त्यादिवशी मला माणूस होण्याची लाज वाटली...

दीपक सातारकर
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

एकूणच सर्वत्र दहशतीचे राज्य होते. एखादा यंत्रमानव वावरेल तसे तिथले हत्ती वावरत होते. केव्हा, कुठे आणि कसे हलायचे हे फक्त माहूत ठरवत होते आणि त्याची अंमलबजावणी त्याच्या हातातली काठी करत होती. जमिनीवर राहणाऱ्या सर्वात शक्तिशाली प्राण्याला साडेपाच फुटी आणि शरीराने अतिश्यय कृश अशा माणसाने केवळ दहशतीचा वापर करून आपलं गुलाम केलंय.

दिवाळीच्या सुट्टी मध्ये केरळ ट्रीपला जाण्याचा योग या वेळी आम्ही साधला. आणि मग बहुतांश लोक जसे पॅकेज घेतात तसं एक पॅकेज आम्हीसुद्धा निवडले. मुन्नार, टेकडी आणि अल्लापी. एक गाडी आपल्याला मिळते आणि ठराविक पर्यटन स्थळे पहायची अशी दिनचर्या ठरवून दिलेली असते. अशावेळी आपल्याला लाभलेला गाडीचा ड्रायव्हर हा अत्यंत निर्विकारपणे आपल्याला त्या त्या स्थळांना घेऊन जातो आणि आपण तिथे असलेले विविध उपक्रम पार पाडत असतो. यात आपण सहसा जास्त फरक करत नाही. मुन्नारच्या नयनरम्य मुक्कामानंतर आम्ही टेकडीला पोचलो. एलिफंट राईड, एलिफंड बाथ या दुष्ट चक्रात आम्हीही अडकलो. इथे माणशी १००० रुपये भरून आपल्याला हत्तीवर स्वार होता येते.

२० मिनिटे आपण हत्तीवर  बसून चक्कर मारायची आणि मग हत्तीला अंघोळ घालणे, हत्तीने आपल्या अंगावर सोंडेने पाणी उडवणे असा मनाला भुलवणारा उपक्रम करायचा. तिकीट खिडकीजवळ आम्ही जरा वेगळ्या अनुभवाचे चित्र डोळ्यासमोर रंगवले आणि पैसे भरून या भाऊगर्दीत सामील झालो.

माणूस आपल्या बुद्धिमत्तेचा, ताकदीचा (?) आणि दहशतीचा वापर करून इतर प्राण्यांना कसा गुलाम बनवतो याचे हे एक उत्तम उदाहरण. हत्तीवर स्वार होऊन चक्कर मारून येईपर्यंत सर्व काही ठीक वाटले. पण चक्कर मारून आल्यावर सर्व हौशी पर्यटकांना हत्ती बरोबर छायाचित्र काढून घेण्यात खूप मोठी आवड असते. त्यात आता मोबाईल फोनमध्ये उत्तमोत्तम कॅमेरा असल्यामुळे, हे सहज शक्य झालंय. हीच नाडी ओळखून हत्तीचे माहूत आता आपले फोटोग्राफरसुद्धा बनतात.

आपल्याला हत्तीच्या पुढे उभे केले जाते आणि हत्ती आपल्या डोक्यावर हलकेच सोंड टेकवून आपला फोटो काढला जातो. आणि इथेच मला हत्तीवर केले जाणारे जुलूम प्रथम दृष्टीस पडले. आमचा (?) हत्ती काही केल्या सोंड वर करून फोटोला साजेशी पोज देईना. वेळ दवडणे म्हणजे पैसे दवडणे इतकी सहज सोपी व्याख्या या व्यापाऱयांनी केली आहे. मग हत्तीवर काठी उगारण्यात आली. तसे भयभीत होऊन त्याने सोंड वर केली आणि फोटोचे सोपस्कार पार पडले.

हत्तीवर काठी उगारणाऱया माहूताच्या डोळ्यात प्रचंड राग होता आणि हत्तीचे डोळे केविलवाणे झाले होते. काठीचा प्रहार डोळ्यावर होऊ नये म्हणून त्याने क्षणभर डोळे घट्ट बंद करून घेतले. आमच्या मनात प्रचंड काहूर माजले होते. फोटो काढून घेण्यासाठी माणूस इतर प्राण्यांवर इतके अत्याचार करू शकतो?

