आसूदबागचा केशवराज

आसूदबागचा केशवराज

माणसाला, त्यातून पश्‍चिम महाराष्ट्रातल्या माणसाला कोकणाचे कोण अप्रूप. जणू काही कोकण आपलेच असल्यासारखे हे प्रेम तो मिरवीत असतो. कोकण आपलेच हे मात्र खरे. कोकणाने कधी कुणाचा दुस्वास केला नाही. दारिद्य्र असले तरी त्यांचे पाहुण्यांचे कौतुक कधी ओसरले नाही. इतका संपन्न भूभाग, पण वृथा अभिमान कधी बाळगला नाही.

दापोलीला पोचतो आणि तिकडे आसपास फिरताना ड्रायव्हिंगची हौस फिटली. मन तृप्त झाले. कोकणातले सगळे रस्ते वळणावळणाचे. डोंगररांगांनी कुशीत घेतलेला प्रदेश तो. इथले सगळे रस्ते कसे झाडांनी, त्यांच्या सावल्यांनी भारलेले वाटतात. आसूदबाग मी काही बघितली नव्हती. आधी आलो होतो तेव्हा नुसतेच समुद्रात डुंबण्यात, किनारे पालथे घालण्यात वेळ घालवला होता. तर, आसूदबागला ‘केशवराज’ राहतो. आधी उतरत जातो रस्ता. या उतरंडीवर बरीच घरे आहेत. काहींच्या छपरांवर सुपाऱ्या वाळत घातल्या होत्या. आंब्याची झाडे भविष्यात येणाऱ्या वैभवाची खूण दाखवत होती. फणसाची झाडे लेकुरवाळी झाली होती. लहानगे कुयरे इतके गोजिरवाणे दिसत होते की, मायेने त्यांना कुरवाळावेसे वाटत होते. 

दुपार टळल्यानंतर आसूदला पोचलो होतो. त्यामुळे ही टुमदार घरेंही काहीशी सुस्तावलेली होती. लाली पसरलेले रस्ते आणि बाजूचे हिरवेपण आपल्या रंगसंगतीने मोहून टाकत होते. कुठल्याशा घराच्या कुंपणातून डोकावणारी पिवळी, जांभळी कोऱ्हांटी मन प्रसन्न करत होती. उतरंड असल्याने सुखावलेल्या पायांना लवकरच सायास पडणार होते हे माहीत नव्हते. कुठून तरी पाण्याची प्रेमळ खळखळ ऐकू येत होती. इतकी झाडे आणि वळणाचे रस्ते यामुळे अंतराचा फारसा अंदाज येत नव्हता. उतरणाऱ्या पायऱ्या, परतताना ही चढण चढायची आहे अशी भीती घालत होत्या. उंचच उंच सुपारीची झाडे ताठ, कोकणी माणसासारखीच सडपातळ, दोन्ही बाजूंनी जणू स्वागताला उभी होती... नंतर निरोपालादेखील. अंधारल्यावर ही झाडे नक्की चांदण्यांशी गुजगोष्टी करत असावीत. भले मोठे पत्थर, सुकलेली अळिंबी, काजूचा मोहोर डोळ्यात साठवीत पुढे जात होतो. तेवढ्यात नदी आडवी आली. आडवी आली असे म्हणायचे काही कारण नाही म्हणा. ती आपली किती एक तहानलेले जीव शांत करत आपल्या गतीने चालली होती. का कुणास ठाऊक तिचा देह जरा रोडावलेलाच होता. पायऱ्यांच्या कडेने कुठुनशा आलेल्या झऱ्याचे पाणी बुळुबुळु वाहात होते. त्यात इवलाले हिरवे जीव मोहक दिसत होते. नदीवर नवीन छोटा पूल बांधला असला तरी जुन्या साकवाचे अवशेष भूतकाळ आठवीत उभे होते. आता चढणारी वाट देवदर्शन इतके सहज नाही असे सांगू लागली होती. दम लागलेला उत्साह मावळू न देण्याचे काम सृष्टी इमानेइतबारे करत होती. अनेक पक्षी नजरेस न पडता सतत काहीतरी बोलत होते. वर आल्यावर प्रथम दिसले ते एक उजाड घर, पडझड झालेले. ते बघण्याची उत्सुकता मी बाजूला सारली. डावीकडे केशवराज मंदिर. 

प्रवेशद्वाराशीच एक उंच वृक्ष उभा ठाकला होता. वाकून आत गेल्यावर उजवीकडे दिसले गोमुख. शिणलेल्या जीवाला पाणी बघून हायसे वाटले. हे पाणी या भल्या थोरल्या डोंगराच्या माथ्यावरून येते. थंड, सुखकारक. डावीकडे पडवीवजा मंदिरात गणपतीबाप्पा विसावले आहेत. डावीकडे मुख्य मंदिर. सभामंडप, गाभारा आणि आत लामणदिव्यांच्या उजेडात सहजी न दिसणारा काळाकुट्ट केशवराज. त्यादिवशी त्याने शुभ्र वस्त्र परिधान केली होती. चांदीचे डोळे, बहुदा कुणी वाहिले असतील. हा केशवराज आपला वाटतो. शांत, मोकळ्या गाभाऱ्यात सहज त्याला मनातले सांगावे. तो ऐकेल, प्रतिसाद देईल असे वाटते. सवयीने मंदिरात थोडावेळ विसावलो. ‘शांताकारं भुजगशयनं’ म्हणतानाच बकुळीचा वास आला. मन वेडावले. स्तोत्र म्हणून उठलो. उजवीकडे बाग आहे छोटेखानी. खरें तर इथे सगळीकडे झाडेच झाडे आहेत, जंगलच. तरी इथे ही बाग तयार केली आहे कुणीतरी. तर बकुळीचा शोध घेऊ लागलो, पण कुठे दिसेना. झाडांमधील आधीच असलेला गडदपणा अजूनच घट्ट व्हायच्या वाटेला लागला. या सुवासाने वेड लावले होते आणि ती बकुळ काही सामोरी होत नव्हती. शेवटी नाद सोडला. परतायला हवे होते. कारण रस्ता पायाखालचा नव्हता. अंधार पडला असता तर मुक्कामी पोचायला अंमळ त्रास झाला असता. आधीच एक तर गूढता होती इथल्या वातावरणात आणि सोबतीला कुणी नव्हते. पुन्हा केशवराजला नमस्कार केला आणि निघालो.

परतीला सगळे तसेच होते. फक्त आता निरोपाची किनार होती. वाऱ्याच्या हातात हात घालून सगळी झाडे जणू ‘नीट जा’ असे सांगत होती.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com