घामाचा तंतोतंत ठसा उमटविणारा कवितासंग्रह ः ‘तंतोतंत’

Tantotant
Tantotant

जळगाव - संग्रहातील कविता वर्तमानातील वास्तव मांडत समाजव्यवस्थेला सूचक वाट निर्माण करून देणाऱ्या आहेत. कवीच्या शब्दांतील सामर्थ्य व्यवस्थेला सुरुंग लावणारे आहे. मातीशी नाते असणारे आहे आणि नैराश्याच्या गर्तेत असणाऱ्या माणसाला बळ देणारे, नवी उमेद उभारणारे आहे. कवितेतून आपल्या शब्दांतून आशावाद निर्माण करतात. तोकडी स्वप्ने पाहणाऱ्या आणि थोतांड माजविणाऱ्या तथाकथित चेहऱ्यांना सवाल करत जाब विचारतात. आपल्या ‘आयुष्याच्या घागरीत’ कवितेत ते मांडतात... 

हमेशा तळहात तपासून घेण्याला कार्य अर्थ आहे 
हिंडणाऱ्या तळपायाची सल 
उगीच कशी कमी होणार आहे 
बिगरकाट्याचे रस्ते नसतात 
जगणं हंगामाला घ्यावंच लागतं जोडून... 

जगण्याला अर्थ प्राप्त करून घेण्यासाठी कष्टाशिवाय, श्रमाशिवाय आणि ज्ञानाशिवाय पर्याय नाही, असे ज्यावेळी कवी मांडतात, त्याचवेळी ते हेदेखील मांडतात, जीवन ही अडथळ्यांची शर्यत आहे. गरिबाची, शेतकऱ्याची दुःखे कमी होणारी नाहीत. तळहात पाहून भविष्य सांगणारा फसविणारा आणि शोषणारादेखील आहे. आपल्या जीवनात आलेले चढउतार, सुख-दुःख ही वाटेवरची जीवनानुभवाची शिदोरीच आहे. या शिदोरीत आपले अनेक अनुभव साठवलेले आहेत; त्यासोबत साठणारेदेखील आहेत. जीवनातला संघर्ष सोप्पा नाही आणि म्हणूनच संघर्षासोबत जगण्याची सवयच करावी लागणार असल्याचे कवी मांडतात. संघर्ष करीत आलेल्या साऱ्या संकटांना तोंड देत वाट मोकळी करून घेत पदरात पडणाऱ्या सुखाची चाहूल लागल्याचा आनंद वेगळाच असतो. 

वर्तमानात जगताना परिस्थितीचे भान जपत जीवनाची वाट धुंडाळत ज्यावेळी माणसे आपल्याच सुख-दुःखाचा वाटेकरी, सोबती आणि माणूस म्हणूनच जगणाऱ्याला जेव्हा दंश करतात, अडथळे निर्माण करतात, जिवावर उठतात, अशांविषयी कवी देशमुख आपल्या ‘देशाबद्दल’ कवितेतून ते किती धोकादायक असतात, याचे वर्णन करतात... 

चावणारे धावणारे विंचू परवडतात, पण 
गूळ देऊन गळा दाबणारे धोकादायकच 
दंशाबद्दल मला वाटत नाही भय, पण 
पाठीला सुरा लावणारे परम् धोकादायकच 
विष काय नवीन आहे, ते पूर्वपरिचयाचेच, पण 
अमृतात पाणी मिसळून विकणारे महाधोकादायक...
 

शेता-मातीतला विंचू परवडतो. काही तासांपर्यंत असलेली शरीरातली आग शमते. चावणारा विंचू अमुकच व्यक्तीला चावण्याचे ठरवीत नसतो. पण, आजूबाजूलाच सोबतीलाच असणारी माणसे अडचणीत आणण्यासाठी आणि आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी पाठीला सुरा लावून वेळ पडल्यास जीव घेण्याचे कपट करतात, अशी माणसे धोकादायक आहेतच. पण, लहान- लहान लेकरांना आवश्यक असणाऱ्या दुधात पाणी मिसळून आपला स्वार्थ साधणाऱ्या माणसाची वृत्ती किती महाधोकादायक आणि जीवघेणी आहे, हे कवी मांडतात. माणूसच माणसाचे शोषण करतोय, फसवतोय आणि जीवघेणादेखील ठरतोय. वर्तमानातील ही अस्वस्थता भयानक आहे शिकल्या- सवरलेल्या; त्यातल्या त्यात ज्ञानानेही पुढे गेलेल्या आणि स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणारा माणूसच हा सूड, फसवणूक, शोषण आणि अत्याचार करण्यात पराकोटीचा पुढे गेलेला आहे. 

