निरोप घेता...

प्रदीप वि. मांडके
गुरुवार, 8 जून 2017

आजोबा गेले ती सरत्या मार्गशीर्षातील संध्याकाळ होती. सहा वाजल्यापासूनच सगळीकडे अंधारून आलं होतं. हवेत गारवा जाणवत होता. माणसं घराकडे परतत होती. गुरे-ढोरे गोठ्यात आधीच बांधली होती. आजूबाजूच्या घरातील बाया-मुली चुली पेटवत होत्या. सकाळपासूनच आजोबांची हालचाल थंडावत चालली होती. दादांच्या सांगण्यावरून डॉक्‍टर घरी येऊन गेले होते. डॉक्‍टरांनी जाताना घरादाराला पुढची कल्पना दिली होती. हळूहळू आजोबांचा श्‍वास मंदावू लागला. आईनं झटकन देवघरातील गंगाजलाची कुपी फोडली. दादांनी ते जल हळूहळू त्यांच्या तोंडात घातलं. पुढील पाच मिनिटांत मृत्युची बातमी साऱ्या गावाला कळली. हळूहळू सारा गाव तिथे जमा झाला.

आजोबा गेले ती सरत्या मार्गशीर्षातील संध्याकाळ होती. सहा वाजल्यापासूनच सगळीकडे अंधारून आलं होतं. हवेत गारवा जाणवत होता. माणसं घराकडे परतत होती. गुरे-ढोरे गोठ्यात आधीच बांधली होती. आजूबाजूच्या घरातील बाया-मुली चुली पेटवत होत्या. सकाळपासूनच आजोबांची हालचाल थंडावत चालली होती. दादांच्या सांगण्यावरून डॉक्‍टर घरी येऊन गेले होते. डॉक्‍टरांनी जाताना घरादाराला पुढची कल्पना दिली होती. हळूहळू आजोबांचा श्‍वास मंदावू लागला. आईनं झटकन देवघरातील गंगाजलाची कुपी फोडली. दादांनी ते जल हळूहळू त्यांच्या तोंडात घातलं. पुढील पाच मिनिटांत मृत्युची बातमी साऱ्या गावाला कळली. हळूहळू सारा गाव तिथे जमा झाला. ओसरीवर आजोबांचा देह. त्यांच्या आजूबाजूस, माजघरात, अंगणात जिथे जागा असेल तिथे बाया, पुरुष बसू लागले. 

घरातली परंपरागत भिक्षुकी करताना आजोबांनी, हरितात्यांनी, दक्षिणा कधी मागून घेतली नाही. यजमानांकडून जे काही मिळे, त्यावर ते समाधानी असत. काही ना काही विचारण्यासाठी कर्ते पुरुष आणि बाया त्यांच्याकडे यायच्या. कधी लग्नासाठी मुहूर्त काढायला, त्याआधी पत्रिका करायला, जुळतात का नाही ते पहायला, तर कधी पोरीचं लग्न लांबलं, तर देवाधर्माचे उपाय करून घ्यायला. हरितात्या आयुष्यात कधी खोटं न बोलल्यानं त्यांना वाचासिद्धी आहे, असा सगळ्यांचाच विश्‍वास होता. 

रघूकाका स्टॅंण्डवरील कॅंटीनमध्ये गल्ल्यावर बसायचे, त्यांना आणायला निघालो. त्यांना आधीच कळले होते. वाटेतच भेटले. आम्ही दोघे झपझप घराकडे परतलो. दत्ताकाका व त्यांचे कुटुंब पुण्यात होते. आत्या कोंढव्याच्या शाळेत शिक्षिका होती. त्यांना आणण्यासाठी चिरपूटकर गुरुजी एसटीनं पुण्याकडे निघाले. हळूहळू रात्र वाढू लागली, तशी घरातली गर्दी पण वाढू लागली. बायका ओसरी आणि माजघरात डोक्‍यावर पदर घेऊन बसल्या होत्या. तर पुरुष अंगणात आणि घराच्या दरवाज्याच्या आत-बाहेर उभे होते. त्यातील काही जण पुढच्या तयारीला लागले होते. फटफटायला लागले, तसं आजोबांचं पार्थिव तिरडीवर ठेवलं गेलं. त्यांना अखेरचा निरोप द्यायला सारा गाव नदीच्या दिशेनं चालू लागला...

