झाकल्या मुठीचा वसा

डॉ. नीलिमा राडकर
मंगळवार, 6 जून 2017

सोशल मीडियावर खूप वैयक्तिक माहितीचीही देवाणघेवाण केली जाते. त्यामुळे जवळच्या दोन व्यक्तींमध्ये मनभेद वाढल्याचा अनुभव येतो. असं व्हायला नको असेल, तर ‘झाकली मूठ’ सांभाळायची.

माणिकताई- माझ्या मैत्रिणीच्या सासूबाई म्हणजे शांत, सुस्वभावी व्यक्तिमत्त्व. शिक्षिका म्हणून त्या निवृत्त झाल्या आहेत. पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना सुसंस्कारांनी घडवलं; पण त्यांच्या मुलाचं असाध्य व्याधीनं निधन झालं. मुलगीही काही कारणांनी माहेरी राहात होती. माणिकताई मात्र खंबीरपणे सून आणि मुलीच्या पाठीशी उभ्या राहून नातवंडांना सांभाळतात. 

मी त्यांच्याकडे तिळगूळ घेण्यासाठी गेले होते. तेवढ्यात त्यांच्याकडे सोसायटीतील काही महिला आल्या. तिळगूळ घेण्याचं निमित्तं. त्या महिला सोसायटीतील इतर लोकांविषयी आपापसात बोलत होत्या. माणिकताई त्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून हवे-नको पाहात होत्या; पण हळूहळू गप्पांची गाडी माणिकताईंच्या वैयक्तिक आयुष्याकडे वळली. त्या महिला खोदून-खोदून विचारू लागल्या. एक तर म्हणाली, ‘‘तुम्ही संध्याकाळी आमच्याशी गप्पा मारायला का येत नाही? तेवढाच वेळ जातो चांगला. तुमच्या मुलीचं ऐकून फार वाईट वाटलं. एवढी गुणी मुलगी; पण काय नशिबाला आलं हो तिच्या. या वयात तुम्हाला केवढा त्रास होत असेल. आमच्याशी चार गोष्टी बोललात तर बरं वाटेल तुम्हाला आणि मुलीच्या बाबतीत आमची काही मदत हवी असेल, तर मोकळेपणानं सांगा बरं का?’’ त्या महिलांच्या मानभावीपणाचा मला खूप राग आला; पण माणिकताई शांतपणे म्हणाल्या, ‘‘चालायचंच. अहो, थोरामोठ्यांनाही भोग चुकले नाहीत मग आपलं काय हो. आणि माझी मुलगीच नाही तर सूनसुद्धा गुणी आहे बरं का? आत्ता त्यांना आधार दिला नाही, तर आपण जास्त पावसाळे पाहिलेत त्याचा काय उपयोग? असो. वेळ असेल तेव्हा येईन की तुमच्याशी गप्पा मारायला.’’

त्या महिला गेल्यानंतर मी माणिकताईंना म्हटलं, ‘‘तुम्ही कसं काय एवढं शांतपणे त्याचं हे बोलणं ऐकून घेतलं, तुम्हाला राग नाही का आला?’’ माणिकताई म्हणाल्या, ‘‘अग रागतर आलाच; पण त्याहीपेक्षा वाईट वाटलं. अशावेळी लगेच प्रतिक्रिया व्यक्त करून विषय वाढवण्यापेक्षा काही न बोलणं हेच उचित असतं. सासूबाईंनी मला एक वसा दिला होता. त्या म्हणाल्या, ‘‘तू माझ्याशी अगदी निःसंकोचपणे बोल. आपले मतभेद, गैरसमज आपणच एकमेकांशी बोलून सामंजस्यानं दूर करायचे. जवळचे मोजके लोक सोडून इतरांकडे आपल्या घरातल्या गोष्टींची, समस्यांची जाहीर वाच्यता करायची नाही. कारण अनेकदा बाहेरच्या व्यक्तींमुळे घरातले ताणतणाव वाढण्याची शक्‍यता असते. म्हणून त्यावर आपणच चर्चा करून मार्ग काढायचा. त्यासाठी ही मूठ ‘झाकली’ ठेवायची. हा एक आधुनिक ‘वसा’ आहे असंच समज. तो जपलास तर कुटुंबात समाधान नांदेल.’ सासूबाईंनी दिलेला हा ‘झाकल्या मुठीचा वसा’ जपला. त्यामुळे आमच्या घरातील वाद कधी विकोपाला गेले नाहीत आणि आमचे स्नेहाचे नातेसंबंध दृढ झाले.’’

त्या पुढे म्हणाल्या, ‘‘समस्या कोणाला नसतात? पण त्या इतरांना सांगणे, हा काही त्यावरचा उपाय नाही. काही जणांना दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावयाची हौस असते. लोकांच्या समस्या सोडवण्यापेक्षा ‘लांबून गंमत बघणे’ ही त्यांची प्रवृत्ती असते. स्वतःच्या समस्या मात्र ते झाकून ठेवतात. अशा व्यक्तींपासून चार हात लांब राहाणंच योग्य. कुणाशी मोकळेपणाने बोलायचंच नाही, असा याचा अर्थ नाही. उलट ज्या व्यक्तींना आपल्याविषयी ममत्व आहे, अशा विश्वासातल्या व्यक्तींकडे ही मूठ जरुर ‘सैल’ करावी, कारण त्यांच्याकडून या गोष्टी बाहेर जाणार नाहीत, याची खात्री असते. आपल्याजवळ जर कुणी मन मोकळं केलं, तर तीही ‘झाकली मूठ’ ठेवली पाहिजे. हा ‘झाकल्या मुठी’चा वसा जपलात तर घरात सुख-शांती लाभेल.’’

गीतेची शिकवण आचरणात आणणाऱ्या माणिकताईंच्या बोलण्यानं मला अंतर्मुख केलं. अनेकांना दुसऱ्यांच्या खासगी आयुष्याबद्दल कुतूहल वाटत असतं. त्यांच्याजवळ सहज जरी कुणी मनातील गोष्टी सांगितल्या तरी त्यात पदरची भर घालून त्या वाढवून चार लोकांत ते त्याचा बभ्रा करतात. आपल्या बाबतीत असं घडलं तर आपल्याला जसं वाईट वाटेल, तसंच ते दुसऱ्यालाही वाटेल, याचा विचार केला जात नाही; म्हणूनच आपल्याजवळ जर कुणी मनोभावना व्यक्ती, तर ती लोकांसमोर उघड करू नये. तसंच इतरांबद्दल आपल्याला कुणी सांगत असेल, तर त्यातील तथ्य पडताळल्याखेरीज त्यावर विश्वास ठेवू नये.

आता तर ‘सोशल मीडिया’वर प्रत्येक गोष्ट कथन केली जाते. काही जण त्याचा अतिरेकी आणि अनाठायी उपयोग करतात. यातून निर्माण झालेल्या गैरसमजाने जवळच्या नात्यांमध्ये नाहक कटुता आल्याचीही उदाहरणे आहेत. म्हणून हा ‘झाकल्या मुठीचा वसा’ प्रत्येक पिढीनं अवश्‍य जपला पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mukatpeeth Dr Neelima Radkar