पुढे आम्ही हत्तीला अंघोळ घालणे आणि हत्तीने आपल्या अंगावर पाणी उडवणे या प्रकाराकडे वळालो. वास्तविक हे चित्र भयानक होते. एका छोट्या हौदात हत्ती एका अंगावर पहुडला होता. आता मला हत्तीच्या प्रत्येक कृतीमध्ये माणसाची दहशत दिसत होती.

ती एक हत्तीण होती आणि तिला एका अंगावर पडून राहायचे, लोकांनी अंगावर पाणी उडवले, जाड ब्रशने अंग घासले, अंगावर बसून आरडओरड केली तरी निमूटपणे सहन करायचे असे ट्रेनिंग दिले गेले होते. दिवसभर त्या गार पाण्यात पाय आखडून पडून राहणे हे काही काळ्या पाण्याच्या शिक्षेपेक्षा कमी नाही. आंघोळ घालणे म्हणजे काय तर माहूत तिच्या अंगावर एक इंच व्यासाच्या नळीतून पाणी फवारणार आणि आपण जाड ब्रशने तिचे अंग घासायचे. कल्पनाच करवत नाही. आधीच दिवसभर पाण्यात पडून तिची त्वचा मऊ पडली होती. आम्ही फक्त हाताने थापटून, तिला एका त्रासातून वाचवले इतकेच.

पुढे मग तिला उठून बसण्याचा आदेश दिला गेला, अर्थातच काठीचा प्रहार देऊन. तशी ती केविलवाणी होऊन बसली. तिच्या डोळ्यातली प्रचंड निराशा कोणाच्याही नजरेतून सुटली नाही. माणूस तिच्या पाठीवर बसला की मग सोंड पाण्यात बुडवून ती मागे बसलेल्या माणसाच्या अंगावर ते पाणी उडवायची आणि अर्थातच या प्रत्येक क्रियेसाठी तिला सतत सोंडेवर काठीचे प्रहार सहन करावे लागत होते. दिलेला आदेश वेळेत पाळला नाही तर आणखीन प्रहार दिले जात होते.

बाजूलाच हत्तीसाठी उभारलेल्या शेड्स होत्या. तिथे एक आणखीन भयानक दृश्य पाहायला मिळाले. एका माहुताने हत्तीला अक्षरशः पळवत आणले. पायात साखळी बांधून त्याने त्या हत्तीच्या डोळ्याखाली काठीचे जोरदार प्रहार केले.

भयानक चिडून मारणे म्हणजे काय हे आम्ही प्रत्यक्ष पाहत होतो. तो हत्ती केविलवाणा होऊन एक पाय वर करून आणि जोरात मान नकारार्थी हलवून दयेची भिक मागत होता. पण दुसरीकडे दया नव्हती. तिथे फक्त रागाचा उद्रेक होता. मारणाऱयाचा राग शांत होईपर्यंत त्याला डोळ्याखाली ते प्रहार सहन करावेच लागले. आणि ते भय इतके होते की हत्तीने मुत्रविसर्जन केले आणि मगच जाऊन त्या माहुताचा राग शांत झाला. कदाचित फेरी मारण्यामध्ये त्या हत्तीने काही आदेश पाळले नसावेत. आणि त्याची ही शिक्षा त्याने भोगली.

एकूणच सर्वत्र दहशतीचे राज्य होते. एखादा यंत्रमानव वावरेल तसे तिथले हत्ती वावरत होते. केव्हा, कुठे आणि कसे हलायचे हे फक्त माहूत ठरवत होते आणि त्याची अंमलबजावणी त्याच्या हातातली काठी करत होती. जमिनीवर राहणाऱ्या सर्वात शक्तिशाली प्राण्याला साडेपाच फुटी आणि शरीराने अतिश्यय कृश अशा माणसाने केवळ दहशतीचा वापर करून आपलं गुलाम केलंय.

त्यादिवशी प्रथमच मला माणूस होण्याची लाज वाटली...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi article citizen journalism Marathi Muktapeeth article Deepak Satarkar