वंदू दे गर्भाशया!

डॉ. रश्‍मी कोठावळे
सोमवार, 12 मार्च 2018

संतसाहित्याच्या प्रभावातून त्या महिलेच्या मनात आलेला विचार निसर्गाच्या किमयेला वंदन करणारा. त्या महिलेच्या कृतीने, त्यामागच्या विचाराने एका महिला डॉक्‍टरला चिंतनाला प्रवृत्त केले. 

आजचा दिवस हा माझ्यासाठी नेहमीप्रमाणे धावपळीचा होता. ‘ऑपरेशन थिएटर’मध्ये चार शस्त्रक्रिया आज यादीत होत्या. नेहमीप्रमाणे सर्व रुग्णांची शस्त्रक्रियेआधीची तपासणी केली. यादीत पहिली असलेल्या महिलेला तपासले व शस्त्रक्रियेसाठी ‘ऑपरेशन थिएटर’मध्ये घेण्यास सांगितले. त्या महिलेची दुर्बिणीद्वारे गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया होती. रुग्णाला वारंवार अतिरक्तस्रावाचा त्रास होत असल्यामुळे ही शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. महिला मध्यमवर्गीय, वारकरी संप्रदायातली, आठवड्याला समर्थांची बैठक, पंढरपूरची दरवर्षी वारी, भजन- कीर्तन करणे हा त्यांचा नित्यक्रम. शिक्षण दहावी. या महिलेचे माहेर आळंदी असल्यामुळे संत साहित्याचा आणि त्यांच्या विचारांचा चांगलाच पगडा त्यांच्या मनावर होता.

आतमध्ये टेबलवर घेतल्यावर मी त्यांना शस्त्रक्रिया कोणत्या पद्धतीने करणार, शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारा वेळ, भूल देण्याची पद्धत समजावून सांगितली. माझे सर्व बोलणे झाल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘एक विचारू का?’’ मला वाटले, इतरांप्रमाणे त्यांनाही भीती वाटत असेल व अजून काही शंका विचारणार असतील. मी म्हटले, ‘‘हो, विचारा की, तुम्हाला भीती वाटते का?’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘नाही, मला भीती वाटत नाही. माझा डॉक्‍टरांवर पूर्ण विश्वास आहे. डॉक्‍टर माझ्यासाठी जो निर्णय घेतील, तो माझ्या हिताचाच असेल. पण एक विचारू का? माझी एक इच्छा आहे.’’ मी विचारले, ‘‘काय आहे इच्छा तुमची?’’ त्या उत्तरल्या, ‘‘माझे गर्भाशय काढल्यावर मला गर्भाशयाला एकदा हात लावून नमस्कार करायचा आहे.’’ त्यांचे हे वाक्‍य ऐकून मी आश्‍चर्यचकित झाले. जास्त वेळ न घालवता मी त्यांना लगेचच म्हणाले, ‘‘तुम्ही शुद्धीवर आल्यावर मी तुम्हाला तुमचे गर्भाशय नक्की दाखवते. कारण नंतर गर्भाशय पॅथॉलॉजी लॅबला तपासणीसाठी दिले जाते.’’

मी त्यांना गर्भाशय दाखवणार म्हटल्यावर त्या निश्‍चिंत झाल्या. म्हणाल्या, ‘‘मॅडम, तुम्ही तुमचा शब्द पाळा. आता मला झोपेचं इंजेक्‍शन द्या.’’ त्यानंतर त्यांना पूर्ण भूल देऊन शस्त्रक्रिया पूर्ण झाली. दिलेल्या वचनाप्रमाणे शस्त्रक्रिया झाल्यावर काढलेले गर्भाशय काचेच्या बरणीत घालून दाखविण्यास सिस्टरना सांगितले. एव्हाना त्या चांगल्याच शुद्धीवर आल्या होत्या. त्यांनी त्या बरणीला हात लावून नमस्कार केला. त्यांचे नातेवाईक म्हणाले, ‘‘अगं, ज्या गर्भाशयामुळे तुला वर्षभर त्रास झाला, ते कशाला बघतेस? फेकून देऊ दे ते, जाळून टाकू दे.’’ त्या उत्तरल्या, ‘‘ज्या गर्भाशयाने आजपर्यंत साथ दिली, त्याचे उपकार विसरायचे का?’’ त्यांच्या याच उत्तराने मला विचार करण्यास भाग पाडले. खरेच, किती साधे आणि निरागस समीकरण हे! किती विचार करायला लावणारे! ज्या गर्भाशयाने आजपर्यंत म्हणजेच कुमार अवस्थेपासून, तारुण्यावस्था, वृद्धावस्थेपर्यंत साथ दिली, त्याचे उपकार मी कसे विसरायचे? एका गर्भाशयाने, महिलेला, एका लहान मुलीपासून एक स्त्री, एक आई होण्याचा हक्क दिला, समाजात तिला मान-सन्मान दिला, तारुण्याच्या उंबरठ्यावर, कळीपासून फूल होईपर्यंत सर्व शारीरिक बदलांना व गरजांना साथ दिली, तो अवयव किती महत्त्वाचा. ज्या अवयवाने एक संपूर्ण, परिपूर्ण स्त्री होण्याची ताकद दिली, त्या गर्भाशयाचा खरेच किती मोठा हा सन्मान! त्या माउलीने हा एवढा खोलवर विचार केला याचे मला खरेच खूप आश्‍चर्य वाटले. आजच्या या आधुनिक, भौतिक व संगणकी जगात आपण विचार करायला विसरलो आहोत. आपण व्हॉट्‌सॲप, फेसबुक या आभासी जगातच जगत आहोत. आपण या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा, धन्यवाद देत असतो. पण आपण हे आपल्यासाठीच पूर्णपणे विसरतो. आपल्या शरीरात अविरतपणे कार्य करणाऱ्या यंत्रणेला पूर्णपणे दुर्लक्षित करतो. आपले शरीर, त्याचे अवयव आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत, हा विचार आपल्या मनाला एकदाही शिवत नाही. जोपर्यंत आपण आजारी पडत नाही, तोपर्यंत आपल्याला आपल्या शरीराची काळजी, किंमत नसते. आपल्या मनाला वाटेल तसा ताण आपण शरीरावर देत असतो. या प्रसंगातून अजून एक विचार मनात आला, की खरोखरच अवयवदानाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे. एखादा अवयव निकामी असणाऱ्या गरजवंतालाच त्याचे खरे महत्त्व कळते. म्हणूनच आजच्या या आधुनिक जगात गरजू लोकांना विज्ञानाने साथ दिली. किडनी, हृदय, यकृत, गर्भाशय हे सर्व अवयव आपण दान करू शकतो. नुकतेच एका आईने आपल्या मुलीला गर्भाशय दिले याच पुण्यात. ती मायमाउली धन्य होय.

खरोखरच या निसर्गाला माझा दंडवत. जसे आपण एकमेकांना धन्यवाद देतो, त्याचप्रमाणे आपल्या शरीराला, त्याची काळजी घेणाऱ्या स्वतःला व कुटुंबालाही धन्यवाद दिले पाहिजेत. आज या माउलीच्या एका वाक्‍यातून, माझ्या अंतरंगात विचारांचे एवढे मोठे इंद्रधनुष्य साकारणाऱ्या संत माउलीला माझा त्रिवार प्रणाम!  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mukatpeeth Dr. rashmi kothawale article