संपतचं कोडं!

मनोहर तत्त्ववादी
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

कुण्या गावचा संपत बाबांचा विद्यार्थी म्हणून आमच्या जवळ येतो आणि घरचाच होऊन जातो. माया लावतो आणि सगळ्यांना दुःखात लोटून निघूनही जातो. कोडे सुटत नाही त्याचे...

नागपूरला लक्ष्मीनगरला स्वतःच्या घरात राहायला आलो, त्या वेळेस मी जेमतेम पाच वर्षांचा होतो. बाबा शाळेत शिक्षक होते. त्यांची शाळा घरापासून दूर बर्डीवर होती. आमच्या घराच्या आसपास फक्त चार-पाच घरे होती. रस्ताही दगड-मातीचाच. बाबा शाळेतील मुलांचे फारच आवडते शिक्षक होते. मुलांच्या बरोबर मिळून मिसळून राहात. मुलांबरोबर सायकलवरून दर वर्षी लांबच्या सहलीला जात असत. बाबांच्या शाळेतील विद्यार्थी पण दुरून खेड्यापाड्यांतून शाळेत शिकायला येत. असाच एक बाबांचा विद्यार्थी संपत भिवापुरे.

संगम या पंधरा किलोमीटरवरच्या खेड्यातून बाबांच्या शाळेत शिकायला येत असे. संपत माझ्यापेक्षा बारा वर्षांनी मोठा होता. त्याचा पेहराव म्हणजे डोक्‍यावर स्वच्छ पांढरी टोपी, पांढरा सदरा आणि पांढरा पायजामा. त्याची गावात शेती आणि मोठे घर होते. दहा-पंधरा गाई, म्हशी होत्या. संपतचा दुधाचा धंदा होता. चांगली तीस-पस्तीस गिऱ्हाईके नागपूरची होती. त्यासाठी तो दररोज पहाटे चार वाजता उठून दूध काढून नागपूरला येत असे. दूध रतीब पहिला सरांच्या म्हणजे आमच्या घरी व नंतर बाकीच्या घरी. सर्व रतीब झाल्यावर दुधाच्या बरण्या आमच्या घरी ठेवून, शाळेचा गणवेश घालून सकाळी दहा वाजेपर्यंत शाळेत पोहोचत असे. शाळेच्या गणवेशात जरी पांढरी टोपी नसली, तरी संपतच्या डोक्‍यावर ती कायम असे.

त्याकाळी संगमला जायचा रस्ता फक्त बैलगाडीचाच होता. पावसाळ्यात तर तो रस्ता म्हणजे एक छोटा नालाच असायचा. हिवाळ्यामध्ये पहाटे भयंकर थंडी असायची. शाळेला सुटी असो वा नसो, तरीही संपतचा सकाळी सहा वाजताचा रतीबाचा नेम कधीच चुकला नाही. शिक्षणाची आवड आणि सरांवरच निस्सीम प्रेम यापुढे थंडी, पाऊस, ऊन-वारा इत्यादींचा सामना करणारा संपत भिवापुरे अकरावीत गेल्यावर शिक्षणाचे ओझे वाढले तसे सरांना म्हणजे आमच्या बाबांना जाणवले, की संपतला मदतीची आवश्‍यकता आहे. बाबांनी त्याला आमच्या घरीच राहून अभ्यास करावयास सुचविले. संपत बरोबर बाबांना बोलताना जाणवले, की त्याची आमच्या घरी राहायची इच्छा तर आहे, परंतु दुधाच्या धंद्याचे काय करावे, हा एक त्याचा 

फार मोठा प्रश्न होता. कारण त्यांच्या घराचे ते एक मोठे उत्पन्नाचे साधन होते.

आमचे घर जेवढे मोठे होते त्यापेक्षा घरचे अंगण दुप्पट मोठे होते. बाबांनी आमच्या घराचा एक भाग संपतला राहायला दिला. त्याच्या गाई-म्हशी आमच्या अंगणात बांधलेल्या गोठ्यात राहायला लागल्या. आता संपतचे गावाला येण्या-जाण्याचे श्रम वाचले. आम्हालाही एक छान सोबत मिळाली. आमचे इतके मोठे घर आणि अंगण आता भरलेले दिसायचे. तसेच, स्वच्छ आणि शेणाने सारवलेले. संपतने आम्हाला अंगणात भेंडी, फुलकोबी, ढेमसे, संत्रे, लिंबू, पपई इत्यादींची झाडे लावून दिली. आम्ही सर्व बाल-गोपाल मंडळी सतत संपतच्या बरोबर रमत असू. आम्हा लहान मुलांचा तर संपत एक सवंगडीच होता.दर रविवार आणि सुटीमध्ये आम्ही संपतच्या गावाला शेतावर जाऊन खूप मजा करत होतो. हिवाळ्यात आवळे, बोरे, चिंचा, करवंदे, ऐरोण्या इत्यादीची मजा चाखत असू. डाळिंबे, संत्रे, आंबे, पेरूसुद्धा तोडून खाण्याची मजा घेत होतो. इतकेच काय, तर, पोहणेसुद्धा मला संपतनेच गावाच्या नदीतच शिकवले. आमच्या प्रत्येक तिमाही, सहामाही आणि वार्षिक परीक्षांचा निकाल लागला की संपतकडून आमची ‘पार्टी’ ठरलेली असायची. हुरड्याच्या दिवसांत आमच्या सर्व नातेवाइकांना संपतकडून हुरडापार्टी असायची. त्यासाठी शेतात मुद्दाम लावलेला वाणीचा हुरडा, भरताची वांगी आणि भरपूर दही तयार असायचे. आम्ही बालगोपाल मंडळी सकाळपासूनच शेतामध्ये, झाडांमध्ये रमत असू. कधी कधी तर गावातच संपतच्या घरी रात्री थांबून सकाळी नागपूरला घरी जात होतो. माझा दहावीचा निकाल लागला तेव्हा संपत खूष झाला. तो मला ‘शतरंज’ चित्रपट बघायला घेऊन गेला.    

आता संपतकरिता घराच्या आवारातच एक छानशी टुमदार झोपडी बांधली गेली. संपतचे लग्न मोठ्या थाटामाटात गावाकडे झाले. संपतबरोबर गीता वहिनी झोपडीत राहायला आले. गाई-म्हशींचा गोठा साफ करणे, अंगण साफ ठेवणे, दूध काढणे इत्यादी कामात गीता वहिनी तरबेज होती. आईला सर्वच कामात ती मदत करत असे. आम्हाला तिच्या हातची भाकरी आणि वांग्याची भाजी खूप आवडायची. अचानक एक दिवस हिवतापाचे निमित्त झाले आणि संपत या जगातून कायमचा निघून गेला. खरेच अशी चांगली कष्टाळू माणसे आपल्याला जीव लावून या जगातून का लवकर जातात, हे मला पडलेले कोडे अजूनही सुटलेले नाही. संपतची शिक्षणाची ओढ, त्याचे गाईगुरांमध्ये रमणे, नागपूरला आमच्या अंगणात त्याने गोकुळ उभारणे, हे सारेच कोडे होते माझ्यासाठी. कोणा जन्माचा लळा लावणारे संपतचे कोडे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manohar tatwadi article Muktapeeth