औक्षण

muktapeeth
muktapeeth

औक्षण हा नुसताच एक ‘संस्कार’ नसतो, ज्याला औक्षण करायचे त्याविषयी मंगल भावना त्यामागे असाव्या लागतात.

‘‘गुरुजी, मला काही सांगायचंय,’’ असे विशाखाने सांगताच सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. आज तिच्या मुलाचा-अवनीशचा साखरपुडा होता. गुरुजींनी अवनीश आणि वाग्दत्त वधू आशिता यांना औक्षण करण्यासाठी पाच जणींना बोलावण्यास सांगितले होते. विशाखाची बहीण, भावजय, नणंद यांच्यानंतर तिच्या नात्यातील दोघी पुढे आल्या खऱ्या, पण त्यांना कशातच स्वारस्य नव्हते. मात्र त्यावेळेला विशाखा काही बोलली नाही. नंतर ती गुरुजींना म्हणाली, ‘‘मला आणखी काही जणींना बोलवायचे आहे, चालेल ना?’’ त्यावर गुरुजी म्हणाले, ‘‘अवश्‍य! अहो, या दोघांच्या निरामय आयुष्यासाठी त्यांना ओवाळायचे आहे. आपल्याकडे वेळेची मर्यादा असते म्हणून आम्ही पाच जणींना सांगतो. या पवित्र गोष्टीसाठी जास्त जणी आल्या तर छानच आहे.’’ आता तिच्या सख्ख्या शेजारणी, तिच्या घरी काम करणाऱ्या, पण घरातीलच एक असणाऱ्या बायका, अवनीश लहान असताना अर्ध्या रात्रीही येणाऱ्या डॉ. मीनल, विशाखाच्या शाळा-कॉलेजपासूनच्या जीवाभावाच्या मैत्रिणी या सगळ्यांनी औक्षण केले.

पण विशाखा अजून एका व्यक्तीची वाट बघत होती. तितक्‍यात तिला दरवाज्यातून कुणीसे येताना दिसले आणि ती सुखावली. होय, त्या सीताबाई होत्या! त्यांनी बाळाला न्हाऊ-माखू घातले होते. आता त्या थकल्या होत्या, पण सुनेचा हात धरून आल्या होत्या. अवनीशला त्या ‘बाळकोबा’ म्हणून हाक मारत. तो लहान असताना ताप आल्यावर त्यांनी विशाखाच्या बरोबरीने जागरणे केली होती. त्याचा पाय मुरगळल्यावर त्याला तेल लावून दिले होते, इतकेच नव्हे तर अजूनही घरी करंज्या, मोदक केल्यावर बाळकोबासाठी आठवणीने त्या पाठवत होत्या. सीताबाईंनी थरथरत्या हाताने, सुनेच्या मदतीने त्यांना औक्षण केले. म्हणाल्या, ‘‘वहिनीबाई, आजवर मला खूप जणींनी साडी-चोळी दिली, पण तुम्ही लई मान केलासा. तुम्ही तर मला ओवाळायला सांगितलंत, जे आजवर कुणी बी सांगितलं नव्हतं.’’ त्यांना भरून आले. पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या, ‘‘बाळकोबाला काय बी कमी पडणार नाही. तो औक्षवान व्हावा म्हणून माझे आशीर्वाद आहेत.’’ औक्षणामागची मंगल भावना सगळ्यांना उमगली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com