श्रावणबाळाची कावड

रोहिणी मेहेंदळे
सोमवार, 19 मार्च 2018

तीर्थक्षेत्री जायची आस मनात होतीच. पण विशेष मूल घेऊन तीर्थयात्रा करणे कठीण असते. पण त्याचबरोबर विशेष मूल सोबत असल्याने काही संधीही मिळतात.   

आपल्या माता-पित्याची तीर्थयात्रा जसे श्रावणबाळ घडवितो, तसेच काहीसे आमच्या मुलाने, राहुलने अनेक तीर्थक्षेत्रांच्या देवदर्शनाचे पुण्य आमच्या पदरात घातले.

माझे पती कर्नल प्रदीप सैन्यात असल्यामुळे पूर्ण भारतभर आम्ही फिरलो. मुद्दाम देवदर्शनाला जाण्याचा योग कधी येत नसे. जेव्हा कधी काश्‍मीरमध्ये बदली होईल, तेव्हा अमरनाथची यात्रा करावी, अशी इच्छा होती. ती यात्रा बरीच कठीण असते. तिथे जाताना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो, या सर्व गोष्टी विचारात घेता मनात आले की, आपल्याला ही यात्रा न झेपणारी आणि न जमणारी आहे. योगायोगाने काश्‍मीरमध्ये पूंच्छला प्रदीपची बदली झाली. तेथे आम्ही राहात होतो, तेथून काही अंतरावर एक अमरनाथाचे  देऊळ होते, त्या अमरनाथाचे दर्शन घेतले तरी बर्फानीबाबा अमरनाथाचे दर्शन घेतल्याचे पुण्य लाभते, अशी लोकांची श्रद्धा आहे. त्या मंदिराला ‘बूढा अमरनाथ’ म्हणतात. जे लोक वरती चढून बर्फमयी शिवलिंगापर्यंत पोचू शकत नाहीत, त्यांच्यासाठी अमरनाथांनी इथे दर्शन दिले, अशी आख्यायिका आहे. ज्या अमरनाथाच्या दर्शनाला जायची इच्छा होती, तीच आता पूर्ण  होणार याचा आनंद झाला. आम्हाला राहुलला घेऊन जाता आले. राहुल बरोबर असल्यामुळे लगेच दर्शनासाठी प्रवेश मिळाला. सांगायला हवे की, राहुल विशेष मूल आहे.

एकदा आम्ही पुण्याला सुटीवर आलो असताना, नाशिकजवळच्या वणीच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाण्याचा योग आला. तिथल्या डोंगराळ भागात बसलेल्या देवीच्या विलोभनीय दर्शनाने मन प्रसन्न झाले. येताना आम्ही शिर्डीमार्गे पुण्याला येण्याचे ठरविले. शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी खूप मोठी रांग लागलेली होती. बराच वेळ रांगेत राहुलला घेऊन उभे राहणे शक्‍य नव्हते, मी देवाला तेथूनच नमस्कार केला आणि मी माझ्या मुलाला त्रास देऊन  तुझ्या दर्शनाला येऊ शकत नाही, माफ कर, माझा इथूनच नमस्कार स्वीकारावा, असे म्हणून आम्ही तिघेही परत निघालो. अचानक प्रदीपना देवालयाच्या कार्यालयामध्ये जाऊन विचारून यावे, असे सुचले. त्यांनी राहुलबद्दल सांगितले आणि काही मिनिटांतच आम्हा तिघांना दुसऱ्या दरवाज्यातून सरळ साईबाबांच्या मूर्तीसमोर उभे केले. साईबाबांची मूर्ती आपल्याला प्रेमळपणे आशीर्वाद देत आहे, असा भास झाला.

आमची बंगळूरला बदली होती तेव्हा आम्ही तिरुपतीला बालाजीच्या दर्शनासाठी गेलो. दर्शनासाठी खूप मोठमोठ्या रांगा असतात.  बालाजी मंदिर हे खूप श्रीमंत देवस्थान आहे. मंदिराचा भव्य परिसर, देश-विदेशातून येणाऱ्या भक्तगणांची संख्याही प्रचंड आहे. पण राहुल सोबत असल्याने त्याच्याबरोबर एका लहान ‘रांगे’मधून दर्शनाला गेलो. आम्हाला तिघांना रत्नजडित तेजस्वी लखलखीत बालाजीचे भव्य रूप खूप जवळून बघायला मिळाले. धन्य झालो.

आपण सहजपणे पंढरपूरला जाऊन येऊ, असे कधी वाटत नव्हते. पण प्रदीपची पंढरपूरच्या ‘सैनिक आरामघर’च्या अधिकाऱ्याची अचानक भेट झाली. त्यांनी तिथे येण्याचे निमंत्रण दिले व आमची राहण्याची सोय होईल याची खात्री दिली. ते आमंत्रण आम्ही स्वीकारले. दोन दिवसांनी गाडी घेऊन पुण्याहून सकाळी निघालो. 

दुपारी चारच्या सुमारास पंढरपूरला पोचलो. आरामघरात राहण्याची उत्तम सोय होती. चहापाणी घेतले व दुसऱ्या दिवशी सकाळी  दर्शनाला किती वाजता जावे लागेल याची विचारपूस करायला संध्याकाळी मंदिराच्या कार्यालयामध्ये गेलो.

कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आताच दर्शन घेता येईल, म्हणून आम्हाला देवळाच्या लहानशा दरवाज्याने गाभाऱ्यापाशी नेले आणि विठ्ठलाच्या चरणी राहुलचे मस्तक टेकविले. विठ्ठलाचे इतक्‍या जवळून झालेल्या दर्शनामुळे मन भरून आले. दुसऱ्या दिवशी चंद्रभागेचे दर्शन घेऊन परत निघालो.

दोन्ही हाताची करुनी कावड, 
राहुल नेई आम्हा पंढरीला ।
विटेवरी उभा, आम्हा ‘राहुल’ची दिसला।। 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mukatpeeth article Rohini Mehendale

टॅग्स