रामायणाचं महाभारत

मीना राजेंद्र साळुंके
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

शाळेतील स्नेहसंमेलन ही खूप उत्साहभरी गोष्ट असते. मंचावर जाऊन आपला कलाविष्कार दाखवायला मुले उत्सुक असतात. अशाच एका स्नेहसंमेलनातील नृत्यनाटिका बसवण्याचा अनुभव आनंद देईल.

शाळेतील स्नेहसंमेलन ही खूप उत्साहभरी गोष्ट असते. मंचावर जाऊन आपला कलाविष्कार दाखवायला मुले उत्सुक असतात. अशाच एका स्नेहसंमेलनातील नृत्यनाटिका बसवण्याचा अनुभव आनंद देईल.

"मॅडम, माझा बाण युद्धाच्या वेळी रावणापर्यंत पोचतच नाही,'' राम झालेली चैताली हिरमुसल्या चेहऱ्याने मला सांगत होती. तिचा तो चेहरा पाहून मला तिची कीव आली, पण माझ्या चेहऱ्यावर मी ते जाणवू दिले नाही. तिच्या पाठीवर हात ठेवून मी तिला दिलासा देत म्हटले, ""अगं, असू दे. प्रत्यक्ष सादरीकरणावेळी होईल सगळे नीट!'' हे ऐकून तिला जरा धीर आला. पुन्हा सरावासाठी ती उभी राहिली.
असे संवाद मी आणि माझ्या छोट्या पाचवीच्या विद्यार्थिनींमध्ये घडत होते. निमित्त होते - "गीतरामायण' ही नृत्यनाटिका.

शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सूचना वर्गात येऊन धडकली. सूचना ऐकताक्षणी वर्गात चैतन्याची लाट उसळली. वर्गातले चिमुकले डोळे वेगळ्याच तेजाने चमकू लागले. कोणता कार्यक्रम बसवायचा, किती मिनिटांचा, आपल्याला त्यात सहभागी होता येईल का, असे अनेक प्रश्‍न चिमुकल्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांत उभे राहिले होते. मी हातवारे करून वर्ग शांत केला. म्हटले, ""मी एक सुचवू का? आपण वर्गाचा जरा वेगळा कार्यक्रम बसवूया. "गीतरामायण' ही नृत्यनाटिका बसवू.'' झाले. सांगताक्षणीच आपण त्यात कोणती भूमिका करणार, हे मुलींनी स्वतःच सांगायला सुरवात केली आणि वर्गात एकच गोंधळ उडाला. मी त्यांना शांत करून म्हटले, ""ऐका, आधी कार्यक्रमाचे स्वरूप समजून घ्या. ड्रेपरीसाठी खर्च होईल. पालकांना विचारून या.''

दुसऱ्या दिवशी मुलींना राम, लक्ष्मण, सीता, जटायू, हनुमान, रावण, भरत, लव-कुश, नावाडी, अयोध्येची जनता अशा विविध भूमिका वाटून दिल्या. बाबूजी आणि गदिमांच्या "गीतरामायणा'मधील निवडक गाणी व निवेदन संपादित केले. मग सरावाला असा काही रंग चढत गेला की काही विचारू नका. सगळ्यांची एकच धमाल धांदल सुरू झाली होती.

मोठ्या विद्यार्थ्यांमध्ये एक अहं असतो. आपल्यालाच मोठी अन्‌ मध्यवर्ती भूमिका मिळावी, पण या छोट्या निरागस विद्यार्थिनींचे मात्र तसे नसते. कोणतीही भूमिका असो, आनंदाने ती स्वीकारायची आणि समरसून सादर करायची, हा अनुभव मला समृद्ध करून गेला. खरेच, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात विविध भूमिका आपल्याला पार पाडाव्या लागतात. ती प्रत्येक भूमिका निरागसपणे पार पाडली तर जगणे किती सुंदर होऊन जाईल! आपले आपणच व्हायचे दिग्दर्शक आणि पार पाडायची भूमिका. कित्येकदा निमूटपणे निभावतो, तसे नको. त्यात निरागसपणा हवा या लहान मुलांसारखा. तर त्याचा आनंद घेता येईल.

नृत्यनाटिका किंवा कोणताही कार्यक्रम बसवताना शिक्षक जरी दिग्दर्शक असला, तरीसुद्धा या छोट्या विद्यार्थिनी बऱ्याचदा छान सूचना देतात आणि आपण त्या स्वीकारल्या की त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. मुलांच्या सूचना स्वीकारल्या, की त्यांना नवे नवे काही सुचायलाही लागते. त्यांच्या सर्जनाचा कोंब वाढू द्यायला हवा. त्यांचे प्रसंगावधानही कौतुकास्पद असते. अशोक वाटिकेतील सीता-हनुमान भेट या प्रसंगावेळी मदतनीस मुलगी मंचावर मधोमध खुर्ची ठेवायला विसरली. मग काय सीतामाई झालेल्या लावण्याने प्रसंगावधान राखून स्वतःच पटकन कडेची खुर्ची घेतली, मंचाच्या मधोमध ठेवली आणि त्यावर बसलीदेखील! रंगमंचावर वावरत असताना एकावेळी अनेक गोष्टी विद्यार्थिनी शिकत असतात. त्याचा हा नमुना.

हनुमान झालेली सना कार्यक्रम संपल्यावर चेहऱ्याचा मेकअप न पुसता तशीच हॉलमध्ये बसून पुढच्या कार्यक्रमांचा प्रेक्षक म्हणून आस्वाद घेत होती. हा निरागसपणा मनाला खूप भावून गेला. (मोठ्या मुली असा मेकअप पटकन काढून टाकतात. आपणही किती चटकन रंग बदलतो आपल्या चेहऱ्यावरचे!) आणखी निरागसतेचे एक उदाहरण म्हणजे सरावाच्या वेळी घडलेला प्रसंग कौसल्या, सुमित्रा, कैकयी झालेल्या मुली "राम जन्मला गं सखी' या दृश्‍याच्या वेळी आपापले बाळ घेऊन मंचावर येतात. मुली खूप छान करायच्या. आपापले छोटे बाळ सांभाळत ते दृश्‍य नीट रंगवायच्या. आपले बाळ घेऊन मंचावर यायचे हे त्यांना पक्के ठाऊक! कार्यक्रमात शेवटच्या प्रसंगी राम विजयी होऊन अयोध्येला परततो, तेव्हासुद्धा त्या दरबारात बाळ घेऊन आल्या. मी ते पाहिले. मला हसू आवरेना. त्यांना सांगितले, ""अगं, पहिल्या प्रसंगातले बाळ आता रामासारखेच मोठे झाले आहेत. हे बाळ पुन्हा आणायचे नाही.'' हे सांगताक्षणी वर्गात एकच हशा पिकला. प्रत्यक्ष कार्यक्रम सादर करताना त्यांनी आपले काम चोखपणे बजावले आणि माझा जीव भांड्यात पडला.

सरावाच्या वेळी रामाचा रावणापर्यंत न पोचणारा बाण प्रत्यक्ष सादरीकरणावेळी रावणाला लागला अन्‌ राम झालेल्या चैतालीच्या चेहऱ्यावर अभिमान व आनंद दोन्ही झळकले. पटकन मान वळवून तिने माझ्याकडे पाहिले. मीही हसून तिला नजरेनेच दाद दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: meene rajendra write article in muktapeeth