शेतकऱ्यानं मातीला, अन् मातीने कधी शेतकऱ्याला फसविल्याचे ऐकिवात नाही. जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी आणि शेतातली माती प्रत्येकाच्या भुकेची काळजी घेते. इथली नाही तर तिथली माती पेरलेल्या ‘बी’ वा कणीस करून माणसाच्या भुकेची आग शमवत असते. भुकेची आग शमवणारा माणूस ज्यावेळी आपल्याच माणसांची भूक हिरावून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो निश्चितच धोकादायक असतो. यामुळेच कवी अशा धोकादायक वृत्ती असणाऱ्या, पाठीत सुरा लावणाऱ्या आणि लेकराच्या दुधात पाणी मिसळणाऱ्या आणि माणसाच्याच जिवाचा सौदा करणाऱ्या माणसाची वर्तमानातील स्थिती मांडून अशा वृत्तीपासून सावध राहण्याचा इशारा देत अशांना मातीमोल करण्याचेदेखील सांगतात. 

कवीची कविता मानसिक ऊर्जा निर्माण करण्याबरोबर, शब्दांमध्ये जो जीव ओतते, त्या कवितेबद्दल, कवीबद्दलच ‘अक्षरांचे पक्षी’ या कवितेत मांडतात... 

मी कवी, 
रेघांच्या फांदीला झोका बांधणारा 
फांदीवर बसलेल्या अक्षरांच्या पाखरांना बोलवणारा 
कवितेच्या ऋतुचक्रात डोळे भिजवणारा 
एखादा तरी ढग मातीत पेरू पाहणारा... 

सामाजिक भान जपत आपल्या शब्दाच्या माध्यमातून शेतकऱ्याचे दुःख समजावून घेत परिस्थितीचे भान ठेवत आपल्या मातीशी इमान राखतो. कवितेतले, कवीचे सामर्थ्य केशवसुतांनी मांडलले आहे. जगातल्या सुख-दुःखाची नाळ कवीच्या शब्दाशी जोडली गेलेली आहे आणि म्हणूनच कवी केशव देशमुख आपल्या कवितेच्या ऋतुचक्रात डोळे भिजवत शेतकऱ्यांसाठी, इथल्या मातीसाठी ढग मातीत पेरण्याचे धाडस करतात. कवीच्या इच्छाशक्तीचा अक्षरांनादेखील हेवा वाटावा असे चित्र निश्चितपणे वाचकाला भुरळ घालते.


शेती-मातीशी लळा असलेला कवी आपल्या जीवनानुभवाचा आनंद कशात आहे? काल्पनिक आणि अल्पशा सुखाचा शोध घेणाऱ्यांना कष्टाचे सुख ज्या मातीतून मिळते, त्या ‘मातीचे गायन’ कवी करतात; ते म्हणतात... 

वावरातली माती मी हुंगून घेतो 
पावसाची लिपी मी समजून घेतो 
गाडलेल्या बीजांची मला कळते भाषा 
पिकांच्या काळजांची मला उमजते आशा... 

शेतकऱ्यांना आपल्या जीवनात आशावाद निर्माण करून देत शेतकरीपुत्र असण्याचा सार्थ अभिमान बाळगणारे कवी केशव सखाराम देशमुख यांनी शेतातल्या मातीशी संवाद साधत त्या मातीला केला जाणारा स्पर्श आणि त्या मातीतून शरीराला मिळत जाणारी चेतना, डोळ्याला मिळणारे तेज, मातीत असणाऱ्या बीजाची नवनिर्मितीची धारणा, त्या मातीशी स्पर्श केल्यानंतर कळत जाते. त्या शेती-मातीशी इमान राखणाऱ्यांचा येणाऱ्या पिकाची, त्याच्या काळजांची भाषा कळत जाते, हेदेखील कवी मांडतात. उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांना, विनासायास, कामचलाऊ आणि आपल्याच गर्तेत राहणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल कळणारे नाही. त्यासाठी आपल्या मातीशी इमान राखावे लागेल, त्या मातीला स्पर्श करावा लागेल, तरच त्या पिकाच्या, मातीच्या हृदयाला हात घालू शकतो, हे कवी मांडतात. 

