शिकण्याची जिद्द

अनिल स्मार्त
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

मराठी टायपिंगचे काम मिळण्याची शक्यता दिसताच, तेही शिकलो. रात्री जागून बिनचूक व स्वच्छ काम करायला लागलो.

मराठी टायपिंगचे काम मिळण्याची शक्यता दिसताच, तेही शिकलो. रात्री जागून बिनचूक व स्वच्छ काम करायला लागलो.

राज्य वीज मंडळात टंकलेखक होतो. चाळीस वर्षांपूर्वी काही फार पगार नव्हता. संसारासाठी पगार अपुरा पडत होता म्हणून टाइपरायटर भाड्याने घेऊन वकील, डॉक्‍टर, सीए यांची टंकलेखनाची कामे करून द्यायची. तेवढाच हातभार संसाराला. सिटी पोस्ट चौकाजवळ ‘महेश टाइपरायटिंग रूम’चे मालक वाणी यांचा भाडेतत्त्वावर टायपिंग मशिन पुरवायचा व दुरुस्तीचा व्यवसाय होता. आमच्या कार्यालयातही त्यांनी भाड्याने मशिन दिलेली होती. त्यामुळे जुजबी ओळख होती म्हणून त्यांच्याकडे मशिन भाड्याने घेण्यासाठी गेलो. त्यांनी माझी सगळी माहिती विचारली आणि मी स्मार्तगुरुजींचा मुलगा आहे असे कळल्यावर त्यांनी मला लगेच टायपिंग मशिन दिले आणि म्हणाले, ‘‘मी बाकीच्यांकडून अनामत घेतो, पण तुमच्या वडिलांची ओळख आहे म्हणून तुमच्याकडून घेणार नाही.’’ मी तो टाइपरायटर सायकलवर ठेवून घरी आणला. दुसऱ्या दिवसापासून चार-पाच लोकांची टायपिंगची कामे मिळायला सुरवात झाली. घरी रात्री जागून ती कामे संपल्यावरच झोपत असे. दुसऱ्या दिवशी केलेली कामे देऊन नवीन काही कामे असल्यास घेत असे.

एकदा भवानी पेठेतील डावरे वकिलांनी मला मराठी टायपिंगविषयी विचारले. खरे तर त्या वेळी मला मराठी टंकलेखन अजिबात येत नव्हते, पण एकच क्षण विचार करून त्यांना मी लगेच ‘हो.. येते की’ असे उत्तर दिले. पुन्हा वाणींकडे गेलो. त्यांनी त्यांच्या गोदामामधून एक मशिन काढून दिले. मी ते मशिन घरी आणून चांगले साफसूफ करून, त्याला नमस्कार केला. एक कागद मशिनवर चढवून सगळी अक्षरे उठवून बघितली. मराठीत काना, मात्रा, वेलांटी, उकार अशी सगळी छप्पन अक्षरे. इंग्रजीत फक्त सव्वीस. मशिनच्या काही ‘कीज’ अस्पष्ट होत्या, त्याला ‘स्टिकर्स’ लावले. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून आल्यावर आवरून मराठी टायपिंगचा ‘श्री गणेशा’ केला. दोन्ही हातांच्या एका-एका बोटाने ते मराठी टायपिंगचे सात पानाचे काम करायला मला बरोबर सात तास लागले. काम पूर्ण झालेले बघून मला खूपच आनंद झाला. डावरे वकील म्हणाले, ‘‘अहो, तुमचे मराठी टायपिंगही छान, बिनचूक आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by anil smart