बेंदराचा बैल...

मिलिंद यादव
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

तुम्ही माझा सत्कार करावयाचे ठरवले हे माझ्यासाठी अभिनंदनीय व अभिमानास्पद नक्कीच आहे. पण जगामध्ये एकमेव शिक्षकी पेशा असा आहे आणि शिक्षक व्यक्ती अशी आहे की, जे सदासर्वकाळ वंदनीय आहेत. वर्षातून एक दिवस वंदन करायला शिक्षक हे काही बेंदराचे बैल नाहीत. आज सजवला, गोडधोड खायला घातलं, रंगरंगोटी केली आणि दुसऱ्या दिवशी गाडीला जुंपलं.

रावसाहेब’ या पु. ल. देशपांडे यांच्या कथेतील हे वाक्‍य... ‘काही काही माणसं वीस-वीस, पंचवीस वर्षांच्या परिचयाची असतात; पण शिष्टाचाराची घडी मोडण्यापलीकडे त्यांचा अन्‌ आपला कधी संबंधच येत नाही आणि काही माणसं क्षणभरात जन्मजन्मांतरीचं नातं जमवून जातात!’ या वाक्‍याचं प्रत्यंतर आयुष्यात खरं तर प्रत्येकालाच येत असतं.

बारा-पंधरा वर्षांपूर्वीचा प्रसंग असेल. मी जिथे काम करतो ती शाळा ज्या संस्थेत, त्या संस्थेच्या वतीने दर वर्षी ५ सप्टेंबरला आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जायचा. शाल-श्रीफळ असा पारंपरिक सत्कार व्हायचा, सन्मानार्थ भाषणं व्हायची, सत्कारमूर्ती आपले मनोगत व्यक्त करायचे. एकूण भाषणाचा बाज ठरावीक पठडीतला असायचा. पण हा प्रसंग माझ्या मनावर पक्का बिंबला. आमच्या संस्थेचे माजी अध्यक्ष कै. सखारामबापू खराडे हे दरवर्षी कोणी एक व्यक्ती सत्कारासाठी घेऊन यायचे. त्यावेळी त्यांनी

वेंगुर्ल्याच्या एका शाळेच्या मुख्याध्यापकांना सत्कारमूर्ती म्हणून आणले. संस्थेतील आम्ही सारेजण विद्यार्थ्यांसह संस्थेच्या हॉलमध्ये बसलेलो. काही वेळातच बापू, संस्थेचे अन्य सदस्य आणि एक अनोळखी चेहरा त्यांच्यासोबत होता. दाढी व्यवस्थित कोरलेली, उंची जेमतेम, साधा हाफ शर्ट, साधीच पॅंट, पायात साध्याच चपला. प्रथमदर्शनी ही व्यक्ती सत्कारमूर्ती असेल असे वाटलेच नाही. पण नंतर स्टेजवरील ज्या खुर्चीवर ते बसले त्यावरून तेच सत्कारमूर्ती आहेत हे आम्हा सर्वांच्याच लक्षात आले.

समारंभात कोणताच मानपान न होता सरळ भाषणं सुरू झाली. काही लक्षात येईना. नेहमीचे शाल-श्रीफळ गेले कुठे? आणि एकदम भाषणंच...? या प्रश्‍नांची उत्तरं मिळाली ती सत्कारमूर्तींच्या भाषणातून. फारच सौम्य व सूचक भाषेत त्यांनी सत्कार न स्वीकारण्याचं कारण सांगितलं. ते म्हणाले, ‘‘तुम्ही माझा सत्कार करावयाचे ठरवले हे माझ्यासाठी अभिनंदनीय व अभिमानास्पद नक्कीच आहे. पण जगामध्ये एकमेव शिक्षकी पेशा असा आहे आणि शिक्षक व्यक्ती अशी आहे की, जे सदासर्वकाळ वंदनीय आहेत. वर्षातून एक दिवस वंदन करायला शिक्षक हे काही बेंदराचे बैल नाहीत. आज सजवला, गोडधोड खायला घातलं, रंगरंगोटी केली आणि दुसऱ्या दिवशी गाडीला जुंपलं. एका दिवसासाठी कौतुक करावं असा शिक्षकी पेशा नसतोच कधी आणि आपण जर शिक्षकांना सदैव वंदन करतो तर मग असा दिवस पाळायची गरज काय? समाजाला योग्य दिशा दाखवण्याचं काम, त्याला चांगलं घडवण्याचं काम शिक्षकांना दिलंय ते त्यांनी प्रामाणिकपणे करावं. त्या प्रामाणिकपणाला हा समाज नेहमीच वंदन करीत राहील. शिक्षकाच्या हयातीत आणि नंतरही.’’

मधुकर सरनाईक या सत्कारमूर्तीचं नाव. आजही इतक्‍या वर्षांनंतरही त्यांचे ते शब्द जन्मजन्मांतरीच्या नात्यासारखे मनात पक्के घर करून बसले आहेत. किती खरं सांगितलं होतं त्यांनी. शिक्षकाला अशा दिवसाची गरज का भासावी? त्याचा तर रोजच शिक्षक दिन, संध्याकाळी ५ वाजता शाळेच्या आवारातून बाहेर पडताना मिळणारे समाधान हा रोजचाच पुरस्कार.
सरनाईक सर निवृत्तीनंतर परत कोल्हापूरला आपल्या गावी आलेले. अधून मधून रस्त्यात भेट व्हायची. शाळेतील कामाबद्दल चौकशी करायचे. कधी नुसताच लांबून नमस्कार व्हायचा. पण सर समोर आले की, त्यांच्या भाषणातील तो भाग डोक्‍यात घुमायचा. आज पुन्हा तोच भाग डोक्‍यात घुमला; पण आज सरनाईक सर कुठे रस्त्यात भेटले म्हणून नाहीत, ते भेटले वर्तमानपत्रात त्यांच्याच निधनाच्या बातमीत. सर गेले; पण शिक्षकी पेशात कसं वागलं पाहिजे याचा धडा शिकवून गेले. पुन्हा तीच वाक्‍यं डोक्‍यात घुमली... ‘बेंदराचा बैल’ व्हायचं नाही, हा घटक परत एकदा पक्का झाला!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Milind Yadav writes in Muktapeeth