हात दाखवून ‘अवलिया क्षण’

अजित नाडगीर
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

भविष्य सांगणारे पोपट उडून गेले, पण आता मॉलमध्ये असेच खुशामतीचे भविष्य सांगणारे भेटू लागले आहेत.

भविष्य सांगणारे पोपट उडून गेले, पण आता मॉलमध्ये असेच खुशामतीचे भविष्य सांगणारे भेटू लागले आहेत.

‘‘तुम्ही फार साधे, सरळ व भोळे आहात, याचा फायदा तुमचे जवळचे लोक घेतात. कार्यालयात व इतर कुठल्याही कामात तुमचा सिंहाचा वाटा असतो. पण दुसरा कुणीतरी त्याचे श्रेय घेऊन जातो, तुमच्या कष्टाचे चीज होत नाही, तुमच्या खिशात पैसा टिकत नाही, तुम्ही खूप हुशार, प्रयत्नवादी असूनही नशीब साथ देत नाही,’’ असे आपले कौतुक ‘निहित हितसंबंध’ (‘व्हेस्टेड इंटरेस्ट’) असलेल्यांकडून ऐकू येते, हे समजू शकतो. अशा वेळी ही स्व-स्तुती ऐकणे एवढे जड होते की, मध्येच समोरच्याला तोडून ‘‘काही हवे का तुला माझ्याकडून?’’ असे विचारायलाही काही जण कमी करत नाहीत. पण त्या दिवशी एका मित्राने ‘न-हितसंबंध’ असलेल्या तिऱ्हाइताकडून स्वत:ची पदरमोड करून अशी खुशामत पदरात पाडून घेतली.

देशी पोपट पाळायला बंदी नव्हती त्याकाळी. रस्त्याच्या बाजूला एका झाडाखाली पोपट व काही कार्डांचा संच घेऊन एक अवलिया इसम बसलेला असायचा. प्रश्न विचारल्यावर पोपट पिंजऱ्याबाहेर येऊन एखादे कार्ड काढत असे व त्या कार्डावर जे लिहिले असेल ते वाचून गिऱ्‍हाईक आपापले नशीब म्हणत मार्गी लागत. हल्ली त्याचे एक आधुनिक रुप मॉलमध्ये स्थिरावते आहे. मॉलमध्येही असाच एक अवलिया लोकांना त्यांचा हात पाहून त्यांची ‘लक्षणे’ सांगतो. तर मित्राने आपले नशीब अजमावायचे ठरवून या इसमाला आपला हात दाखवला. वर सांगितल्याप्रमाणे अशी असंख्य वाक्ये (ज्याविषयी कुणाचे दुमत असणार नाही) त्याला ऐकवण्यात आली. मित्रानेही आपले ‘कोडकौतुक’ एक करमणूक म्हणून ऐकून घेतले. धार्मिक पेहरावावरून त्याला (हात दाखवून लक्षण सांगणाऱ्याला) ओळखणे सोपे आहे. खरेदीसाठी फक्त सोबत म्हणून गेलेल्यांनी त्रागा न करता या हस्तसामुद्रिकाच्या सान्निध्यात काही क्षण घालवावेत. खिशाला चटका लागला असला तरी सकारात्मक वाक्ये सुखद झुळूक देऊन जातील. खरेदीसाठी आलेले ते त्यांचा आनंद घेतील तर करमणूक म्हणून या अवलियाला भेटून व आपला हात दाखवून ‘अवलिया क्षण’ पदरात पडल्याचे ‘भाग्य’ आपल्याला मिळेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by ajit nadgir