शेती-मातीच्या कवितेसोबतच वास्तव परिस्थितीचे भान जपत कवी लिहिणाऱ्याला, बोलणाऱ्याला कसे रोखले जातेय आणि अन्याय- अत्याचाराविरुद्ध मांडणाऱ्याला धमकावले जातंय, कवी ‘ब’ या कवितेत सभोवतालच्या वास्तव परिस्थितीचे वर्णन करताना ‘हो’ किंवा ‘नाही’च्या संवादात... 

जिभेला बसवला जातो गतिरोधक 
तोंडातून भाषा हिसकून घेतली जाते 
आणि 
अबोलांच्या पंक्तीत बसवले जातेय... 

मानवी समाजव्यवस्थेत चाललेला हा घोडेबाजार लेखणीला खरीदण्याची आणि व्यवहारच झाला नाही तर मारण्याची मजल जात असलेल्या राजकारण्यांची हिम्मत कोणत्या टोकाला जात असते, याच वास्तव कवी आपल्या कवितेतून मांडतात. न्याय मिळण्यासाठी धडपडणारी सामान्य माणसे, स्त्रिया न्यायापासून वंचित राहतात. अन्याय करणारे मात्र मोकाट फिरतात. मोकाट फिरणाऱ्या, अन्यायी, भोगवादी, अत्याचारी मानसिकतेच्या विरोधात लिखाण करणाऱ्या लेखक, कवीला धमकावले जाऊन वेळप्रसंगी त्यांना जीव गमवावा लागल्याची उदाहरणे आहेत. म्हणूनच कवी अबोलांच्या पंक्तीत धमकी देऊन बसवले जाण्याची वास्तवता मांडतात आणि स्वतःला सावधदेखील करतात. आपल्या स्वतःच्या शब्दांवर, लेखणीवर समाधानी, आत्मविश्‍वास असणारे कवी केशव देशमुख आपल्या ‘हल्ली’ या कवितेत शब्दांना आणि मेंदूतली धग जपून ठेवण्याबद्दल सांगतात... 

लिहिणाऱ्या माणसांनो, 
शाईचा रंग बघत बसू नका 
लेखणीतली रग आजमावून बघा 
मेंदूतली धग जपून ठेवा 
तरच लिहिण्याला काहीएक अर्थ आहे... 

आपल्या शब्दातली आक्रमकता अन्याय- अत्याचाराविरोधात जनमानसात बंड करून उठण्याची ताकद निर्माण करू शकतो. शब्दाच्या सोबतच मेंदूतली धग प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या विरोधात आणि सामान्याला, शेतकऱ्याला, गरिबाला, शोषिताला न्याय मिळवून देण्यासाठी जपून ठेवण्याचे विचारच कवी कवितेतून मांडतात. शोषणारा शोषक उजाड माथ्याने समाजात फिरताना दिसतोय आणि अन्यायग्रस्त, भयभीत झालेला सामान्य माणून घरात भीतीपोटी लपून बसतोय. ही परिस्थिती बदलविण्याची क्षमता लिहिणाऱ्याच्या लेखणीत, शब्दांत आणि त्याच्या व्यक्त होण्यात आहे. 

‘तंतोतंत’ कवितासंग्रहात १०३ कवितांचा समावेश असून, कविता वाचकांच्या मनाचा तंतोतंत ठाव घेणाऱ्या आहेत. कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांनी रेखाटले आहे. पुणे येथील पद्मगंधा प्रकाशनने तो प्रकाशित केला आहे. कवी केशव सखाराम देशमुख आपल्या शेती-मातीशी इमान राखत आपल्या शेतकऱ्याचे, शेतमजुराचे, मातीचे, अन्यायाचे अन् दारिद्य्राच्या वास्तवतेचा आशय कवितेतून मांडत आपल्या शब्दाप्रती कृतज्ञताही व्यक्त करतात. त्यांच्या लेखणीतून वास्तवतेचे चित्रण सदोदित झिरपत राहो, या सदिच्छेसह मनापासून मंगल कामना...! 

(लेखक जळगाव येथील सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष आहेत.) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com