वजीचे हातोडा मिशन (मुक्तपीठ)

हेमलता भालेराव, पुणे 
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

कष्टकरी बाईशी माझी सहज मैत्री जमते. उन्हातल्या आणि सावलीतल्या कष्टकरी महिलांच्या श्रमात तफावत असली, तरी स्त्रियांच्या समस्या सारख्याच असतात. अशा मैत्रीतून सुख-दुःखाचे पदर सोडविताना भन्नाट गमतीही घडतात... 

कष्टकरी बाईशी माझी सहज मैत्री जमते. उन्हातल्या आणि सावलीतल्या कष्टकरी महिलांच्या श्रमात तफावत असली, तरी स्त्रियांच्या समस्या सारख्याच असतात. अशा मैत्रीतून सुख-दुःखाचे पदर सोडविताना भन्नाट गमतीही घडतात... 

माझी बहुतांशी नोकरी पुणे-पंढरपूर राजरस्त्यालगतच्या शाळांमध्ये झाली. अशीच एक दौंडज गावची शाळा. अगदी रस्त्यालगत. त्या शाळेत मी नोकरी करत असताना रस्ता दुरुस्ती सुरू होती आणि खडी बारीक फोडण्याचं काम काही विवाहित तरुण पोरी भर उन्हात करत असायच्या. त्या कामगार पोरी माझ्या समवयाच्या असल्याने त्यांच्याशी माझी मैत्री झाली. त्या माझ्या शाळेच्या ओसरीवर दुपारी जेवायला, विश्रांतीला येऊ लागल्या. मग आमची जीवस्य मैत्री झाली. फरक इतकाच, की त्या उन्हात काम करत असायच्या, तर मी सावलीमध्ये. शिक्षणाने मला केवढे सुख दिले होते, याची जाणीव मला पदोपदी व्हायची. शिक्षणाचे महत्त्व जाणवायचं. 
एक दिवस वजी (वैजयंता) मला म्हणाली, ""मास्तरणीचं झॅक हाय. खुडचीवर बसून काम. हामाला रोडावर खाली चटकं आन्‌ वर हूनानं (ऊन) करपायचं. बरं, येणारी जाणारी ती नीट जात्यात का? हामचं कष्टाचं हात त्यानले दिसत न्हायीत. हायचं उगडं आंग न्ह्याळीत खुणवत, डोळं मिचकावत जात्यात. मेल्याच्या डोळ्यात काचळ (दगडाची पातळ कपची) घुसरी तर बरं. बाप्याची जातच द्वाड.'' 
मी त्यांना म्हणाले, ""मग अंगात चोळी का घालत नाही''. त्यावर त्यांच्यातली एक म्हणाली, ""सीता मायला कांचन मिरजाची चोळी मिळाली न्हाई. तवापस्नं हामी बायकांनी चोळी घालणं बंद केलं.'' 
मी म्हणाले, ""मग बघणार नाहीत तर काय? आणि नुसतं बघण्यानं तुमचं काय बिगडतं. आपण लक्ष नाही द्यायचं.'' वजी म्हणाली, ""आन्‌ डोळ्यांनी खुणा करत्या त्याचं काय?'' ""मग हातोडा आहे की तुमच्या हातात. दाखवायचा इंगा,'' मी अगदी सहज बोलून गेले. 
माझे नऊ महिने भरले असल्याने मी घरीच राहिले आणि 7 फेब्रुवारी 1973 रोजी माझं बाळंतपण झालं. रीतसर रजा अर्ज देण्यासाठी माझे पती पुण्यातून गावी जेजुरीला गेले. दौंडज 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असल्याने ते सायकलवरच निघाले. येताना त्यांना शाळेपासून काही अंतरावर माझ्या मैत्रिणी झाडाखाली जेवण करून विसावा घेत असल्याचे दिसले. माझ्या त्या मैत्रिणीबद्दल मी ह्यांच्याजवळ नेहमी गप्पा मारत असल्याने त्यांना वाटले ह्याच त्या. त्यांना मुलगा झाल्याची खबर द्यावी, म्हणून ते सायकल थांबवून ओरडून माझ्याबद्दल सांगू लागले. त्यांना वाटले हा पहिलवान गडी आपल्याला खाणाखुणा करून पाळवतोय. त्यांनी त्यांच्या भाषेत शिव्या देत कालवा केला. आता एवढ्यावर ह्यांनी निघून यायचं, तर बाळंतपण, बाळ अशा खाणाखुणा जास्तच सुरू केल्या. मग तर वंजी हातात हातोडा घेऊन त्यांच्या दिशेने पळत सुटली. आता मात्र प्रसंग बाका म्हणत त्यांनी सायकलवरून थेट घराकडं धूम ठोकली आणि घडलेला सारा प्रकार सांगितला. मी म्हणाले, ""अहो, तुम्ही तर जान ना पहचान, मैं तेरा मेहमान'', अशीच परवड करून घेतली की आणि आम्ही दोघेही पोट धरून हसत सुटलो. 
काही दिवसांनी जेजुरीच्या आठवडी बाजारात त्या माझ्या सख्या आल्या आणि भेटायलाही माझ्या घरी आल्या. खूप काही गप्पा झाल्या. वजी म्हणाली, ""मास्तरीणबाई, एका बाप्याला चांगलाच इंगा दावला. आवं हामाला हातानं पालवत व्हता. मिशी-मिशी (मिसेस) दिलभर - दिलबर (डिलेव्हरी) असं म्हणत व्हता. मग काय उचलला हातोडा. तर त्यो तकट धूम. तुमी सांगीटलेली इद्या लई भारी...'' 
मी म्हणाले, ""अगं हो, पण तो बाप्या माझा नवरा होता. माझ्या बाळांतपणाची बातमी तुम्हाला सांगत होता ना. त्यावर त्या म्हणाल्या, ""आय्योऽऽ आरं... देवा... समदं चुकीचं घडलं की. आता वं काय? 
मी म्हटलं, "तुम्ही तर गुरूनं शिकवलेली विद्या गुरुपतीवरच वापरली की. आम्ही साऱ्या जणी पुन्हा खळखळून हसलो. वजी मात्र गार झालेला चहासुद्धा चटके बसत असल्यासारखा फुंकून फुंकून पित होती... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktapeeth