झुंज मृत्यूशी

अर्चना आपटे
मंगळवार, 30 जुलै 2019

ती मोठी धीराची. दुखणे आले ते मोठेच, पण तिने धीराने मृत्यूशी झुंज दिली.

ती मोठी धीराची. दुखणे आले ते मोठेच, पण तिने धीराने मृत्यूशी झुंज दिली.

ती सकाळी नेहमीप्रमाणे उठली. पण आज तिला नेहमीसारखे वाटत नव्हते. अंगातील सगळी शक्ती एकाएकी कमी झाल्यासारखी वाटत होती. तिला पलंगावरून खाली उतरायलाही उठवत नव्हते. घरी ती एकटीच. शेवटी तिने पुतण्याला फोन केला व त्याच्याबरोबर ती पुण्यास आली. औषधोपचार सुरू झाला. तिला आता बरे वाटत होते; पण अचानक एक दिवस सकाळी चेहऱ्यावर प्रचंड सूज आली. लगेच निरनिराळ्या चाचण्या सुरू. रोज नवनवीन टेस्ट. महिना झाला. एक दिवस सगळे गप्पा मारत बसले असताना तिला अचानक पायाखाली ओले जाणवले. तिला वाटले, पाणी सांडले असेल म्हणून ते पुसून घेतले. परंतु लगेच पुन्हा पाणी. नीट पाहिले तर पाणी तिच्या दोन्ही पायातूनच झिरपत होते. हे सगळे खूपच भयंकर व अविश्‍वसनीय होते. असा प्रकार आधी कोणीच बघितला नव्हता. दोन्ही पायांतून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. दोन्ही पायांवर कापडी पंचे गुंडाळले व डॉक्‍टरांकडे लगेच घेऊन गेलो. नवीन औषधे व नव्या काही चाचण्या.

दरम्यान, तिला कर्करोग असल्याचे कळले. ती खूप धीराची. तिने आजपर्यंत सगळे स्वबळावर केले होते. हीसुद्धा गोष्ट तिने मोठ्या धीराने व आत्मविश्‍वासाने घेतली. तिची इच्छाशक्ती खूप प्रबळ. विशेष केमोथेरपी व इंजेक्‍शन द्यायला परिचारिका घरी येत होती. ती अतिशय सकारात्मक भावनेने औषधोपचारास साथ देत होती. महिन्या-दीड महिन्याने परत पायातून पाणी वाहू लागले. भूक मंदावली होती. तिला लोणावळा येथील स्वामी समर्थांच्या मंदिरात जायचे होते. स्वामी महाराजांच्या देवळात तिला धन्य वाटले. एव्हाना तिची प्रकृती अजूनच खालावली. आता तिला शरीराची हालचाल करणे अवघड झाले होते. त्यातच तिला नागिणीच्या भयंकर वेदना सहन कराव्या लागल्या. एक दिवस नाका-तोंडातून रक्त आले. अंगात ताप भरला होता. औषधोपचारास शरीर साथ देत नव्हते. दोन दिवसांपासून पोटात अन्नाचा कण नव्हता. फक्त घोट घोट पाणीच पीत होती. अखेर माझ्या आत्याची, साधना जोगळेकर हिची, मृत्युशी चाललेली झुंज संपली. उरल्या असंख्य आठवणी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by archana aapte