निरपेक्षता

डॉ. चित्रलेखा पुरंदरे
Saturday, 14 March 2020

आईने सुरू केलेली शाळा मुलीने वाढवली आणि तिला तिचा नवरा सर्वतोपरी सहकार्य करतो आहे. दोघेही स्वदुःख विसरून निरपेक्षपणे शाळा चालवत आहेत.

पुण्याच्या धनकवडी भागातील एक स्वच्छ, सुंदर, संस्कारित शाळा पाहिली आणि भारावलेल्या अवस्थेतच संचालिका ताईंना फोन केला. म्हटलं, ‘‘तुमच्या शाळेला देणगी देण्यासाठी अनेक दाते तयार होतील. तर माझ्या माहितीतली काही नाव सुचवू का? अर्थात तुम्ही विचार करून कळवा मला.’’

आईने सुरू केलेली शाळा मुलीने वाढवली आणि तिला तिचा नवरा सर्वतोपरी सहकार्य करतो आहे. दोघेही स्वदुःख विसरून निरपेक्षपणे शाळा चालवत आहेत.

पुण्याच्या धनकवडी भागातील एक स्वच्छ, सुंदर, संस्कारित शाळा पाहिली आणि भारावलेल्या अवस्थेतच संचालिका ताईंना फोन केला. म्हटलं, ‘‘तुमच्या शाळेला देणगी देण्यासाठी अनेक दाते तयार होतील. तर माझ्या माहितीतली काही नाव सुचवू का? अर्थात तुम्ही विचार करून कळवा मला.’’

दुसऱ्या दिवशी गीताताईंचा फोन आला. म्हणाल्या, ‘‘अहो, आम्ही दोघांनी तुमच्या सूचनेचा विचार केला. पण खरेच निकड नाही. तुम्ही इच्छा व्यक्त केलीत, त्याबद्दल आभारी आहे. आम्ही शाळेच्या गरजा कमी ठेवल्यात आणि शिक्षण, संस्काराकडे अधिक लक्ष दिले आहे. आर्थिक संपन्नतेपेक्षा आपुलकी, राष्ट्रभक्तीचे या मुलांच्या मनावर संस्कार व्हावेत हे आमचे ध्येय आहे.’’ मी निःशब्द झाले. आजच्या काळात हे उत्तर धक्कादायक वाटावे असे. आईने हौसेने सुरू केलेली शाळा मुलीने दुप्पट हौसेला प्रांजलतेची, सुस्पष्ट विचारांची जोड देत सुरू ठेवली आहे. गीतांच्या आईने पुण्याच्या मध्यवर्ती भागात बालवाडी सुरू केली. मग शाळेचे पुण्यातल्या पुण्यात दोन-तीन ठिकाणी स्थलांतर होत होत शेवटी धनकवडीमध्ये जयंत यांच्या वडिलांनी पूर्वी खरेदी करून ठेवलेल्या जागेच्या एका भागावर छोटेसे घर बांधले आणि दुसऱ्या भागात शाळेचे वर्ग बांधले. विशेष गोष्ट म्हणजे त्या जागेसमोर धनकवडी भागातले स्मशान होते. आजूबाजूला वस्तीही तुरळक. पाच, दहा मुले येऊ लागली. शाळेची पटसंख्‍या हळूहळू वाढू लागली.

सदाशिव पेठेत उत्तम चाललेला व्यवसाय बंद करून जयंत गीताच्या या पूर्वप्राथमिक शाळेत मोठ्या आनंदाने दाखल झाले आणि मुंबईच्या किंग जॉर्ज शाळेत शिकलेल्या, दादरला राहणाऱ्या गीताताई पुण्यात धनकवडीत राहून शाळा चालवू लागल्या. त्या वेळी जगण्यावरचा विश्‍वास उडावा असे धक्कादायक, सुन्न करणारे तीन प्रसंग आले. त्या दोघांनाही कर्करोग झाला. दोघांनीही लढाई जिंकली. त्याच वेळी त्यांच्या कन्येलाही कर्करोग झाला आणि दुर्दैवाने त्यात तिचे निधन झाले. या सगळ्या दुःखाला या दोघांनीही मोठ्या धीराने तोंड दिले. शाळेवर कसलाही परिणाम होऊ दिला नाही. या शाळेत शिकून पुढे विविध क्षेत्रांत नावाजलेले विद्यार्थी शाळेच्या अजूनही संपर्कात आहेत. एवढेच नव्हे तर आपल्या नावाजलेपणात आई-वडिलानंतर शाळेने केलेले संस्कार आहेत हे आवर्जून सांगतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by dr chitralekha purandare