काळजाचा ठोका चुकला!

मच्छिंद्र कांबळे
Friday, 14 February 2020

अगदी दोन मिनिटांसाठी घराबाहेर पडलो. मागे कन्येने दार बंद करून घेतले होते. गॅसवरचा कुकरचा वॉल्व फुटून वाफ गेल्यामुळे पुढचा धोका टळला होता.

अगदी दोन मिनिटांसाठी घराबाहेर पडलो. मागे कन्येने दार बंद करून घेतले होते. गॅसवरचा कुकरचा वॉल्व फुटून वाफ गेल्यामुळे पुढचा धोका टळला होता.

मोनिका साधारण तीन वर्षांची होती. आम्ही उभयता नोकरीला असल्यामुळे तिचा दिवसभर सांभाळ मेहुणी करत असे. संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर मी मोनिकाला घरी घेऊन येत असे. घरी परतल्यानंतर भाताचा कुकर लावण्याची जबाबदारी माझी होती. एके दिवशी मोनिकाला घरी आणल्यानंतर मी गॅसवर भाताचा कुकर लावला. घरात पिण्याचे पाणी नव्हते. पिण्याचे पाणी वर चढत नसल्यामुळे पार्किंगमधील टाकीत जाणारा नळ बंद करण्यासाठी मला खाली जाणे आवश्‍यक होते म्हणून मी खाली निघालो. जेमतेम एक ते दोन मिनिटे‌ मला लागणार होती. मोनिका घरात एकटीच असल्यामुळे मी दरवाजा उघडाच ठेवला. तसेच मोनिकाने चुकून दार लावलेच तर लॅचची चावीसुद्धा बरोबर घेऊन गेलो. नळ ताबडतोब बंद करून मी वर आलो तर काय? मोनिकाने दरवाजा बंद केलेला, शिवाय नाइट लॅचही आतून लावलेले होते. मी तिला आवाज देऊन देऊन दरवाजा उघडण्यास सांगितले तरी व्यर्थ. एवढ्यात कुकरच्या जोरजोरात शिट्ट्या सुरू झाल्या. अरे बापरे, कुकर जास्त गरम होऊन त्याचा स्फोट झाला तर? या विचारानेच माझा थरकाप झाला. मला तर काहीच सुचेना.
परंतु, आमच्या येथे काही काम सुरू असल्यामुळे खाली एक छोटीशी शिडी तेथे होती. माझी सदनिका पहिल्या मजल्यावर असल्यामुळे मी गॅलरीत गेलो आणि गॅलरीचा दरवाजा उघडू लागलो, तर तिने त्यालाही आतून कडी लावलेली होती. तिला तेथून जोरजोरात आवाज देत होतो. परंतु, तिच्या काहीच लक्षात येत नव्हते. सुदैवाने तो निम्मा दरवाजा काचेचा असल्यामुळे तो हातानेच फोडून मी ताबडतोब घरात गेलो आणि लगेचच गॅस बंद केला. सुदैवाने कुकरचा वॉल्व फुटून, त्यातून वाफ जात असल्यामुळे थोडक्‍यात बचावलो. त्या दिवसाच्या आठवणीने आजही अंगावर शहारे येतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by machindra kamble