फुली नावडीची-आवडीची!

डॉ. नीलिमा राडकर
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

‘कायमची फुली’ ही कृती काही वेळा गैरसमजुतीतूनही होऊ शकते. वेळीच चूक सुधारायची. चांगल्या कारणासाठी ती जाणीवपूर्वकही करता येते.

‘कायमची फुली’ ही कृती काही वेळा गैरसमजुतीतूनही होऊ शकते. वेळीच चूक सुधारायची. चांगल्या कारणासाठी ती जाणीवपूर्वकही करता येते.

‘‘कुठून प्रवासाला गेलो असे झाले बघा. हौसेने विमानाची तिकीट काढली. पण आधी चार तास विमानाला उशीर आहे, असे सांगून शेवटी ते रद्द केले. वेळ वाचवायला गेलो खरे. पण उलट दुप्पट वेळ गेला. शिवाय धावपळ, दगदग झाली ती वेगळीच. आता परत त्या विमान कंपनीत जाणार नाही. त्यावर कायमची फुली,’’ आमचे एक स्नेही तावातावाने सांगत होते. त्यांच्या बोलण्यावरून त्यांना किती त्रास झाला असेल याची कल्पना आली. त्यांच्या ‘कायमची फुली’ या शब्दांनी बऱ्याच गोष्टींची आठवण झाली. ‘फुली मारणे’ हा वाक्प्रचार लहानपणापासून ऐकतो. एखादी व्यक्ती गोष्ट किंवा प्रसंग त्या त्या वेळी अयोग्य किंवा चुकीची वाटल्याने त्यावर फुली मारायची म्हणजे त्या गोष्टीची पुनरावृत्ती शक्‍यतो टाळायची. रवी फुली म्हणजे गुणाकाराचे चिन्ह किंवा शिक्षकांनी मारलेली फुली म्हणजे ते उत्तर चुकले असून त्याचा नीट अभ्यास करायला हवा अशी सूचना असायची.

मोठेपणी फुलीचा मथितार्थ समजू लागला. काही गोष्टी न करण्याचे फायदे कळू लागल्याने त्यावर नकळतही फुली मारली गेली. एखाद्या गोष्टीने प्रचंड मनस्ताप होत असेल तर त्या वाटेला परत न जाणे केव्हाही इष्टच असते. कधी पश्‍चात्ताप म्हणून, कधी मनाविरुद्ध तर कधी चांगल्या गोष्टीसाठीही फुली मारली जाते. एक मैत्रीण म्हणाली, ‘‘घरात खूप सामान-सुमान आहे. मला खूप साड्याही आहेत. त्यामुळे आता खरेदीवर फुली.’’ सहलीला गेल्यावर तिने मैत्रिणींबरोबर विंडो शॉपिंगचा आनंद घेतला, पण काही खरेदी केली नाही. एकमेकांबद्दलचा आकस, अढी दूर करण्यासाठी गतकाळातील गोष्टींवर फुली मारून पुन्हा नव्याने सुरुवात करणे शक्‍य असते. अनेकदा गैरसमजातून एखाद्यावर फुली मारली जाते. अशा वेळी ती फुली पुसून टाकण्याची हिम्मत दाखवावी लागते. यासाठी क्षमाशील वृत्ती आणि मनाचा मोठेपणा असावा लागतो. शाळेमध्ये आम्हांला शिवणाच्या तासाला एक टाका शिकवला होता ‘क्रॉस स्टीच’. रंगीबेरंगी रेशमांनी कापड न ताणता सुयोग्यप्रकारे फुल्यांनी टाका घालत जायचे. त्यातून अत्यंत सुबक असे चित्र तयार व्हायचे. आपल्यालाही जर अशा योग्य प्रकारे फुल्या मारता आल्या तर आयुष्य अधिक सहजसुलभ आणि आनंददायी होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by dr neelima radkar