गट्‍स... गटिंगसाठी

आशा शिंदे 
Monday, 11 November 2019

कोणतीही गोष्ट अशक्य नसते. ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करेपर्यंत ती अवघडही वाटत असते; पण प्रयत्न करीत राहिले की ती सहजसाध्य होते.

पती दत्ताजी शिंदे यांच्या अपघातामुळे मला अचानक ‘शिंदे स्पोर्टस्’‌ सांभाळावे लागले. दुकानातील नवीन क्रीडासाहित्य विक्रीबरोबरच बॅडमिंटन, टेनिस रॅकेट्‍सना गटिंगही करून घ्यावे लागायचे.

दत्ताजी अंथरुणावर झोपून होते. गटिंगचे काम करायला कुणी नव्हते. घरात मशिन असूनही मला त्यावर काम करता येत नाही याचे वाईट वाटायचे. त्या दिवशी दत्ताजींना ॲटॅक आल्यामुळे डॉक्‍टरांनी इंजेक्‍शन, गोळ्या देऊन झोपून राहण्याचा सल्ला दिला होता. मी घरीच थांबले होते. डोक्‍यात गटिंग मशिन हेच विचार सुरू होते. क्षणभर विचार केला अन्‌ स्वतःच मशिनवर गटिंग करायला शिकायचे ठरवले. अपघातापूर्वी दत्ताजींना गटिंग करताना पाहिले होते; पण लांबूनच. मग दत्ताजींची टेनिस रॅकेट घेतली. तिचे बारकाईने निरीक्षण केले. गटचे उभे-आडवे धागे किती, कसे विणले आहेत; सुरवात, शेवट कुठे गाठी मारून केला? मग एक जुनी रॅकेट घेतली. घरी गट्‍स होतेच. रॅकेट मशिनवर ठेवून स्क्रू, क्‍लिप्स लावून घट्ट बसवली. दत्ताजींची रॅकेट शेजारी ठेवून त्याप्रमाणे गटचे धागे घातले. एक एक धागा ओढून मशिनच्या क्‍लिपमध्ये अडकवला.

मशिनच्या पॅंडलवर पायाने दाब दिल्यावर वजनबार वर उचलला जाऊन गटला ताण बसायचा. ही क्रिया करताना दहा वेळा चुकले; पण परत परत करीत राहिले. आडवे धागे घालताना उभ्या धाग्यांच्या एकाआड एक या पद्धतीने वर-खाली घालतानाही खूप गोंधळ झाला होता; पण शेवटी जमले. यासाठी जवळजवळ तीन तास घालवावे लागले होते. स्क्रू पिळून हाताला घट्टे पडले होते; पण रॅकेटला मशिनवर गटिंग केल्याचा आनंद काही औरच होता. त्यानंतर मात्र दुकानातून आल्यावर रोज ग्राहकांच्या रॅकेट्‍सना गटिंग करण्याचे काम करू लागले. जागतिक बॅडमिंटन खेळाडू प्रकाश पदुकोण, दीपू, रोमन घोष आणि जागतिक टेनिस खेळाडू रामनाथन कृष्णन, विजय अमृतराज, आनंद अमृतराज, शशी मेनन, तसेच आता पाँडेचेरीच्या राज्यपाल असलेल्या किरण बेदी अशा नामवंतांच्या रॅकेट्‍सना गटिंग करून देण्याचे भाग्य मला लाभले. टुर्नामेंटसाठी आलेल्या परदेशी खेळाडूंच्या रॅकेट्‍सनादेखील मी गटिंग करून दिले होते. जिद्दीने स्वतःच मशिनवर गटिंग करायला शिकले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktapeeth article asha shinde