फेरीवाल्याची फेरी

कामिनी थोरात
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

फेरीवाल्यांनी लहान वयात व्यवहार शिकवला होता. जगण्याचे अत्तर लावले होते. आता ते फेरीवाले दिसत नाहीत.

फेरीवाल्यांनी लहान वयात व्यवहार शिकवला होता. जगण्याचे अत्तर लावले होते. आता ते फेरीवाले दिसत नाहीत.

खडेमीठ आणायला गेले तर दुकानदाराने पिशवीबंद मीठ हातात दिले. सहजच आठवले ते, नव्वदच्या दशकात मुंबईच्या गल्ल्यांमध्ये फिरणारे मिठवाले. तेव्हा वेताच्या करंड्यात कागद टाकलेला, त्यावर मीठ. मीठवाला ओरडत यायचा ‘मीऽऽठ ए जाडाऽऽनमक’. घरात मिठाची बरणी संपली की आई त्याला बोलवायला सांगायची. कोणतेच मोजमाप नाही. तो बरणी करंड्यात ठेवायचा. पूर्ण भरेपर्यंत हातानेच मीठ ओतायचा. सकाळी सकाळी एक आवाज जागे करायचा. तो होता पाववाल्याच्या सायकलीच्या घंटीचा. दोन बाजूंना दोन भल्या मोठ्या पिशव्या. एकात नरम पाव, तर दुसरीत कडक पाव. कडक पाव भला मोठा आणि अगदी कडक भाजलेला. चहात त्याची चवच न्यारी. मासेवाली तर दारात येऊन आवाज द्यायची. मग आई ताट घेऊन यायची. मासे घ्यायची. दारात माझा छोटा भाऊ उभा असला, की हमखास शेवटी दोन मासे जास्तीचे टाकून आईला म्हणायची, ‘‘माज्या जावयाक करून घाल.’’ मला आणखी वेड म्हणजे गल्लीत येणाऱ्या मद्रासी गजरेवाल्या बायकांच्या मागे मागे फिरायचे. लहानपणापासूनच मला गजरा खूप आवडतो. त्यांच्या त्या टोपल्यांमध्ये अबोली, मोगरा, चमेलीचे घट्ट विणलेले गजरे असायचे. ‘गजरेऽऽवालेऽऽ’ करून ओरडायच्या आणि हाताने पाच रुपयांचे दोन-तीन हात गजरे पटपट मोजून द्यायचा. त्यांचे गजरे विणणारे आणि मोजणारे हात अगदी यंत्रासारखे चालायचे. उन्हाळ्यात पाटीत वेगळ्या रंगाची, चवीची लोणची असणाऱ्या बरण्या घेऊन लोणचेवाला आला की मोठा आवाज यायचा. ‘खट्टाऽऽमीठाऽऽ आचार’. ती भली मोठी पाटी उतरली की रंगीबेरंगी जादूच्या बरण्या समोर पाहिल्यासारखे व्हायचे.

असे अनेक फेरीवाले तेव्हा त्या गल्ल्यांमध्ये फिरायचे. आता मुंबईला ते फेरीवाले दिसत नाहीत. लोकांचा फेरीवाल्यांवरचा विश्‍वासही कमी झालाय. कुटुंबातील माणसांसारखे मनात घर करणारे फेरीवालेही आता कमी झालेत. निष्ठा म्हणून ही माणसे काम करायची. समोरच्या ग्राहकाला जीव लावायची. पैशाने कमी असणाऱ्यांना सांभाळून घ्यायची. यांनी व्यवहार पाहिला नाही. पण नकळत आमच्यासारख्या लहान मुलांना पुस्तकात शिकायच्या आधीच व्यवहार शिकवला हे मात्र नक्कीच खरे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by kamini thorat