कथा एका घड्याळाची

कथा एका घड्याळाची

कॅल्गरीला चोऱ्या अशा होत नाहीतच, तरीही आमचे मनगटी घड्याळ गडप झाले. कसे? कुठे? कळलेच नाही. हरवलेल्या वस्तूही परत मिळतात या शहरात, तेथे आमचे घड्याळ गराज सेलमध्ये विक्रीला ठेवले गेले होते.

दोन- चार वर्षांपूर्वीची घटना आहे. कॅनडाच्या उत्तरेत पश्‍चिमेच्या बाजूला असलेल्या कॅल्गरी या एका छोट्या पण रमणीय शहरात आम्ही मुलाकडे राहात होतो. दिवस उबदार होते, त्यामुळे संध्याकाळी हलकासा स्वेटर घालून आरामात रस्त्यावरून फेरफटका मारता येत होता. खरे तर कॅल्गरीचे हवामान म्हणजे आठ महिने थंड- थंड आणि इतर महिने थंडच असते. ऐन थंडीत जिकडे पाहावे तिकडे नुसता बर्फच बर्फ. पांढरा शुभ्र.

उन्हाळा आला की वातावरण अगदी उल्हसित असते. संपूर्ण शहरातील प्रत्येक चौकात रंगीबेरंगी फुलांची नुसती लयलूट असते. अक्षरशः एका रात्रीत हा चमत्कार घडवून आणला जातो. तो काळ घरोघरी फुलांची जणू आतषबाजी असते. दिवाळीच म्हणाना!
याच दिवसांत जागोजागी शनिवार- रविवार "गराज सेल' चालू असतात. आपल्या घरातील नको असलेल्या; पण बऱ्यापैकी सुस्थितीत असलेल्या वस्तू आपापल्या गराजमध्ये मांडून अगदी अल्प किमतीत विकायला ठेवतात. भांडी-कुंडी, कपडे, पुस्तके, फर्निचर अगदी "ए टू झेड' वस्तू मिळू शकतात. या अशा गराज सेलना भेटी देणे हा माझा एक मस्त आवडता "टाइमपास' असतो. या दिवसांत रस्त्यांवरही बऱ्यापैकी लोकांची वर्दळ असते. फिरायला निघालेले आबाल-वृद्ध, बाबागाडीत आरामात पहुडलेली गोड-गोड गुटगुटीत बाळे, तसेच नाना रंगांची आणि रूपांची छोटी-मोठी कुत्री, ही आपापल्या मालकांबरोबर लुटुलुटु चालत असतात. सारे वातावरण कसे छान प्रसन्न असते.

एका संध्याकाळी आम्ही दोघे जवळच्या एका डोंगर-दरीवर फिरायला गेलो होतो. दरीत गोल्फ क्‍लब आहे. वरून त्याखालच्या घळीतील हिरव्यागार गवतावर लोकांना गोल्फ खेळताना पाहून मजा वाटत होती. थोड्या वेळाने घरी जायची वेळ झाली का म्हणून माझे यजमान मनगटी घड्याळ पाहायला गेले तो काय? मनगट रिकामेच! टाइटनचे ते भारतीय बनावटीचे घड्याळ कसे, कुठे आणि केव्हा पडले ते काही केल्या आठवेना. नक्की घातले होते ना ते घरून निघताना? येथपासून ते शेवटी केव्हा वेळ पाहिली होती? अशी चर्चा करीत करीत आम्ही अक्षरशः खाली मुंडी घड्याळ धुंडी करीत घरी आलो. आमचा मुलगा परत एकदा टॉर्च घेऊन वडिलांबरोबर जाऊन त्याच रस्त्यांवरती फिरून आला. पण ते सोनेरी घड्याळ काही चकाकले नाही! निराश होऊन आम्ही तो विषय विसरण्याचा प्रयत्न करू लागलो. पण, मला मात्र चैन पडत नव्हती. कारण त्या गावात तुमचा स्वेटर, मोबाईल काहीही बस थांबा, ग्रंथालय अशा सार्वजनिक ठिकाणी पडल्यास, ती वस्तू एक- दोन दिवसांत परत मिळते, हा आमचा स्वानुभव होता. अशा गोष्टींची चोरी होणे हा प्रकारच तेथे नसतो. मग आमचेच घड्याळ, तेही एवढ्या छोट्याशा अंतरावर, कुठे गडप झाले असेल? हे कुतूहल मला स्वस्थ बसू देईना!
जवळ जवळ आठवडा असाच गेला. पुढच्या शनिवार- रविवारी आमच्याच गल्लीत एका ठिकाणी गराज सेल होता. नेहमीप्रमाणे अस्मादिकांची स्वारी नवऱ्यास बळेबळे तयार करून गराज शॉपिंगसाठी बाहेर पडलो. प्रथम शेजारील गल्ल्या पालथ्या घालून शेवटी गराज सेलमध्ये पोचलो. एक एक वस्तू पाहताना रस्त्यालगतच्या बाकावरील बारीकबारीक वस्तू पाहत होतो. तेवढ्यात आमचे टाइटन मनगटी घड्याळ दिसले. किंमतही डॉलरमध्ये दिसली. आम्ही दोघांनी एकमेकांकडे चमकून बघितले. या शेजाऱ्याकडे कसे गेले? आणि त्यांनी ते स्वतःचे असल्यासारखे विकायला का ठेवले? त्यांच्याकडे मागायचे तरी कसे? आणि ते आमचेच आहे असा पुरावा कसा देणार? प्रश्नच प्रश्न! सरळ घरी निघून आलो आणि मी सूनबाईला सांगितले.

तीही जाऊन बघून आली व म्हणाली, हे तुमचेच घड्याळ आहे हे नक्की. यावर मला प्रश्न पडला, की मी त्या मालकाला काय व कसे सांगू? तशी सूनच म्हणाली, तुम्ही काहीच करू नका. मीच जाऊन बोलते. तिने त्या सेलमध्ये जाऊन विचारपूस केली. हे घड्याळ भारतीय बनावटीचे आहे. छान आहे. हे कसे आले तुमच्याकडे? मग तिने सांगितले, की हे घड्याळ तिच्या सासऱ्यांचे आहे व तिने पैसेही देऊ केले; पण ते न घेताच त्या शेजाऱ्याने घड्याळ परत दिले.

सुनेने घरी येऊन जेव्हा "घड्याळाचे रहस्य' सांगितले, तेव्हा आमची हसून हसून पुरेवाट झाली. त्या कुटुंबाचे छोटे कुत्रे त्यांच्या हिरवळीवर नेहमी खेळत असते. एका संध्याकाळी त्याला ते चकचकीत खेळणे सापडले व त्याने ते चक्क उचलून मालकिणीकडे नेऊन दिले. त्यांना कळेना, की या घड्याळाचा मालक कसा शोधावा! म्हणून गराज सेलमध्ये स्वस्त किंमत ठेवून विकायला काढले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com