मुंबई ते नेदरलॅंड

 मुंबई ते नेदरलॅंड

मी लग्नाआधी मुंबईकर होते. लग्नानंतर पुणेकर झाले आणि आता नेदरलॅंडकर झाले आहे. किती तरी बदल होतात आयुष्यात, शहर आणि लोक  बदलल्यावर. मुंबईतील आयुष्यं रोजच्या धावपळीचं, व्यस्त, तरी मुक्त पक्ष्यासारखं! लग्नानंतर दीड महिना सासू-सासऱ्यांसोबत राहून मी नेदरलॅंडला आले. माझ्यासारखी बॅंकेत नोकरी करणारी सर्वसाधारण मुलगी आता विदेशात जाणार यावर विश्वासच बसत नव्हता. माझी सासू ग. दि. माडगूळकरांच एक गाणं गाते नेहमी, 

देवा, दया तुझी की ही शुद्ध दैवलीला l
लागो ना दृष्ट माझी माझ्याच वैभवाला ll  

 

मुंबईतील माणसं, मित्रमैत्रिणी, नोकरी, लोकल ट्रेनचा प्रवास सगळं मागे सुटलं आणि आयुष्याचा नवीन प्रवास सुरू झाला. मनात थोडी धाकधूक आणि प्रचंड उत्साहात मी नेदरलॅंडला आले. कधी मुंबईबाहेर प्रवास न केलेली मुलगी विदेशात एकटी आली. ॲमस्टरडॅम एअरपोर्टवर उतरल्यावर सगळं काही नवीन होतं माझ्यासाठी. सगळ्यात आधी विमानतळावर ‘आलस्तूबलीफ्त’ हा शब्द कानावर पडला. नवऱ्याला त्याचा अर्थ विचारल्यावर कळले, की हे डच लोक अगदी साधेसुधे, कष्टाळू आणि नम्र असतात. ते नम्रपणाने ‘आलस्तूबलीफ्त’ म्हणजे ‘कृपया’ हा शब्द जास्तीत जास्त वापरतात. अप्रतिम आणि भल्यामोठ्या विमनातळावरून निघाल्यावर रेल्वेचा प्रवास सुरू झाला. विमानतळावरून जमिनीखालून बोगदा करून रेल्वेची व्यवस्था आहे. ॲमस्टरडॅम ते ऐंधोवेन दीड तासाचा प्रवास. मी पटकन मुंबईची सवय असल्यामुळे खिडकीजवळची जागा पकडली. खिडकीतून बाहेरचं अप्रतिम दृश्‍यं नजरेत साठवत होते. हिरवा गालिचा अंथरल्यासारखे सुंदर शेत, त्यात एक कौलारू लाकडी घर आणि अंगावर पांढरे ठिपके असलेल्या गाई रवंथ करत बसलेल्या. जिथे नजर फिरेल तिथे नदीचे स्वच्छ पाणी आणि भल्यामोठ्या गोल फिरणाऱ्या पवनचक्‍क्‍या. हे माझ्या पहिल्या विदेश प्रवासाचे दृश्‍य नेहमी स्मरणात राहील. इथे पाहिलेली स्वच्छता, प्रामाणिकपणा, लोकांची सद्‌भावना, प्रगतशील तंत्रज्ञान, शिस्तबद्धता, नम्रता प्रशंसा करू तितकं कमीच. 

मी आले तेव्हा नुकतीच वसंत ऋतूची सुरवात झाली होती. सगळीकडे हिरवळ आणि झाडांना नवीन पालवी फुटून ट्युलिप दिसत होते. ट्युलिप पाहिल्यावर इथे चित्रीकरण केलेल्या ‘सिलसिला’ चित्रपटातील ‘देखा एक ख्वाब तो ये’ हे गाणं आठवलं. वसंत ऋतूमध्ये अगदी हिरवेगार आणि छान वातावरण असते. नंतर सप्टेंबरपासून पानगळ सुरू होते आणि थंडीही. 

मी एक डच भाषा शिकायचा कोर्स लावला. दुसऱ्या देशातून येणाऱ्यांसाठी भाषा शिकण्याची मोफत सुविधा सरकारतर्फे उपलब्ध केली जाते. नवीन कुठलीही गोष्ट शिकण्याचा आनंद हा वेगळाच असतो. डच कोर्समधील अनुभवही गमतीचे होते. सुरवातीला त्यांच्या प्रत्येक शब्दाचा उच्चार कठीण वाटायचा. मग हळूहळू तेही शिकले. आता मला डच भाषा समजतेही आणि बोलताही येते थोडीफार. इथे आल्यावर पाहिले, की इथे सगळे लोक म्हणजे अगदी सहा वर्षांच्या मुलापासून ते साठ वर्षांच्या म्हाताऱ्या बायका-माणसांपर्यंत सगळे सायकलच वापरतात. अगदी साध्या झाडू मारणाऱ्यापासून ते मॅनेजरपर्यंत सगळे सायकलने कामावर येतात. हेच नव्हे तर प्रेसिडेंट आणि इथला किंगसुद्धा. त्यामुळे सगळे लोक निरोगी आणि तंदुरुस्त आहेत. 

डच लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे ते प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करतात. कोणीही रस्त्यावर कचरा फेकत नाही. शिवाय वाहतुकीचे नियमदेखील सगळे काटेकोरपणे पाळतात. इथे प्रत्येक रस्त्याच्या स्पीड लिमिटप्रमाणे गाडी चालवावी लागते. इथे मी एक वर्ष ‘झारा’ नावाच्या कंपनीत काम केलं, तेव्हा मला यांची जीवनशैली अजून नीट समजली. ऑफिसमध्ये कोणीही बॉस किंवा मॅडम म्हणत नाही. प्रत्येकाला त्याच्या पहिल्या नावाने बोलावले जाते. डच लोकांचं मुख्य खाद्य म्हणजे ब्रेड आणि चीज. इथे जो-तो आपल्या जीवनात व्यस्त असल्यामुळे स्वतःच्या आई-बाबांना भेटण्यासाठीसुद्धा ‘अपॉइंटमेंट’ घेऊन जावे लागते. 

नेदरलॅंडमध्ये तीन वर्षे कशी गेली कळलंच नाही. इथे खूप डच आणि भारतीय मैत्रिणी झाल्या आहेत. सप्टेंबरमध्ये आम्ही इथे उत्साहात ‘ऐंधोवन मराठी मंडळा’ची स्थापना केली. आम्ही गणपती, गुढीपाडवासारखे सण साजरे करतो. मराठी गाणी गातो, मराठी गाण्यांवर नाच करतो, नाटक करतो. सणांचं खर महत्त्व हे विदेशातच येऊन कळतं. भारतात असताना इतक्‍या धावपळीच्या जीवनात सण हे सणासारखे साजरेच केले नाही, असं वाटतं. नेदरलॅंडमध्ये मी प्रत्येक सण खूप उत्साहाने साजरा करते. अगदी गुळपोळीपासून, पुरणपोळी, दिवाळी फराळ सगळं घरी करते. तीन वर्षे उलटली इथे येऊन; पण अजूनही हे एक सुंदर कल्पनेपलीकडचंच विश्व वाटतं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com