देव जरी मज कधी भेटला...

अर्चना आपटे
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

आपण लावलेल्या रोपट्यांचे आपल्या प्रियजनांसारखेच असते. ती आपल्याला लळा लावतात. रोज सकाळी पाणी घालताना जणू ती रोपटी आपल्याला सुप्रभात म्हणतात.

आपण लावलेल्या रोपट्यांचे आपल्या प्रियजनांसारखेच असते. ती आपल्याला लळा लावतात. रोज सकाळी पाणी घालताना जणू ती रोपटी आपल्याला सुप्रभात म्हणतात.

देव जरी मज कधी भेटला... रेडिओवर सकाळी सुरेख गाणं लागलं होतं. मी झाडांना पाणी घालत होते. कुंडीतील कोरड्या मातीत पाणी पडताच मातीचा सुगंध दरवळू लागला. गुलाबाच्या पानांवर आणि फुलांवर पाणी शिंपडताच ती पाने आणि फुले ताजीतवानी होऊन आनंदाने डोलू लागली.
अबोली, जास्वंदी, कण्हेर, सदाफुली, दूधमोगरा सगळी जणू आनंदाने माना डोलवत होती. त्या मुक्‍या झाडांना फुलांना जणू माझ्याशी भरभरून बोलायचे होते. माझ्याशी मैत्री करायची होती. वाऱ्याची एक झुळूक या पानाफुलांनी सुखावून गेली.
स्वतः लावलेले गुलाबाचे रोपटे जेव्हा दिवसागणिक मोठे होताना दिसते तो आनंद अवर्णनीय असतो. मनाला सुखावणारा असतो.

या रोपट्यांचेही आपल्या प्रियजनांसारखेच असते. ती आपल्याला लळा लावतात. रोज सकाळी पाणी घालताना जणू ती रोपटी आपल्याला शुभप्रभात म्हणतात. सुरेख प्रफुल्लित फुलांकडे बघून मन अगदी प्रसन्न होते. दिवसाची सुरुवात अगदी आनंदमय होते. सदाफुली जणू आपल्याला सांगत असते की कितीही दुःख अथवा वाईट परिस्थिती असेल तरीही सदा हसत राहा, सदा फुललेले राहा. जीवन हे क्षणभंगुर आहे. जीवनाचा पुरेपूर आनंद घ्या. जीवनात चढउतार हे येणारच. परंतु, सकारात्मक मनाने सगळ्या गोष्टींना सामोरे जा!
गुलाब, मोगरा रोज आपल्याला सुगंध देत असतात. जणू ते सांगतात दुसऱ्याकडून कसलीही अपेक्षा न ठेवता त्यांना आनंद व सुख द्या. आपल्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर हसू व आनंद येऊ द्या.
अबोली तर सदा बहरलेली व टवटवीत आपल्याला हाच संदेश देते की नेहमी ताजेतवाने राहा. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघा. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.

फुलांबरोबरच माझ्या बागेत एक मिरचीचे रोपटेसुद्धा आहे. मी त्याची एक आगळी गोष्ट बघितली. फुलझाडांना आधी बिया किंवा कळ्या येतात व त्यातून फूल उमलते. अबोलीच्या फुलाच्या ओंब्या असतात. परंतु, मिरचीच्या रोपट्याला आधी सुरेख नाजूक फुले येतात आणि फुले गळून पडल्यानंतर तिथे मिरच्या लागतात. बारीक मिरच्या आकाराने हळूहळू मोठ्या होऊन परिपक्व होतात. हा फुलापासून मिरची होण्यापर्यंतचा प्रवास फारच कुतूहलाचा वाटतो.

रोपट्यापासून फळं, फुलं, मिरची इ. उगवण हा मुळातच एक दैवी चमत्कार वाटतो मला. सगळं कसं शिस्तबद्ध आणि नेटकं असतं. हिरव्या रंगाच्या रोपट्यातून लाल रंगाचं गुलाबाचं फूल येणं म्हणजे खरंच किती कुतूहलाची गोष्ट आहे. हे सगळं अनाकलनीय आहे. म्हणतात ना, देवाची करणी आणि नारळात पाणी! रेडिओवरील गाणे आणि माझ्या छोट्या बागेतील रोपटे व फुले यांची सांगड घातली जात होती. मला त्या लहानलहान रोपट्यांमध्ये फुलांमध्ये व पानांमध्ये देवत्वाचा भास होत होता! जणू या फुलांच्या रूपात मज देव भेटला होता!!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by archana aapte