नर्मदाकाठी हरवली बॅग

जयमाला पवार
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

नर्मदाकाठी अखेरच्या काळात बॅग हरवली. सगळी काळजी घेऊनही बॅग हरवली होती. त्यात काय काय होते तेही आठवेना.

नर्मदाकाठी अखेरच्या काळात बॅग हरवली. सगळी काळजी घेऊनही बॅग हरवली होती. त्यात काय काय होते तेही आठवेना.

संपूर्ण परिक्रमा वाहनाने होती. जिथे गाडी जाणे शक्‍य नव्हते तिथे अर्धा-एक किलोमीटर चालून परत गाडीत चढायचे, असे चालले होते. चौदा-पंधरा दिवसांचा प्रवास खूपच छान झाला. शेवटचे फक्त दोन-तीन दिवस राहिले होते. ओंकारेश्‍वर सोडले आणि उज्जैनला मुक्कामाला आलो. संध्याकाळी गाडीमध्ये ठेवलेल्या सर्वांच्या बॅगा काढण्यात आल्या. माझी एक बॅग मिळाली. दुसरी बॅग मला मिळालीच नाही. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. ताई म्हणाल्याही, ‘‘आतापर्यंतच्या प्रवासात कोणाचाही साधा रुमालसुद्धा गेला नाही. हे असे कसे झाले?’’ दुसऱ्या दिवशी दुपारी परतीच्या प्रवासाला निघायचे होते. सगळे फिरायला निघाले होते. मी मैत्रिणीला म्हणाले, ‘‘बॅग मिळाली तर ठीक. नाहीतर आजचा आनंद कशाला वाया घालवायचा?’’ आम्ही कालभैरवच्या मंदिरात असताना माझ्या खोलीतील ढवळे यांच्या मोबाईलवर निरोप आला. ‘तुमची बॅग सापडली आहे, ती घेऊन जा.’ मी क्षणभर गोंधळून गेले. काय बोलावे काही सुचेना. तेवढ्यात सांगोल्याच्या डॉ. सोनलकर यांनी फोन घेऊन व्यवस्थित माहिती दिली. आमच्या प्रमुख छायाताईनी ‘त्या’ व्यक्तीला आमचा बोगीनंबर कळवला.

बडोद्याला गाडी पोचणार होती, तोच रात्री साडेनऊच्या सुमारास त्या व्यक्तीचा फोन आला की, ‘मी स्टेशनवर आलो आहे.’ कोणाशी ओळख नाही, संबंध नाही, कोणी कोणाला पाहिले नाही आणि ती व्यक्ती आपल्यासाठी, बॅग देण्यासाठी आपला स्वतःचा वेळ, पैसा खर्च करून इथपर्यंत आली हा सुखद अनुभव होता. बडोदा स्टेशनवर गाडी पाच-दहा मिनिटे थांबली. आम्ही खाली उतरलो. समोरच त्या व्यक्तीच्या हातात मला बॅग दिसली. पोलिस खात्यातील राहुल राठोड यांनी बॅग आमच्याकडे सुपूर्द केली. आमच्याच पाया पडायला लागले. त्यांनी बॅग उघडून आतील वहीमधून ढवळे यांचा नंबर पाहून आम्हाला फोन केला होता. ‘सर्व सामान आहे ना ते पहा’ असेसुद्धा सांगण्यास विसरले नाही. पंधरा-वीस किलोमीटरचा प्रवास करून बॅग देण्यास ते आले आणि दिलेले बक्षीससुद्धा नाकारले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by jaymala pawar