न वाजणारी घंटा

मृणाल तुळपुळे
मंगळवार, 13 जून 2017

गेली अनेक वर्षे मी निरनिराळ्या प्रकारच्या घंटा जमवत आहे. आजमितीस जगाच्या कानाकोपऱ्यातून आणलेल्या चारशेच्या वर घंटा आहेत. माझ्या या छंदाबद्दल ऐकल्यावर आमच्या एका नातेवाइकांनी मला विचारले, ‘‘जगातल्या सर्वांत मोठ्या वाजणाऱ्या आणि न वाजणाऱ्या घंटांच्या प्रतिकृती तुझ्या संग्रहात आहेत का?’’

गेली अनेक वर्षे मी निरनिराळ्या प्रकारच्या घंटा जमवत आहे. आजमितीस जगाच्या कानाकोपऱ्यातून आणलेल्या चारशेच्या वर घंटा आहेत. माझ्या या छंदाबद्दल ऐकल्यावर आमच्या एका नातेवाइकांनी मला विचारले, ‘‘जगातल्या सर्वांत मोठ्या वाजणाऱ्या आणि न वाजणाऱ्या घंटांच्या प्रतिकृती तुझ्या संग्रहात आहेत का?’’

त्यांच्या प्रश्‍नातील ‘वाजणारी आणि न वाजणारी घंटा’ हे एकून मी चांगलीच चक्रावून गेले. न वाजणारी घंटा असते, हे मला तोपर्यंत माहीतच नव्हते. मग मी जगातील मोठ्या घंटाविषयी माहिती काढायला सुरवात केली. त्यानुसार रशियातील दोनशे टन वजनाची ‘झार बेल’ ही जगातील सर्वांत मोठी घंटा आहे. ती पूर्ण होण्याच्या आधीच तुटल्यामुळे मूक झाली व आजतागायत कधीच वाजली नाही. म्यानमारमधील नव्वद टन वजनाची ‘मिंगन बेल’ ही कित्येक वर्षे सर्वांत मोठी वाजणारी घंटा होती; पण चीनने २००० मध्ये एकशे सोळा टन वजनाची घंटा बनवून हेनान येथील देवळात बसवली. ‘बेल ऑफ गुडलक’ अशी ओळख असलेल्या या घंटेने ‘मिंगन बेल’ला मागे टाकून जगातील सर्वांत मोठी वाजणारी घंटा म्हणून मान मिळविला. झार बेलएवढी मोठी घंटा बनवणे मात्र आजपर्यंत कोणाला शक्‍य झाले नाही. त्यामुळे जरी वाजत नसली तरी ती आज जगातील सर्वांत मोठी घंटा समजली जाते. झार बेल ही ‘तसर बेल’, ‘तसर कोलोकोल तीन’ किंवा ‘रॉयल बेल’ म्हणूनही ओळखली जाते.

सोळाव्या शतकात रशियामध्ये सुमारे दीड टन वजनाची एक अप्रतिम घंटा बनवून ती मॉस्को क्रेमलिन येथील बेलटॉवरमध्ये बसवण्यात आली. दुर्दैवाने ती घंटा दोन वेळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडून तुटली. त्यानंतर प्रिन्सेस ॲना लोनोव्हाच्या कारकिर्दीत तिच्या पुढाकाराने ती घंटा वितळवून त्यात कित्येक किलो चांदी, सोने व आणखी काही धातू मिसळून ती परत एकदा कास्ट केली गेली. या घंटेवर ॲनाचे मोठे चित्र कोरले असून जीझस, व्हर्जिन मेरी, देवदूत; तसेच पाना-फुलांची नक्षीदार चित्रे आहेत. घंटेवर एका बाजूला तिचा इतिहास सांगणारा मजकूर कोरला आहे. अशा तऱ्हेने पूर्णपणे तयार झालेली घंटा क्रेमलिनमध्ये जमिनीवर ठेवण्यात आली. त्याचवेळी त्या परिसरात आग लागली व ती पसरून घंटेला आधारासाठी लावलेल्या लाकडांनी पेट घेतला. लोकांनी त्यावर गार पाणी ओतून आग विझवण्याचा प्रयत्न केला; पण त्यामुळे घंटेला अनेक तडे गेले. घंटेचा एक भला मोठा म्हणजे साडेअकरा टन वजनाचा तुकडा निखळून खाली पडला व ती घंटा मूक झाली.

काही दिवस ती घंटा तशीच पडून होती. कालांतराने त्या प्रचंड आकाराच्या घंटेचा चॅपेल म्हणून; तर तुटलेल्या तुकड्याच्या पोकळीचा दरवाजा म्हणून उपयोग केला गेला. शेवटी १८३६ मध्ये ती घंटा उचलून मॉस्को क्रेमकीन वॉल व इवान दी ग्रेट बेलटॉवर यांच्यामध्ये एका चौथऱ्यावर उभी करण्यात यश आले. हे सर्व ऐकल्यानंतर माझ्यासारख्या घंटाप्रेमीला झार घंटा बघण्याची इच्छा झाली नाही तरच नवल. गेली कित्येक वर्षे वीस फूट परीघाची आणि बावीस फूट उंचीची ही घंटा मला खुणावत होती. अखेर गेल्या महिन्यात मॉस्कोला जाण्याचा योग आला व याचि डोळा याचि देही झार बेलचे दर्शन झाले. क्रेमलीनचा परिसर व त्यात उभी असलेली ती सुंदर घंटा बघून मी अगदी धन्य झाले.

क्रेमलिनमध्ये सकाळची थंड हवा आणि गार वारा अंगावर घेत चालत असतानाच सोनेरी किरणे अंगावर झेलत उभ्या असलेल्या झार बेलचे लांबून दर्शन झाले. घंटेच्या वरती असलेला सोनेरी क्रॉस लकलकताना दिसला. कधी एकदा त्या घंटेजवळ जाते आणि ती घंटा बघते, असे मला झाले होते आणि अखेर तो क्षण आला. जगातील सर्वांत मोठ्या घंटेसमोर मी उभी आहे, यावर माझा विश्‍वासच बसला नाही. सर्वांच्या पुढे जाऊन किती तरी वेळ मी तिच्यावरची चित्रे व कोरीव काम डोळे भरून बघत होते. तीवरचा इतिहास रशियनमध्ये लिहिला असल्यामुळे वाचता आला नाही; पण त्या घंटेची, त्यावरील चित्रांची, तुटलेल्या तुकड्यांची अशी असंख्य छायाचित्रे काढली. तिच्या समवेत खूप वेळ घालवला तरी तिथून माझा पाय हलत नव्हता. शेवटी तिचे रूप डोळ्यांत साठवून ठेवत स्वप्नपूर्तीच्या समाधानाने मी क्रेमलिनच्या बाहेर पडले.

Web Title: mukatpeeth Mrunal tulpule