आधार मुलांचा (मुक्तपीठ)

लीना पाटकर 
सोमवार, 15 एप्रिल 2019

समाजाविषयी कटुत्व निर्माण व्हावे मनात असे होरपळलेले बालपण वाट्याला आलेले, पण तरीही दुसऱ्यांचे बालपण जपण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. 

काही दिवसांपूर्वी विरार जवळच्या भाताने गावात असलेल्या "साई आधार'ची माहिती मिळाली. वह्या, पुस्तके, पेन, पेन्सील, फळा, खडू अशा वस्तू, थोडा खाऊ, धान्य घेण्यासाठी काही रक्कम घेऊन आम्ही पाच मैत्रिणी पोचलो. आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि जाणवले की आपण देवमाणसांना भेटलो. "साई आधार'चे विशाल परुळेकर हे मूळचे कोकणातल्या पाट-परुळ्याचे. त्यांच्या डोक्‍यावरचे आई-वडिलांचे छत्र खूप लवकर हरवले. अवघे सात-आठ वर्षांचे असताना एका साई मंदिराच्या बाहेर भीक मागून जगू लागले.

जेवण मिळते म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊ लागले. वसईच्या शाळेत नववीत असताना एनसीसीमध्ये होते. तेव्हा पोलिस अधिकारी सावंत यांची नजर चुणचुणीत विशालवर गेली आणि विशाल त्यांच्या पोलिस ठाण्यात पोऱ्याचे काम करू लागला. लादी पुसणे, साफसफाई करणे, बुटांना पॉलिश करणे अशी कामे विशाल करू लागला. या मदतीमुळे विशाल दहावी झाले. पुढे चित्रपटगृहात वॉचमनची नोकरी करून त्यांनी मानसशास्त्र विषयात पदवी मिळवली. नंतर शिर्डीला एका मित्राबरोबर भागीदारीमध्ये हॉटेल व्यवसाय सुरू केला. आता त्यांची आर्थिक स्थिती सुधारली. 

आपले बालपण, तेव्हा होणारी आबाळ त्यांना आठवत होती. त्यांनी गरजू आणि गांजलेल्या मुलांचा सांभाळ करायला सुरवात केली. पत्नी अंकिता यांचीही साथ लाभली. गरजू मुलांना आणायचे, वाढवायचे, शिकवायचे आणि चांगला माणूस करायचे, एवढेच ध्येय बनले. वीस मुलांना सांभाळायचे ठरवले, पण हा आकडा बावन्नवर पोचला. जागा अपुरी पडू लागली. मग त्यांनी घर विकले, हॉटेलची भागीदारी बंद केली व भाताने गावात घर बांधले.

एक छोटा टेम्पो विकत घेतला. ही मुले एकमेकांची काळजी घेतात, आपल्या कलेतून समाज प्रबोधनाचे काम करतात. तसेच वेगवेगळ्या कपड्यांच्या पिशव्या शिवून त्यांची विक्री करतात. "श्री हरी' म्हणत हसतमुखाने नमस्कार करतात. वेळ प्रसंगी "आबा'ला दम देखील देतात. आपल्या "आई'ची प्रेमाने काळजी घेतात. इथे राहून गेलेली मुले दिवाळी पहाटला एकत्र जमतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktapeeth Article on Adhaar Mulancha