घरट्यातील भाडेकरू

 अश्‍विनी जोशी 
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

हल्ली पक्ष्यांना घरटी बांधायला जागा मिळणे कठीण होत आहे. मुनियाच्या जोडीने सुगरणीच्या घरट्यातच भाडेकरू होणे पसंद केले.

झाडावरचे पक्ष्यांचे घरटे पाहून आपल्याला नक्कीच आनंद होतो. त्यातल्या त्यात सुगरणीचे घरटे तर सर्वांना मोहून टाकते. सुगरण आपल्या पिलांसाठी सुबक, उबदार घरटे बनविते. कोणालाही मोह पडावा असेच असते. मे महिन्यात घरचे आम्ही सर्व जण फिरायला कोकणात गेलो होतो. त्या वेळी फिरताना रस्त्यावर पडलेले सुगरणीचे घरटे सापडले. ते मी घरी आणून माझ्या खिडकीत टांगून ठेवले. ते दिसत तर सुंदर होतेच; पण खिडकीपाशी मुद्दाम टांगले होते. अपेक्षा होती, की याचा योग्य वापर होईल. आता नेहमीप्रमाणे घरच्या लोकांनी विरोधच केला म्हणा. हिचे आपले काहीतरीच असते, म्हणून बोल लावले आणि माझ्यावर तोंडसुख घेतले. पण मीही तिकडे दुर्लक्ष केले आणि माझा उत्साह मावळू दिला नाही. ‘घरटे भाडे तत्त्वावर देणे आहे’. केवळ गोड किलबिलाट कानी पडावा, एवढीच अपेक्षा.

पक्षी साधारणपणे असे तयार घरटे वापरत नाहीत, असे ऐकले होते. पण सध्या कृत्रिम घरटी बागेत लावतात हेही ऐकून होते. या प्रयोगासारखा हाही माझा छोटासा प्रयत्न होता असे मनात आले आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाची वाट बघत बसले. आश्‍चर्य म्हणजे काही दिवसांपूर्वी मुनिया पक्ष्यांच्या जोडीने या घरट्यात आत-बाहेर करुन घरटे पसंत केले. ‘डिपॉझिट’ म्हणून सकाळी गोड आवाजात किलबिल करीत घरट्यात आत-बाहेर करू लागले. खूप लगबग चालली होती जोडीची. पण मध्येच काही दिवस आवाज येईना. जोडीही सतत दिसेना. मनात आले की, या जोडीला भाड्याचे घरटे पटले नाही की, या जोडीचेच एकमेकांशी पटले नाही? आश्‍चर्य म्हणजे पुन्हा अचानक जोडी दृष्टीस पडली. लक्षात आले की, ते घरटे त्यांनी केवळ ‘फायनल’ केलेले नाही, तर त्यात पिलांची किलबिलही ऐकू येऊ लागली आहे. सध्या पुण्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसात झाडावर घरटे बांधणे अवघड झालेले असताना, आपण खिडकीपाशी टांगलेल्या घरट्याचा सदुपयोग झाला, असे नक्कीच वाटले आणि एक मानसिक समाधान वाटले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktapeeth Article Ashiwini joshi

टॅग्स