सुंठी वाचून...

मो. गो. मातापूरकर
Thursday, 19 March 2020

साहेबांना दुखवायचे नाही आणि कर्मचाऱ्यावरही अन्याय होऊ द्यायचा नाही, अशावेळी हुशारीनेच त्यावर तोडगा काढावा लागतो.

साहेबांना दुखवायचे नाही आणि कर्मचाऱ्यावरही अन्याय होऊ द्यायचा नाही, अशावेळी हुशारीनेच त्यावर तोडगा काढावा लागतो.

दूर ईशान्येकडील एका राज्यात मी केबिनमध्ये काम करीत बसलो होतो. तेवढ्यात धाडकन दार उघडून एक जण आत आला. तो संतापाने थरथर कापत होता. मी त्याला विचारले, ‘‘काय झाले?’’ तो म्हणाला, ‘‘साब हमारी अभी के अभी तबादला करो.’’ तो कंपनीमध्ये स्वयंपाकी होता. कंपनीचे लोक दूर जंगलामध्ये अथवा उंच डोंगरावर काम करायचे. तंबूत राहायचे. त्यांच्यासाठी कंपनीने बरेच स्वयंपाकी भरती केले होते. बरीच वर्षे उंच पहाडामध्ये राहिल्यावर त्याने खाली मुख्यालयामध्ये बदली करून घेतली होती. कंपनीच्या तेथील मुख्य साहेबाकडे घरी काम करायला दोन स्वयंपाकी त्याने ठेवून घेतले होतेच. हा नवीन स्वयंपाकी चांगला स्वयंपाक करतो म्हणून कोणीतरी त्यांना सांगितले. त्यामुळे त्यांनी मला त्यालाही त्यांच्या घरी पाठवायला सांगितले. तो तेथील काम करायला लागून थोडेच दिवस झाले होते आणि आता तो बदली करून मागत होता. ‘‘अरे, पण असे बदली मागायला काय झाले?’’ मी विचारले. ‘‘साब बहोत अच्छे है. पर उनकी बीवी मेमसाब फार संतापी आहे. आम्हांला शिव्या देते. भांडे फेकून मारते. हमारा तबादला करो, नहीं तो हम वहॉं किचन में अपने को फॉंशी लगा लेंगे.’’
बापरे, मामला फार गंभीर दिसतो. जर त्याने खरेच फाशी घेतली तर मी संकटात आलो असतो. कारण त्याच्या ‘पोस्टिंग ऑर्डर’वर माझी सही होती. एक कल्पना माझ्या डोक्‍यात आली. त्याला म्हणालो, ‘‘तू फार चांगला खाना बनवतो म्हणून तुला साहेबांनी घेतले, खरे ना?’’ ‘‘हां साब.’’ ‘‘पण तुला चांगला खाना बनवायला कोणी सांगितले?’’ मी विचारले. ‘‘मतलब?’’ ‘‘अरे, जर कधी सबजीमध्ये तिखट जास्ती झाले, डाळीमध्ये मीठ इतके जास्ती की कोणाला खाता येईना, अशा चुका झाल्या तर तुला कोण तेथे ठेवेल?’’ क्षणभर तो माझ्याकडे पाहात राहिला. हसला. ‘‘हॉं साब. समज गया.’’ दोन दिवसांनी बड्या साहेबांचा फोन आला. त्याला ते शिव्या देत होते. त्या मूर्खाला आत्ताच्या आत्ता दूर जंगलात पाठव म्हणाले. मी ‘‘हो’’ म्हणालो व लगेच त्याच्या बदलीची ऑर्डर काढली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by m g matapurkar