सुनीताबाई गेली काही वर्षे आजारीच होत्या. पण हिंडून फिरून होत्या. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी. दोघंही नोकरीनिमित्त परदेशी स्थायिक झाले होते. सुरवातीला मुले वर्षा- दोन वर्षांनी येत असत; पण आता तिकडच्या व्यापामुळे त्यांचे जाणे-येणे खूपच कमी झाले होते. सुनीताबाईंना परदेशात करमायचे नाही. त्यामुळे परदेशात मुलांकडे जायला त्या फारशा खूष नसत. त्यांच्या शेजारच्याच फ्लॅटमध्ये सामंत कुटुंब होते. सामंतांची एकुलती एक मुलगी लग्नानंतर बंगळूरला स्थायिक झाली होती. मनोहर सामंत आणि त्यांच्या पत्नी मंगलाबाईंशी सुनीताबाईंची चांगली मैत्री होती. गेल्याच वर्षी मंगलाताई काहीशा आजाराने निवर्तल्या आणि मनोहरपंत घरात एकटेच राहत होते. आता मनोहरपंत व सुनीताबाईंना एकमेकांचा आधार होता. दोन्ही घरांत कमळाबाई सगळी कामं करत असत. 

अचानक तब्येत बिघडलेल्या सुनीताबाईंना मनोहरपंतांनी कमळाबाईंच्या मदतीने हॉस्पिटलात नेले. सर्व सुखसोयींनीयुक्त अशा त्या हॉस्पिटलमध्ये सुनीताबाईंवर उपचार चालू होते. पण प्रकृती साथ देत नव्हती. डॉक्‍टरांनी सुनीताबाईंच्या मुलांशी संपर्क साधावा आणि मुलांना त्यांच्या आजारपणाविषयी कल्पना द्यावी असं सांगितलं. महत्त्वाची कॉन्फरन्स चालू असल्याने मुलाला येणं शक्‍य नव्हतं. सुनीताबाईंची मुलगी लगेचच येण्यास निघाली. पण ती पोचण्याच्या आधीच सुनीताबाई गेल्या. ती येईपर्यंत सुनीताबाईंचा देह शवागारात ठेवण्यात आला. सुनीताबाईंची मुलगी पोचली. तिनं पंतांच्या मदतीनं पुढील कार्य उरकलं. तिचं परतीचं तिकीट लगेचचं होतं. तिला निघणं भाग होतं.

सुनीताबाई राहात होत्या त्या घराचं आणि त्यांच्या सामानाचं पुढे करायचं काय, असं पंतांनी विचारताच तिनं भावाला परदेशात फोन केला. शेवटी दोघांनी असं ठरविलं की, सध्या घर बंद करू आणि पुढे सवडीनं ठरवू. सुनीताबाईंची मुलगी परत जायला निघाली. जाताना, ती मनोहरपंतांना भेटली आणि म्हणाली, ‘‘काका, आमच्या घराची किल्ली तुमच्याकडेच राहू देत.’’

मनोहरपंतांनी एक दीर्घ श्‍वास घेतला आणि तिला म्हणाले, ‘‘बाळ, पुढच्या वेळी तुम्ही याल, तेव्हा मी असेनच असं नाही. तेव्हा ही किल्ली आता तू तुझ्याच जवळ ठेव.’’

तिनं एकदा आपल्या घराकडे पाहिलं. पंतांना नमस्कार केला आणि विमानतळाच्या दिशेनं तिची टॅक्‍सी धावू लागली!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mukatpeeth pradeep mandke article