प्राजक्ताचा सांगावा

कल्पना जाखडे
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

गंधभरा पारिजातक प्रत्येकाच्या मनात कायमच बहरत राहावा. जीवन गंधीत करीत असावा.

गंधभरा पारिजातक प्रत्येकाच्या मनात कायमच बहरत राहावा. जीवन गंधीत करीत असावा.

पारिजातकाच्या सुंदर रांगोळीने मागचे अंगण सजले होते. वाऱ्याची झुळूक अंगावर घेत मी काही क्षण त्या तरूतळी थबकले आणि ‘सर्व कामना सिद्ध रस्तू’ म्हणून माझ्यावर केशरी दांडे नि शुभ्र पाकळ्यांच्या गंधीत फुलांनी आशीर्वादाची बरसात केली. नजरेत हा सोहळा किती भरून घेऊ नि मनाच्या कप्प्यात या फुलांचे रेखाटन कसे करू असे झाले. भरभरून गंध आतल्या मनात पोचला नि प्राजक्ताचा सांगावा सांगत सुटले. अनंत अडचणी, समस्या, कटकटीतून क्षणभर तरी जीवन गंधीत करून मनावरचा भार हलका करावा, हे प्राजक्त मला सांगून जातं. शेजारी राहणारी, संसाराबरोबरच ‘शॉप’ सांभाळणारी, नावाप्रमाणे स्नेहल तिच्या कामात प्रसन्नतेने दंग असते. तिच्याशी तिच्या दुकानात क्षणभरच बसले तरी प्रचंड उर्जेचा स्रोत जाणवतो. तिच्याशी सहजच गप्पा मारताना निरीक्षण केले, किती सहजतेने सारा संसार नि दुकान सांभाळते. सारे काही विसरून दुकानातल्या कामात गुंतून जाते. मी तिला म्हटलेही, ‘‘तू खूप छान बोलतेस हं सगळ्यांशी.’’ तशी म्हणते कशी, ‘‘वहिनी, मला तुम्ही ‘छान बोलते’ म्हणालात ना, मनाला जरा गुदगुल्या करून गेला तुमचा शब्द.’’ हा तिचा प्रसन्नभाव मला प्राजक्‍ताचा सडाच वाटला.

रोज पहाटे उठून संसार नीटनेटका लावून ठराविक पोषाख चढवून शाळेच्या किलबिल परिवाराला हसतमुखाने व्हॅनमधून नेणाऱ्या किर्वे मॅडम, सकाळीच घरकामात मदत करण्यासाठी येणाऱ्या प्रसन्नवदनी सख्या या मला पारिजातकाच्या फुलांसारख्याच वाटतात. माझा परदेशस्थ नातू व्हिडिओ कॉलवर बोलताना म्हणतो कसा, ‘‘आजी, दादा मी झटकन या मोबाईलमधून तुमच्याकडे येतो, कॅडबरी घेतो नि परत मोबाईलमधून आईकडे जातो. कशी आहे आपली गंमत!’’ छोटी नात आईवर रागावून म्हणते, ‘‘मी चालले आता वारज्याच्या आजीकडे.’’ आपली छोटी पिशवी भरते नि निघते. त्यांच्या या सहज लीलांनी जीवन गंधीत होऊन जाते. किती नाती, किती आठवणी, किती शिकवण देऊन जातो हा पारिजातक. हा प्राजक्त वर्षातून काही महिनेच फुलतो, पण माणसांमधला, मनांमनात फुललेला पारिजातक मात्र कायमच दरवळत राहातो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by kalpana jakhade