शुभ-अशुभाचा फिटे किनारा

शुभ-अशुभाचा फिटे किनारा

तिचा काहीच दोष नव्हता, तरी तीच जणू अपराधी असल्यागत जग तिच्याकडे पाहू लागेल, फुलण्याआधीच ती कोमेजणार असे वाटत असतानाच, फुंकर घालून पाकळ्या फुलवणाराही तिच्या आयुष्यात आला.

अगदी जवळच्या नात्यातली ही गोष्ट. माझ्या नातीचीच. माझ्या भाचीची एकुलती मुलगी इंदोरला आजोळी राहून शिकली आणि तिथेच नोकरी करीत होती. इंदोरच्याच विवाह मंडळात तिने नाव नोंदवले होते. भाचेजावयांची नोकरी दुसऱ्या शहरात होती. त्यामुळे वेळ काढून भाची व भाचेजावई यांनी आपल्या मुलीसाठी परिचयाची पत्रिका निघाल्यावर अनुरूप स्थळे निवडून स्थळ पाहायला सुरवात केली होती. एक मुलगा आवडला. उज्जैनला हे कुटुंब स्थायिक झाले होते. अनघा व रोहित यांच्या पत्रिका जुळल्या. लग्न ठरले. थाटामाटात साखरपुडा झाला. दोन्ही बाजू हौशी व सधन असल्याने थोडा जोरातच साखरपुडा झाला. उज्जैनला लग्न होणार होते. आदल्या रात्री सीमांतपूजन व स्वागत समारंभ आणि दुसऱ्या दिवशी लग्न असे ठरले.

दोन्हीकडील मंडळी तयारीला लागली. सुंदर लग्नपत्रिका छापून नातेवाइकांना आमंत्रण केले गेले. उज्जैनचे एका बगीच्यातील मंगलकार्यालय सजवले गेले. शेजारच्या चांगल्या हॉटेलमध्ये खोल्या आरक्षित करण्यात आल्या. मुलीचे आई-बाबा तिला घेऊन आठवडाभर आधीच इंदोरला पोचले. लग्नाच्या भेटवस्तूंनी अख्खे घर भरून गेले होते. आजोळघरी मुलीचे आजी-आजोबा, मामा-मामी व मामेबहीण असे सर्व राहत होते.
लग्न चार दिवसांवर आले होते आणि कामे ढीगभर पडली होती. सगळ्यांचीच लगबग सुरू होती. अनघा व रोहित यांच्या तिन्ही त्रिकाळ मोबाईलवर गप्पा सुरू होत्या. त्यांचे पुढचे नियोजन सुरू होते. मुलींची वेगळीच गडबड सुरू होती. मेंदी कधी लावायची, ड्रेस कोणते घालायचे, डान्स कुठल्या गाण्यावर करायचा वगैरे बेत ठरत होते. नवऱ्या मुलाचे जोडे लपवून "जुते छुपाने के मै तो दो हजार का नया नोट नेक में लुंगी' असे जबरदस्त प्लॅनिंग करून आपल्या अनघाताईला चिडवणे सुरू होते. सर्व उत्साहाचे, आनंदाचे वातावरण होते.

मी मूळची उज्जैनची असल्याने पुण्याहून आठवडाभर आधीच उज्जैनला पोचले. इंदोरमधील लग्नघरी चाललेली गडबड सकाळ- संध्याकाळ फोनवरून कळत होती. त्यादिवशी रात्री टीव्हीवर मी काहीतरी पाहत बसले होते. तेवढ्यात मोबाईल वाजला. माझ्या "हॅलो'चीच वाट पाहत असल्यागत पलीकडचा आवाज बोलू लागला, "मी अनघाचा मामा बोलतोय.' भाच्याचा आवाज एकदम बदललेला. थोडा कंप मला इथे मोबाईलवरही जाणवला. म्हणाला, ""मौशी, सब अनर्थ हो गया।'' अनघाच्या होणाऱ्या नवऱ्याचा म्हणजे रोहितचा पुण्याला अपघात झाला होता. तो कामावरून घरी निघाला होता. घरी जाऊन आवरून उज्जैनला निघणार होता. पण, त्याआधीच एका वळणावर ट्रकने धडक दिली आणि तो जागीच ठार झाला. ही क्रूर बातमी ऐकताच माझ्या तोंडून शब्द फुटेना. डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले फक्त. हे काय भलतेच घडले. अजून चारच दिवसांनी तो बोहल्यावर चढणार होता आणि दैवाने कसा घात केला?
रोहितच्या बाबांनी त्याला फोन केला होता. "बेटा तू केव्हा निघतोस?' हा प्रश्‍न विचारण्याआधीच पोलिसांनी फोनवर सांगितले, की "उस की तो मृत्यु हो चुकी है।' काय वाटले असेल नवरदेवाच्या पित्याला? कशी त्यांनी ही बातमी त्याच्या आईला दिली असेल? एकदम होत्याचे नव्हते झाले. दोन्ही परिवार आतापावेतो आनंदात होते, ते एकदम दुःखसागरात बुडाले.
सर्व नातेवाइकांना कळवले, कोणीच घरून निघू नका.

शेवटी काय, हेच खरे, की आपण त्या जगन्नियंत्याच्या हातातली कळसूत्री बाहुली आहोत. तो नाचवेल तोवर नाचायचे. नाहीतर.... आपण त्याच्या हातचे खेळणे आहोत. एका गाण्याची ओळ आठवते, "जितनी चाबी भरी रामने, उतना चले खिलौना.' पण चाबी अशी भलत्या वेळेस संपायला नको होती. आता सर्वांना दुसरीच काळजी लागली. जे घडले त्यात अनघाचा काहीच दोष नव्हता, तरी तीच जणू अपराधी असल्यागत जग तिच्याकडे पाहू लागेल. आता हिचे लग्न कसे होणार? लग्नाआधी मुलाचा मृत्यू म्हणजे प्रत्येकजण म्हणणार, अशी अपशकुनी मुलगी नको.

पण सगळेच असा विचार करत नाहीत. जगात सुविचारी माणसेही आहेतच, याचा प्रत्यय लवकरच आला. इंदोरच्याच एका परिवाराने अनघाला मागणी घातली. फुलण्याआधीच ती कोमेजणार असे वाटत असतानाच फुंकर घालून पाकळ्या फुलवणाराही तिच्या आयुष्यात आला. ते म्हणाले, ""मुलीचा फोटो पाहिला, तिचा बायोडेटा आम्ही वाचला. आम्हाला पटला म्हणून आम्ही मुलगी पाहायला येतो.'' मुलीच्या आईने त्यांना झालेली घटना सांगितली. ते म्हणाले, ""त्यात मुलीचा काहीच दोष नाही. आम्ही मुलगी पाहायला येतो.'' मुलाला मुलगी आवडली. दोन्ही परिवारांची सहमती झाली.
आणि अनघाच्या आयुष्यातील शुभाशुभाचा फिटला किनारा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com