विघ्नहर्ता

मधुरा धायगुडे
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

आपल्यासमोरची विघ्ने दूर करणारा तो विघ्नहर्ता. तो एखाद्या डॉक्टरच्या रूपातही भेटू शकतो.

आपल्यासमोरची विघ्ने दूर करणारा तो विघ्नहर्ता. तो एखाद्या डॉक्टरच्या रूपातही भेटू शकतो.

‘हे नयन बोलती काहीतरी’ असे म्हणतात ना! आपली ओळख देणारे हे डोळे व्यक्तिमत्त्वात महत्त्वाचे ठरतात. जन्मजात दृष्टी अमूर्ताची सर्जनगाथाच, पण अशी दृष्टी गमावलेल्याला पुन्हा नव्याने दृष्टी देणाऱ्या सर्जन डॉक्‍टरांनांही देवदूतच म्हणावे लागेल, त्यांचे आभार मानायला हवेतच. असाच काहीसा छान अनुभव एका आप्तेष्टांबाबतीत आलेला. काही कारणाने आपली दृष्टी गमावून बसलेल्या, पण आता स्वच्छ नवीन दृष्टी मिळालेल्या व्यक्तीचा अनुभव बघायला मिळाला. माणसातील देवाचे दर्शन त्या डॉक्‍टरांच्या रूपात झाले. वैद्यकीय विज्ञानामुळे घडलेला हा चमत्कार नव्हे साक्षात्कारच म्हणावा लागेल.

अपघातामुळे डोळ्यांत झालेल्या जखमेमुळे दृष्टी गमावली. सारं भविष्यच जणू धूसर झालं. दिसण्याचा प्रश्‍न निर्माण झाला. आता पुन्हा भविष्यात कधी दिसेल का, असाही प्रश्‍न पडला होता. अशा वेळी एका नामवंत महिला डॉक्‍टरांनी हे शक्य करून दाखवलं. पुन्हा नव्याने त्या व्यक्तीला दृष्टी मिळवून दिली. नवीन स्वप्नं बघण्याची उमेद दिली. त्यांचे ऋण मानायला हवेत. कलियुगात चमत्कार घडतात, साक्षात्कार होतात यावर दृष्टी दिलेल्या त्या डॉक्‍टरांमुळे विश्‍वास ठेवावासा वाटतो.

सर्जनशीलता सर्जरीच्या रूपात साकारली गेली. त्या सर्जनला सजगतेची, दिसण्याची संवेदना पुन्हा प्राप्त झाली. खूप छोटी गोष्ट असेल कदाचित त्या डॉक्टरांसाठी, त्यात काय एवढं, असं वाटत असेल त्यांना. त्यांना ते सवयीचंही झालं असेल. पण, एखाद्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन जरी आपल्या विचारांवरच असला तरी, ते बघण्याचं बळ दृष्टीमुळेच ना? दृष्टीमुळे दृष्टिकोनही निर्माण होतो. तसंच काहीसं त्यांच्या बाबतीत घडलं. कुठेतरी त्या पेशाचेही नकळत आभार मानावेसे वाटले. मग ‘त्वं ज्ञानमयो विज्ञान मयोसि’ म्हणजेच माणसातील खऱ्या विघ्नहर्त्याचे दर्शन या कलियुगात घडू शकतं असंच वाटलं. ज्ञान घेऊन त्याचे विज्ञानाच्या रूपात प्रकटीकरण करणारे समाजाला तारणारे हे डॉक्‍टर एक उत्तम गुरू, शिक्षक, देवता यांचीच रूपं म्हणावी लागतील. दृष्टी देऊन या बोलक्‍या नयनांना पुनर्जीवन देणाऱ्या त्या देवदूताचे, विघ्नहर्त्याचे, ऋण मानावेसे वाटले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by madhura dhaigude