प्रेमाची रीत निराळी...

डॉ. राजश्री महाजनी
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

माणूस प्रेमाचा भुकेला असतो. प्रेमाच्या दिशेने तो ओढला जातो. प्रेमामुळे त्याच्यातील माणूसपण जिवंत जागतं बनतं.

माणूस प्रेमाचा भुकेला असतो. प्रेमाच्या दिशेने तो ओढला जातो. प्रेमामुळे त्याच्यातील माणूसपण जिवंत जागतं बनतं.

‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं...’ ही मंगेश पाडगावकर यांची कविता आठवली आणि प्रेमाचे अनेक रंग नजरेसमोर तरळून गेले. ज्या वयात फुलपाखरांचे पंख लावून मन उडत असते, तारुण्याच्या उंबरठ्यावर चेहऱ्याची लाली अधिक गुलाबी होते, अशाच वेळी कुणी भ्रमर प्रेमिकेच्या शोधात असतो आणि अखेर ‘ती’ सापडते. मुग्ध प्रेम शब्दांच्या पलीकडचे बरेच काही सांगून जाते. हळूहळू रंग भरत प्रेम बोलके होते. जेव्हा ते विवाहात परिणत होते तेव्हा ते प्रेम यशस्वी ठरले, असे मानले जाते. प्रेम करण्याची रीत ज्याची त्याची वेगळीच. कुणी बडेजाव दाखवतो तर कुणी पोकळ प्रेम करील. सर्वस्व झोकून, सगळे जग तोडून किंवा वेळप्रसंगी जिंकून आणणारा प्रेमिक हा खरा प्रेमवेडाच म्हटला पाहिजे. शिरी-फरहाद, लैला-मजनू, हीर-रांझा अशा या प्रेमवेड्यांच्या जोड्या उगीच अमर झाल्या नाहीत.

या सर्व प्रेमरंगाबरोबर नैसर्गिक, अकृत्रिम, अपार, निःस्वार्थी प्रेम आठवल्याशिवाय राहत नाही ते म्हणजे आईचे प्रेम. निरपेक्ष, निर्व्याज प्रेमाला जगात कुठे तोडच नाही. सदैव भरलेले हे प्रेम कितीही प्यायले तरी कमी पडत नाही. त्या प्रेमाचा तळ सापडणारच नाही इतका अथांग प्रेमसागरच. केवळ माणूसच काय, पण प्राण्यांतील पिल्लांवरचे प्रेम हे केवळ अद्वितीयच. म्हणूनच आईच्या प्रेमाला पारखे झालेले मूल हे खऱ्या अर्थी आईविना भिकारीच. शैशवातल्या या नात्यानंतर लगेच एक प्रेमाचा धागा ज्याच्याशी जडतो तो म्हणजे मित्र, सवंगडी होय. सुखदुःखात साथ देत, लुटूपुटीच्या लढाईपासून, चिडवाचिडवी, कट्टी यात नेहमी पुढे असणारा मित्र बालपणीचा सुखाचा काळ ठरण्यातला महत्त्वाचा घटक ठरतो. कृष्ण-सुदामा प्रेम. तसेच पत्नीच्या चिरकाल आठवणीसाठी प्रेममंदिर बांधणारा शाहजहान असो किंवा मीरेचे कृष्णावरचे भक्तीप्रेम असो किंवा धौम्य-अरुणी सारखे गुरुशिष्यांसारखे वत्सल प्रेम असो, जिथे श्रद्धा, भक्ती, आदर, विश्वास यांचा मनोहर संगम आहे तिथे कुठलेही, कसलेही प्रेम असो, ते अमरच ठरणार यात शंकाच नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by dr rajashree mahajani