशी सहजासहजी शांत बसणारी नाहीत. काय झालेय याचा छडा लावलाच पाहिजे, पण आम्ही नुसते एकमेकांकडे पाहिले. आई, आजीची नजर चुकवली. नेमके काय घडले याचा शेवटपर्यंत कोणाला पत्ता लागू दिला नाही.

पण त्यानंतर पुढचे काही दिवस आम्ही मुले त्या बोरीकडे अजिबातच फिरकलोसुद्धा नाही. त्या झाडाकडे बघून, भूत बघितल्यासारखे, दुरून दुरून निघून जात असू. पुढे कित्येक दिवस आम्हा मुलांना त्या बोरीची बोरं अज्जिबात गोड लागली नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manjiri patil write article in muktapeeth