भेट

मीरा दाते
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

मुले चुकतात, त्या वेळी त्यांना समजून घेतले पाहिजे. त्यांना चूक कळतेच, ती स्वतःच सुधारतात.

मुले चुकतात, त्या वेळी त्यांना समजून घेतले पाहिजे. त्यांना चूक कळतेच, ती स्वतःच सुधारतात.

मी निवृत्त शिक्षिका आहे. गुरुपौर्णिमा, शिक्षक दिन अशा प्रसंगी विद्यार्थ्यांची आवर्जून आठवण होते. आजकाल दिवसेंदिवस शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल होत आहेत. विद्यार्थ्यांनाही शिक्षणापेक्षा इतर अनेक गोष्टींचे आकर्षण असते. इतर गोष्टी करण्यात रस असतो. असेच मी एकदा पाच वर्षांपूर्वी एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता पाचवीच्या मुलांना मूलभूत संस्कृत किंवा प्राथमिक बोली हसत खेळत संस्कृत शिकवीत होते. वर्गात पन्नास मुले असायची, पण सर्वांना संस्कृत शिकण्यात गोडी नव्हती. दहा-बारा मुले खूप दंगा-मस्ती करत असत. त्यामुळे वर्गात शांतता नसायची. शिकवणेही अवघड व्हायचे. अशा गोंधळातच शिकवावे लागे. विद्यार्थ्यांना काही बोलून, उपदेश करून उत्तम शिकविण्याचा मी प्रयत्न करत होते. पाचवी, सहावी दोन वर्षे त्या मुलांना शिकवले. हे संस्कृत सातवीपर्यंत होते व पुढे इयत्ता आठवीपासून त्या मुलांना शंभर गुणांचे संस्कृत होते. मग त्यांना तेव्हापासून या विषयाकडे लक्ष देणे भाग पडले. पुढे ही मुले इयत्ता दहावीमध्ये गेली. या परीक्षेच्या आधी मला आदि नावाच्या एका विद्यार्थ्याचा फोन आला. "मॅडम, मला तुमची आठवण आली म्हणून फोन केला. आता मला संस्कृत विषयाची आवड निर्माण झाली आहे. संस्कृत पण खूप सोपे जाते. पण ती चूक आता लक्षात आली. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी तुम्हाला फोन केला.' फोनवर एक सुभाषितही म्हणून दाखवले. हे सर्व ऐकून मलाही खूप बरे वाटले. मुले लहान असताना त्यांना कित्येक गोष्टी लक्षात येत नाहीत. त्या गोष्टीचे गांभीर्य तेव्हा लक्षात येत नाही. आपण चुकीचे वागतो आहोत, हे त्यांच्या अजिबात लक्षात येत नाही; पण काही वेळेस वरच्या वर्गात गेल्यावर समज येते. पश्‍चात्ताप होतो. चूक उमगते. नंतर परीक्षा झाल्यावर तो विद्यार्थी भेटायलाही आला. त्याच्यात खरेच खूप बदल झाला होता. पेपर खूप सोपा गेला. पैकीच्या पैकी मिळणार, असे आत्मविश्‍वासाने सांगत होता. त्याच्यामध्ये झालेली सुधारणा बघून मलाही समाधान वाटले. आनंदाचे क्षण अनुभवता आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: meera date write article in muktapeeth