उगवतीवर विश्‍वास

डॉ. नीलिमा राडकर
Thursday, 12 March 2020

नेहमी आपल्याच चष्म्यातून पाहात नव्या पिढीला दोष देणे योग्य नाही. त्यांच्यावर ज्येष्ठांनी विश्वास टाकायला हवा.

नेहमी आपल्याच चष्म्यातून पाहात नव्या पिढीला दोष देणे योग्य नाही. त्यांच्यावर ज्येष्ठांनी विश्वास टाकायला हवा.

ताई आणि त्यांच्या तीन मैत्रिणी लग्नाला निघाल्या होत्या. त्यांच्याच एका मैत्रिणीच्या नातवाचे लग्न होते. कार्यालय गावापासून लांब असल्याने मैत्रिणीने बसची सोय केली होती, पण त्यासाठी लवकर निघावे लागणार होते. ताईंच्या मुलाने त्यांना सोडण्यासाठी गाडी दिली. वाटेत त्यांच्या गप्पा सुरू होत्या. एक मैत्रीण म्हणाली, ‘‘बरं झालं तुझी गाडी मिळाली म्हणून. आमच्याकडे कोणाला वेळ नाही बघ. सगळे घाईगडबडीत, मग मी विचारलंच नाही गाडीचं. उगाच नकारघंटा कशाला ऐकू घ्यायची?’’ दुसरी म्हणाली, ‘‘त्यांच्या धावपळीत आपल्याकडे कोण बघणार? मुलगा, सून, मुलगी, जावई सगळी पुढी म्हणजे एकाच माळेचे मणी. नातवंडांना तर कशालाच वेळ नाही. सारखा मोबाईल हातात. त्याशिवाय काही सुचत नाही.’’ ताई म्हणाल्या, ‘‘अगं, तसं नाही. नवीन पिढीला आपली काळजी वाटते याचा मला विश्‍वास आहे.’’ तिसरी मैत्रीण म्हणाली, ‘‘उगाच फाजील विश्‍वास बाळगू नकोस हं. आपण म्हणजे असून अडचण अन्‌ नसून खोळंबा.’’ गप्पा वेगळ्याच वळणावर जाऊ लागल्या. ताईंना ते पटत नव्हते, पण त्या काही बोलल्या नाहीत. तेवढ्यात कार्यालय आल्याने तो विषय तिथेच थांबला.

सगळ्यांनी लग्नसमारंभाचा मनापासून आनंद घेतला. जेवल्यावर त्यांना परतीचे वेध लागले. ताई मुलाला फोन करणार तेवढ्यात त्यांचा मोबाईल वाजला. त्यांचा नातू बोलत होता, ‘‘आजी, तुम्ही निघणार आहात का? तर मी कॅब बुक करतो. तू कागद-पेन काढून ठेव. मी परत तुला फोन करतो आणि नंबर सांगतो तो लिहून घे. सकाळी सबमिशनच्या गडबडीत होतो ना, आता मोकळा आहे. मी आई-बाबा आणि आत्याला पण कळवतो तू निघालीस की.’’ नातवाने बुक केलेली कॅब आली. गाडीत बसल्यावर एका मैत्रिणीचा फोन वाजला. तिची सून बोलत होती, ‘‘आई, यायची व्यवस्था झाली आहे ना, नाही तर सोहम‌ आणायला येईल.’’ तिने घरी निघाल्याचे सांगितले. साऱ्या जणींनी एकमेकींकडे सूचकतेने पाहिले आणि दिलखुलासपणे हसल्या. ताईही त्यात सामील झाल्या. नवीन पिढीवर त्यांनी दाखवलेला विश्‍वास सार्थ ठरल्याचे समाधान त्यांना लाभत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by dr nilima radkar