
बालपण हा आयुष्याचा पाया आहे. याच काळात स्मार्टफोनमुळे मुलांच्या मानसिकतेला ग्रहण लागल्यास त्याचे भविष्यात भयंकर परिणाम दिसू शकतात. वेळीच सावध होऊन पालकांनी स्मार्टफोनबाबत योग्य भूमिका घेतल्यास ते आपल्या लहान मुलांना सुंदर बालपण देऊ शकतात. फक्त त्यांनी स्मार्टफोनबद्दल धोक्याचा इशारा समजण्याची गरज आहे...
"लॉकडाउन'मध्ये दोन महिने सर्वजण घरातच अडकून पडले होते. लहान मुलांना उन्हाळ्याच्या सुट्या घरातच काढाव्या लागल्या. सुट्यांमध्ये लहान मुलांना खेळायला बाहेर जाताच आले नाही. त्यामुळे मनोरंजनासाठी त्यांनी घरात टीव्ही पाहिला किंवा घरातील मोठ्या सदस्यांचा स्मार्टफोन ताब्यात घेऊन त्यावर वेळ घालविला. "लॉकडाउन'मध्ये अनेक लहान मुलांना स्मार्टफोनची सवय लागल्याचे आता निदर्शनास आले आहे.
पालक अगदी दोन वर्षांच्या मुलालाही सहजपणे हातामध्ये स्मार्टफोन देऊन टाकतात. लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात जिज्ञासू वृत्ती असते. शिवाय, शिकण्याची प्रवृत्तीही याच वयात सर्वांत जास्त असते. त्यामुळे लहान मुले "लॉक' उघडण्यापासून फोटो आणि व्हिडिओ शोधण्यापर्यंत तसेच गेम आणि विविध ऍप्लिकेशन डाउनलोड करणे आणि गेम खेळणे या गोष्टी लगेच शिकून जातात. स्मार्टफोन हे त्यांच्या मनोरंजनाचे साधन बनून जाते. मात्र, लहान मुले स्मार्टफोनच्या व्यसनाला लवकर बळी पडतात आणि नंतर त्याचे दुष्परिणाम दिसायला सुरवात होते. एकटक स्मार्टफोनकडे बघितल्यामुळे डोळ्यांना त्रास व्हायला सुरवात होते. हालचाल न झाल्यामुळे हाडांचे आजार जडतात.
लहान मुलांकडे मोठ्या प्रमाणात शारीरिक ऊर्जा असते. एका जागेवर बसून स्मार्टफोन खेळल्यामुळे ती ऊर्जा खर्ची पडत नाही. त्यामुळे भुकेवर परिणाम होतो. भूक लागत नाही. नीट जेवण न केल्यामुळे अनेक पोषक तत्त्वांची कमतरता निर्माण होते. त्यामुळे प्रतिकारक्षमता कमी होते. त्यातून अनेक आजार जडू शकतात. स्मार्टफोनचे व्यसन लागल्यामुळे तो न दिसल्यास लहान मुलांमध्ये चिडचिडेपणा, हट्टीपणा, आक्रमकपणा वाढत जातो. याचा परिणाम त्याच्या मानसिकतेवर होतो. जोरजोरात रडणे, जमिनीवर लोळणे, घरात आदळआपट करणे, ओरडणे ही त्याची लक्षणे आहेत.
स्मार्टफोनच्या व्यसनामुळे शिकण्याची प्रवृत्ती कमी होत जाते, कल्पकता कमी होते, विचार करण्याच्या पद्धतीवर विपरीत परिणाम होतात, तसेच लहान मुले अतिचंचल बनतात. त्यांच्या एकाग्रतेवर भयंकर नकारात्मक परिणाम होतो. लहान मुलांना जेवताना स्मार्टफोन दाखविणेही चुकीचे आहे. त्यामुळे लहान मुलांची कंडिशनिंग होऊन त्यांची भूक नैसर्गिकरीत्या नियंत्रित व्हायला लागते. शरीरातील जैविक घड्याळावर परिणाम झाल्यामुळे त्यांना नैसर्गिकरीत्या भूक लागत नाही.
स्मार्टफोनचे व्यसन लागल्यामुळे लहान मुलांमध्ये भावनिक अस्थिरता निर्माण होते. त्यातून त्यांची आई-वडिलांप्रति अटॅचमेंट कमी होत जाते आणि ते आई-वडिलांना परकी व्यक्ती समजायला लागतात. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे लहान मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतात. पालकांनी याबाबत वेळीच सावध होण्याची गरज आहे. त्यांनी लहान मुलांना स्मार्टफोनव्यतिरिक्त इतर छान पर्याय निर्माण करून द्यावेत. खेळ आणि छंद स्मार्टफोनला अतिशय चांगले पर्याय आहेत. पालकांनी स्वतःसुद्धा मुलांना वेळ द्यावा. शिवाय, आधी स्मार्टफोन वापरण्याबाबत स्वतःवर नियंत्रण ठेवावे.
बालपण हा आयुष्याचा पाया आहे. याच काळात स्मार्टफोनमुळे मुलांच्या मानसिकतेला ग्रहण लागल्यास त्याचे भविष्यात भयंकर परिणाम दिसू शकतात. वेळीच सावध होऊन पालकांनी स्मार्टफोनबाबत योग्य भूमिका घेतल्यास ते आपल्या लहान मुलांना सुंदर बालपण देऊ शकतात. फक्त त्यांनी स्मार्टफोनबद्दल धोक्याचा इशारा समजण्याची गरज आहे.
(लेखक "जिंदगी फाउंडेशन' या बाल समुपदेशनावर काम करणाऱ्या संस्थेचे पदाधिकारी आहेत.)