ढगांचे माहेरघर, मिनीमहाबळेश्वर माचाळ

संतोष गणपत रावणंग
रविवार, 21 जुलै 2019

सह्याद्रीच्या खोर्‍यात डोंगर - दर्‍यांमध्ये अनेक गावे वसलेली आहेत. प्रत्येक गावाचे काही-ना-काही वेगळे वैशिष्ट्य आहे. लांजा तालुक्यातील माचाळ हे गाव असेच वेगळेपण जपलेले आणि ढगांचे माहेरघर, मिनीमहाबळेश्वर या नावांनी प्रसिध्द असे आहे. निसर्गसौदर्याने नटलेले हे गाव पर्यटकांसाठीच नव्हे तर ट्रेकर्ससाठी अनोखा अनुभव देणारे आहे.

सह्याद्रीच्या खोर्‍यात डोंगर - दर्‍यांमध्ये अनेक गावे वसलेली आहेत. प्रत्येक गावाचे काही-ना-काही वेगळे वैशिष्ट्य आहे. लांजा तालुक्यातील माचाळ हे गाव असेच वेगळेपण जपलेले आणि ढगांचे माहेरघर, मिनीमहाबळेश्वर या नावांनी प्रसिध्द असे आहे. निसर्गसौदर्याने नटलेले हे गाव पर्यटकांसाठीच नव्हे तर ट्रेकर्ससाठी अनोखा अनुभव देणारे आहे.

थंड हवेचे ठिकाण म्हणून वेगळी ओळख आहे. पंचवीस मित्र एकत्र येऊन आम्ही तिथपर्यंत जाण्याचा निर्णय घेतला. माचाळपर्यंत पूर्ण रस्ता झाला नसल्याने, पायथ्याशी गाडी पार्क करून पायी चालत जावे लागते. एक तास प्रवास करावा लागतो. माचाळमधील ग्रामस्थांना विनंती केली तर तेही जेवण बनवून देतात. 

हातखंबा येथून सकाळी सव्वा आठ वाजता प्रवास सुरु झाला. गुहागर, देवरूख, लांजा येथील मित्रांचा ग्रुप होता. हातखंबा ते दाभोळेमार्ग केळवलीतून चिंचुटी 46 किमी प्रवास करत कोचरी धनगरवाडीपर्यंत सकाळी 10 वाजता पोहोचलो. चिंचुटी ते धनगरवाडी तेथून पुढे माचाळला जाणारा रस्ता खूपच खराब आणि कच्चा आहे. रस्त्यावर दगड, माती व झाडे आल्यामुळे गाडी नेणे शक्य नव्हते. तिथून पायपीट सुरु झाली. माचाळवासीय जीवनावश्यक वस्तू कशा प्रकारे आणत असतील हे देव जाणे. एक तास पायी चालणे म्हणजे एक महा कठीण काम करण्यासारखे आहे. खडकांना धरत - धरत प्रसंगी जमिनीवर हात ठेवून एकदाचे माचाळला पोहोचलो. दरीतून जाताना जणू ढगातून चालत असल्याचा भास होत होता. पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे तो काय याची सुखद अनुभूती तिथे घेता आली.

डोंगरावरील झाडे, सर्व खुरटी आणि कमी उंचीची आहेत. सगळीकडे कडीपत्ता मोठ्या प्रमाणात दिसतात. माचाळच्या डाव्या बाजूला किमान पाऊण तास चालत गेल्यावर मुचकुंदी ऋषींची गुहा आहे. गुहेकडे जाताना मुचकुंदी नदीचे उगमस्थान आहे. जी पूर्णगडच्या खाडीला जाऊन मिळते. मुचकुंद गुहेच्या उत्तरेकडील नदी जयगडच्या खाडीला येऊन मिळते. माचाळला घरांची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. घरांच्या भिंती मातीच्या, तर काही घरे जांभा चिर्‍याची आहेत. घोंगवणारा वारा घरात घुसू नये, म्हणून चारही बाजूने गवताने कुडलेली आहेत. या कुडलेल्या भिंतीतून घराचे प्रवेशव्दार दुसर्‍या बाजूला असते. सहयाद्री पर्वत रांगा ओलांडत येणारे ढग माचाळला जणूकाही वस्तीच करतात. त्यामुळे बाजूला असलेल्या माणूस सुध्दा दिसणे कधी-कधी अशक्य असते.

वेगवान वारा आणि जोडीला रिमझिम पाऊस हा अनोखा संगम माचाळला अनुभवायला मिळतो. जळू पायाला कधी चिकटेल हे समजत नाही. जेव्हा समजते तेव्हा तो रक्त शोषून खाली पडलेला असतो. माचाळच्या दक्षिणकडे एक दरी उतरून विशाळगडावर एका तासात पायी पोहोचता येते.

शेती नांगरणीसाठी रेड्यांचा उपयोग येथील शेतकरी करतात. बैलांचा वापरत करत नाहीत. माचाळ गावातील डोंगराच्या दुसर्‍या बाजूला लाल मोठे खेकडे सापडतात. तसेच या ठिकाणी ब्राम्ही, बेहडा यासारखी अनेक औषधी वनस्पती आहेत. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या माचाळचे दर्शन प्रत्यक्ष तिथे जाऊन घेण्यातच खरी मजा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minimahabaleshwar Machal village in Lanja Taluka trekking article