सापडता सापडेना... (मुक्‍तपीठ)

meena-ambekar
meena-ambekar

त्या वेळी ऑनलाइन ॲडमिशन्स होत नव्हत्या. आमच्या महाविद्यालयामध्ये अकरावीच्या प्रवेशाची गडबड चालली होती. प्रवेशासाठी प्रचंड रांग होती. एक पालक आपल्या मुलीला घेऊन सकाळपासून रांगेत उभे होते. त्यांचा नंबर आला. प्रवेशासाठी लागणारी सर्व कागदपत्रे त्यांनी बॅगेत ठेवली होती; पण आयत्यावेळी शाळा सोडल्याचा दाखला काही त्यांना बॅगेमध्ये सापडेना. त्यांच्यामागचे रांगेतले लोक ओरडू लागले. मग त्यांना बाजूला थांबावे लागले. त्यांचा नंबर गेला. ते अधिकच गोंधळून गेले; मुलगीही रडवेली झाली होती.

ते मला भेटायला आले. मी म्हटले, ‘‘बॅग पुन्हा एकदा शांतपणे बघा.’’ त्यांनी सगळी ब्रीफकेसच पालथी केली! अरे बापरे! तिच्यात असंख्य कागदपत्रे होती. ऑफिसचे कागद, घरची बिले, याद्या, पत्रे, अर्ज, पाकिटे, इतकेच नाही तर बॅंकेच्या फिक्‍स्ड डिपॉझिट रिसिट्‌सही त्यात होत्या! ती बॅग बहुधा दोन- तीन वर्षांत तरी साफ केलेली नव्हती. निरुपयोगी आणि अत्यंत महत्त्वाची अशी सर्व कागदपत्रे एकत्रच अस्ताव्यस्त होती. या गोंधळात तो दाखला काही तोंड दाखवायला तयार नव्हता. मी म्हटले, ‘‘तुम्ही कदाचित घरी विसरला असाल, घरी जाऊन पुन्हा एकदा बॅगेतही नीट बघा आणि घरीही बघा, सापडेल दाखला. उद्या प्रवेश घ्यायला या.’’

ते दोघेही प्रचंड तणावामध्येच माझ्या कार्यालयातून बाहेर पडले. एक तर त्यांनी रजा घेतलेला दिवस वाया गेला होता आणि उद्या पुन्हा रजा घ्यावी लागणार होती; दुसरे म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला हा अतिमहत्त्वाचा कागद कुठेतरी गहाळ झाला होता! आता तो कुठे मिळणार आणि प्रवेशाचे काय होणार, असे अनेक प्रश्‍न त्यांच्यासमोर उभे होते. दुसऱ्या दिवशी दोघेही माझ्याकडे परत आले. सांगत होते, ‘‘घरी गेल्यावर बॅगेमधला प्रत्येक कागद उघडून पाहिला, तर एका मोठ्या कागदाच्या घडीत तो दाखला सापडला. त्यांना लगेच प्रवेश मिळाला; पण दोन तासांच्या कामाला त्यांना दोन दिवस लागले. शिवाय, मनस्ताप झाला तो वेगळाच!

कशामुळे बरे हे झाले? उत्तर अर्थातच होते, की त्यांच्या बॅगेत असलेले क्‍लटर! दोन- तीन वर्षांचे असंख्य कागद तिथे कोंबलेले! नको असलेले कागद टाकून दिलेले नव्हते. हे असेच क्‍लटर असते. हे क्‍लटरच सगळीकडे आपल्या खांद्यावर आणि मनावर ओझे देत राहते. आज शास्त्रज्ञांना समजले आहे, की आपल्या या पसाऱ्याचा परिणाम आपल्या विचारावर होत असतो. स्वच्छ मन हे समस्याविरहित असते. तशीच मोकळी जागा ही मोकळ्या, स्वच्छ मनासारखी असते. बहुतेक वेळा आजूबाजूची अडगळ, अव्यवस्था ही मनालाही अव्यवस्थित करते, गोंधळून टाकते. मन व शरीर रिलॅक्‍स किंवा तणावमुक्त करणे हे स्वच्छ, मोकळ्या, नीटनेटक्‍या जागेतच अधिक चांगल्याप्रकारे होऊ शकते. आपण सर्वांत जास्त रिलॅक्‍स कुठे होऊ शकतो? स्वच्छ, हवेशीर, मोकळ्या, अडगळ नसलेल्या जागेतच ना? शांत व शिथिल मनातच नवीन विचार व चांगल्या कल्पना येऊ शकतात.

दुसरी गोष्ट म्हणजे या क्‍लटरमध्ये आपण बऱ्याचशा जुन्या, पण आत्ता आणि पुढेही न लागणाऱ्या वस्तू ठेवून देतो. मग बऱ्याच वेळा आपले मनही अशा जुन्या गोष्टींतच रेंगाळत राहते. या वस्तूंशी संबंधित आठवणी सुखद असतीलच असे नाही आणि जर त्या कटू किंवा दुःखद असतील, तर अशा वस्तू काढून टाकायला उशीर करायलाच नको. म्हणजे मनातील जुने विचार जाऊन वर्तमानात आनंदाने जगण्यासाठी नवे विचार मनात येऊ शकतील. रोज लागणाऱ्या संगणकात किंवा मोबाईल फोनमध्ये डेटा नुसता भरत गेलो तर? मेमरी कार्ड बिचारे किती ताणले जाणार? शेवटी ते काम करायचे थांबणारच ना? तसेच मनातही अनेक निरर्थक, निरुपयोगी विचार साठून राहिले, तर ते थकणारच!

तिसरी गोष्ट अशी, की घरातल्या आणि ऑफिसमधल्या वस्तू आपापली जागा सोडून जशा इकडे- तिकडे धावतात, पसरतात, तसेच आपले मनही इकडून- तिकडे धावत असते. मात्र ध्येयवादी, एकाग्र किंवा तल्लीन झालेले मन हे मनाच्या ऊर्जेचा, शक्तीचा एक मोठा स्रोत असते. याचेच एक सुंदर उदाहरण आठवले. आपल्याला सर्वांना माहिती आहे, की सूर्याचे विखुरलेले लक्षावधी किरण जी उष्णता निर्माण करू शकत नाहीत, तेच किरण लहानशा बहिर्गोल भिंगावर पडून त्यातून जाऊन एकत्रित होऊन प्रचंड उष्णता निर्माण करतात आणि त्याखाली ठेवलेला कागद भुर्रकन पेट घेतो. मनाची ऊर्जा, शक्ती अशीच विखुरलेली असते. ती एका बिंदूवर, एखाद्या कार्यावर स्थिर झाली तर मनाला प्रचंड शक्ती मिळू शकते. आपल्याजवळचे क्‍लटर काढले, तर ही प्रचंड ऊर्जा मिळवायला निश्‍चितच मदत होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com