पुन्हा एकदा दंगल

प्रसाद राजन क्षीरसागर
सोमवार, 17 एप्रिल 2017

‘दंगल’ चित्रपटात लहान गीता-बबिता यांचे जीवन जसे अचानक पालटून गेले, तसेच एका रात्रीत माझ्याही आयुष्यात मोठा बदल घडला.

नववीत होतो. शाळा सुरू होऊन दोन महिने झाले होते. एकेदिवशी प्रशालेतून घरी पत्र आले. दुसऱ्या दिवशी बाबा शाळेत वर्गशिक्षकांना भेटले. त्या रात्रीच माझ्या आई-वडिलांनी माझे आयुष्य बदलून टाकणारा निर्णय घेतला. पुण्यातील प्रसिद्ध प्रशालेतून आमची रवानगी पुरंदर तालुक्‍यातील चांबळीमधील कृषी औद्योगिक विद्यालयात झाली. खूप रडलो, नीट वागेन, अशा शपथा झाल्या . नाना तऱ्हेने आईबाबांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत हो तो... पण आईबाबांवर काही परिणाम झाला नव्हता. माझी आई चांबळीच्या शाळेत शिक्षिका होती. शाळेच्याच गेस्ट हाउसमध्ये माझी राहण्याची व्यवस्था करण्यात आली. आई पुण्याहून चाळीस मैल लांब असलेल्या या गावात नोकरीसाठी रोज जा-ये करत होती. सकाळी आठ वाजता घर सोडायची ते रात्रीचे आठ वाजायचे घरी यायला. वडीलही दिवसभर घरी नाहीत. आम्हा तिघा भावंडांचे राज्य असायचे. दिवसभर कुणीही विचारणारे नव्हते. त्यामुळे माझ्या वागण्यात, स्वैरपणा आला होता. यावर तोडगा म्हणून आईने तिच्या शाळेत माझी शिक्षणाची व्यवस्था केली होती. म्हणजे मी दिवसभर डोळ्यासमोर राहीन. गेस्ट हाउसमध्ये सहा शिक्षक राहायचे. त्यांचे लक्ष असायचे.

चांबळी लहान गाव. बाईंनी आपल्या मुलाला पुण्याच्या शाळेतून काढून इथे आणल्याची बातमी सर्व गावात झाली होती. मी गावातील लोकांच्या चर्चेचा विषय झालो होतो. शाळेतही मी मुलामुलींच्या चर्चेचा विषय ठरलो होतो. मला फार अपराधी वाटायचे. आमच्या शाळेचा गणवेश होता पांढरा शर्ट, खाकी अर्धी चड्डी आणि डोक्‍यावर गांधी टोपी. मला ती टोपी घालायला अजिबात आवडत नसे. हळूहळू मी या जीवनाला सरावलो. बाईंचा मुलगा या कारणाने सर्व शिक्षकांचे माझ्यावर विशेष लक्ष असे. आमच्या शाळेत शाळा सुरू होण्यापूर्वी सामूहिक प्रार्थना म्हणण्याची पद्धत होती. एकदा प्रार्थना संपल्यावर एका शिक्षकानी मला थांबवले व म्हणाले, ‘‘बाईंचा मुलगा म्हणून तुला विशेष सवलत नाही. प्रार्थना का म्हणत नव्हतास?’’ मी म्हणालो, ‘‘प्रार्थना म्हणत होतो सर.’’ ‘‘मग मी काय खोटे बोलतोय का?’’ असे म्हणत त्या सरांनी मला वेताच्या छडीने मारले. माझी आई हा सर्व प्रकार पाहत होती. ती पुढे आली. सरांच्या हातातून छडी घेतली अन् जे मला मारायला सुरवात केली की काही विचारू नका. हातावर, पाठीवर, ढुंगणावर सपासप छड्या मारत हो ती. जवळपास शंभर छड्या मारल्या असाव्यात. सर्व शाळा पाहत होती. शेवटी त्या सरांकडे पाहत आई एवढेच बोलली, ‘‘माझा मुलगा म्हणून याला कोणतीही विशेष सवलत नाही. कदाचित माझा मुलगा म्हणून तुम्ही फक्त एकच छडी मारली असती.’’ आईचा आवाज घोगरा झाला होता. रागाने लालबुंद झाली होती. तशीच शिक्षकखोलीकडे गेली. मी वर्गात आलो. सर्वजण माझ्याकडे पाहत होते. मी वर पाहिले तर सर्वच्या डोळ्यांत पाणी होते. मुली तर रडतच होत्या. या घटनेने एक झाले. बाकी विद्यार्थना आपोआप कळून चुकले की बाई स्वत:च्या मुलालाही शिक्षा करायला मागे पुढे पाहत नाहीत, तेव्हा आपणही बाईंच्या तासाला नीटच वागले पाहीजे. मला नंतर माझ्या सहनिवासी शिक्षकांनी सांगितले, की त्या सरांशी आईची काही दिवसांपूर्वी कुठल्या तरी कारणाने वादावादी झाली होती.

आमची शेतकी शाळा होती. त्यामुळे आम्हाला शेती विषय होता. झाडे लावणे, खड्डे खणणे अशी कामे प्रात्यक्षिक म्हणून असत. मी याआधी कधीच हातात कुदळ- फावडे घेतले नव्हते. शेती शिक्षकांनी प्रत्येकाला दहा खड्डे घ्यायला सांगितले. मला म्हणाले, की तू दोनच खड्डे घे. मला प्रार्थनेचा किस्सा आठवला. मी म्हणालो, ‘‘नको सर, मीही दहा खड्डे घेतो.’’ जोशात खड्डे खणायला सुरवात केली खरी, पण माझ्या सारख्या शहरी मुलाला अवघड होते. पण मी दहा खड्डे पूर्ण केले. माझ्या हाताला फोड आले हो ते. पण मला समाधान हो ते. माझ्या या कृतीने मी माझ्या इतर मित्रांच्या मनातही मैत्रीचे स्थान निर्माण करू शकलो. चांबळीच्या जीवनात मला खूप मजा यायला लागली होती. स्वत:चे कपडे धुण्याची सवय लागली. स्वयंपाक करायला शिकलो. मी मित्रांसोबत सुटीच्या दिवशी शेतावर जात असे. शेतात काम करीत असे. पाणी धरायचो. बैलं दावणीला बांधायला शिकलो. बैलगाडी चालवायला शिकलो. धारा काढायला शिकलो. गुरे वळायला शिकलो. शेणाने घर सारवायला शिकलो. माझ्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला होता.
आताशा सुटीतही माझे मन पुण्यात रमत नव्हते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktapeeth